दाभोळकरांचा खुनी सापडणार कधी?

0
101

– देवेंद्र कांदोळकर
आज २० ऑगस्ट. डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या हत्येला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. गेल्या वर्षी याच दिवशी नित्यनियमाप्रमाणे सकाळच्यावेळी फिरायला गेले असता त्यांचा गोळ्या घालून खून करण्यात आला. वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विवेकवादी जीवनमूल्ये स्वीकारून शोषणरहित समाजरचना निर्माण व्हावी म्हणून जीवनभर संघर्ष करीत असलेला एक समाजवादी सेनापती मारला गेला.
डॉक्टर दाभोळकरांच्या हत्येनंतर सात – आठ दिवसांनी एक फोन आला. फोनवरून एक बाई मला विचारत होती, ‘तुम्ही दाभोळकरांना त्यांच्या खुनाआधी दोन – चार दिवस फोन केला होता का? कशासाठी फोन केला होता, तुमचे नाव काय? तुम्ही काय करता, वगैरे वगैरे. त्यांच्या प्रश्‍नांना उत्तरे देऊन शेवटी मी त्यांना ‘आपण कोण’ असे विचारले, तेव्हा त्यांनी आपण सायबर क्राईम ब्रँचमधून बोलत असल्याचे सांगताच, ‘मॅडम, खुन्याचे धागेदोरे लागलेत का’ असा भाबडा प्रश्‍न केला. प्रयत्न चालू असल्याचे उत्तर देऊन त्यांनी फोन खाली ठेवला आणि माझा मूर्खपणा मला कळून आला. खुन्याचे धागेदोरे शोधण्यात पोलीस यशस्वी झाले असते तर त्यांनी मला कशाला फोन लावला असता?
दाभोळकरांच्या हत्येनंतर देशभरात प्रतिक्रिया उमटल्या. निवेदने, धरणे, बंद, निषेध सभा, शिष्टमंडळे… सारे लोकशाही मार्ग झाले. लवकरच खुन्याला अटक होईल अशा बातम्या वाचायला मिळाल्या, परंतु कसले काय? काही दिवसांनी हेही वाचले की, पोलीस आणि महाराष्ट्र शासन यांनी मिळून खुन्याचे धागेदोरे कळविणार्‍यांस अकरा लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले. महाराष्ट्र पोलीस खाते थकले आणि त्यानंतर हे प्रकरण केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाकडे सुपूर्द केले. ज्या पुलावर दाभोळकरांची हत्या झाली, त्या ओंकारेश्‍वर पुलाखालून या वर्षभरात बरेच पाणी वाहून गेले, परंतु महाराष्ट्राचे पोलीस अन् केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभाग अद्याप खुन्यांना पकडण्यात यशस्वी झालेला नाही.
चोवीस तास सामाजिक कार्याचा ध्यास घेतलेले काही मोजके लोक मी पाहिलेले, त्यापैकी दाभोळकर हे एक आहेत. मला आठवते, वीस बावीस वर्षांपूर्वी कोकणात एक महाराज अवतरले होते. त्यांच्या मठाची वारी केल्यावर आपल्या मनात असलेल्या इच्छा पूर्ण होतात, कर्करोगीही रोगमुक्त होतो, मेलेला माणूस जिवंत होतो, अशी त्याची गाथा प्रसिद्ध होती. ही सारी भंपकगिरी वाचताच स्थानिक वर्तमानपत्रात मी एक लेख लिहिला होता. दरम्यानच्या काळात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने त्या महाराजांना आव्हान दिले. त्यांच्या मठात पोलिसांच्या उपस्थितीत स्वतः महाराज व मठाचे विश्‍वस्त विरुद्ध डॉक्टर नरेंद्र व अंनिसचे दहा बारा कार्यकर्ते जमले होते. बाहेर हजारो भक्त, पोलिसांचा गराडा, गरमागरम वातावरणात कोठेही आक्रमकता न दाखवता अतिशय सौजन्यपणे असे काही प्रश्‍न केले की ‘‘ती गाथा मला मान्य नाही आपण करीत असलेले अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य चांगले आहे. मी पण तसे करू इच्छितो’’ असे त्या महाराजांनी आपल्या भक्त मंडळींसमोर कबूल केले. .. तेव्हापासून अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतील या डॉ. नरेंद्रावरची श्रद्धा दृढ होत गेली.
साने गुरूजींनी स्थापन केलेल्या ‘साधना’ साप्ताहिकाचे दाभोलकर संपादक होते. ग. प्र. प्रधान यांच्या आग्रहामुळे मी ‘साधने’त गेलो तेव्हा दाभोळकर एक व्यक्ती नव्हे तर चालती बोलती कार्य करती संस्था असल्याची प्रचीती आली. सातारा येथील घरी किंवा अंनिस, साधना वा अन्य सामाजिक कामानिमित्त जेथे कोठे गेले असतील तेथून ते दर सोमवारी पुण्यात ‘साधना’ कार्यालयात यायचे अन् मंगळवारी संध्याकाळी पुन्हा जेथे जायचे असेल तेथे परतायचे. ‘साधना’ कार्यालयात आल्यावर आठवडाभरात आलेली पत्रे, छापायला जाणारा साप्ताहिक अंक यावर नजर घालायचे. त्यानंतर पत्रांस उत्तरे, फोनाफोनी, भेटायला आलेल्यांशी चर्चा, पुणे परिसरातील सरकारी कार्यालये, संस्था पदाधिकारी यांच्या कामानिमित्त भेटीगाठी घ्यायचे आणि सव्वा दीडच्या सुमारास पुन्हा ‘साधने’त परतायचे. डॉक्टरांसाठी जवळच्या खानावळीतून डबा यायचा. इतर कर्मचारी घरचे जेवण आणायचे. शिपायापासून संपादकांपर्यंत सारे जण एकाच टेबलावर बसून एकमेकांच्या डब्यातील पदार्थांची देवाणघेवाण करीत आठवड्याच्या कामाचा आढावा घेत. जेवणावर एकेक केळे खाल्ले की दरेकजण आपापला डबा धुवून ठेवत पुन्हा आपल्या कामाला निघून जायचे.
कितीही अडचणी आल्या तरी ‘सदैव सैनिका पुढेच जायचे’ हे त्यांचे बीद होते. त्यांच्या वहिनींचे निधन झाले तो रविवार होता. त्यामुळे नेहमीप्रमाणे ते सोमवारी कसे येतील, कोणाचे फोन वगैरे आले तर त्यांना उत्तरे द्यावीत म्हणून मी नऊऐवजी साडे – आठलाच ‘साधने’त गेलो. दरवाजा अर्धवट उघडाच होता. पायर्‍या चढून वर गेलो अन् पाहतो तो काय, डॉक्टर स्थितप्रज्ञपणे त्या दिवशी छापायला जाणार्‍या अंकाच्या लेखावर नजर फिरवत होते. भावनेपेक्षा कर्तव्याला महत्त्व द्यायचे याचे वस्तुपाठ डॉक्टर आपल्या वाणी आणि कृतीतून देत असत.
पाच वाजता ‘साधना’ कार्यालय बंद व्हायचे. अंनिसच्या पुणे शाखेचे कार्यकर्ते सहा वाजता गोळा व्हायचे. एखादी घटना, आठवड्यात वाचलेल्या पुस्तकांवर भाष्य व्हायचे. डॉक्टर कार्यकर्त्यांना बौद्धिक द्यायचे. बैठक संपली की खिडक्या दारे बंद करून ते रात्री झोपण्यासाठी रा. ग. जाधवांकडे जायचे. तिकडे रात्री उशिरापर्यंत गप्पाटप्पा चालल्या असल्या तरी दुसर्‍या दिवशी पहाटे उठून ओंकारेश्‍वर पुलापर्यंत चालत जाण्यात कधी खंड पडला नाही. गेल्या वर्षी अशाच मंगळवारी त्यांची ही सवय माहीत असलेल्याने त्यांच्यावर गोळ्या घातल्या.
अंनिस व दाभोळकर हे समीकरण रूढ झाले असले तरी ते एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. ते उत्तम कबड्डीपटू होते. वैद्यकीय डॉक्टर होते, फर्डे वक्ते होते, विचारवंत लेखक होते. मराठी साहित्य संमेलन सर्वांनाच परिचित आहे. दाभोळकरांनी वेगवेगळ्या साहित्यिकांना ‘साधने’त बोलावून कथा, कविता, कादंबरी इत्यादी विषयांवर स्वतंत्र अशी ‘साधना साहित्य संमेलने’ आयोजित केली. त्यापैकी एक गोमंतक साहित्य सेवक मंडळाच्या सहकार्याने गोव्यातही घेतले होते. जातीनिर्मूलन, स्त्री-पुरूष समता, कष्टकर्‍यांची श्रमप्रतिष्ठा, व्यसनमुक्ती, आंतरजातीय विवाह, धर्मग्रंथांची चिकित्सा, बुवाबाबांची भंडाफोड, अंधश्रद्धा रूढी – परंपरेचे निर्मूलन या सार्‍या विषयांकडे विवेकवादी वैज्ञानिक दृष्टीकोनातून पाहत आणि लोकशाही मार्गाने प्रबोधन करत, प्रसंगी संघर्ष करत राहिले. या सर्व प्रकरणात ज्याचे हितसंबंध गुंतलेले होते त्यांच्याकडून त्यांचा विरोध व्हायचा.. धमक्या यायच्या.. आणि शेवटी……? एक वर्ष झाले तरी मारेकर्‍यांचा तपास लागलेला नाही. पोलिसांना यश आले नाही म्हणून प्रकरण सीबीआयकडे देण्यात आले. तेथे आणखी किती दिवस वाट पाहायची? दिवसाढवळ्या हत्या होऊन आणि खुनापूर्वी धमक्या फोन असतानाही खुन्याचा शोध लागत नाही याचा अर्थ काय समजायचा? सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍या कार्यकर्त्यांनो, तुम्ही जास्त शहाणपणा दाखवलात तर तुमचे काय होईल, हे लक्षात घ्या असा इशारा देणारे खुनी एकीकडे आणि तुम्हाला धमक्यांचे फोन येत असतील तर सिमकार्ड बदला असे सांगणारे राज्यकर्ते दुसरीकडे. शोषणरहित समाजरचना निर्माण व्हावी म्हणून परिवर्तनवादी संघर्षात्मक भूमिका घेणार्‍या कार्यकर्त्यांना ह्या दोहोमधील चिंचोळ्या वाटेवरून जाताना रक्ताच्या थारोळ्यातच पडावे लागणार आहे का?