दाबोळी विमानतळावर ३३ लाखांचे सोने जप्त

0
97

दाबोळी विमानतळावरील कस्टम खात्याच्या गोवा विभागाच्या अधिकार्‍यांनी काल केलेल्या एका कारवाईत हवाई प्रवाशाकडून सुमारे ३३ लाख रुपये किंमतीचे सोने जप्त करण्यात आले. प्रवाशाने आपल्या बॅगेत लपवून ठेवलेले १२४० ग्रॅम सोने कस्टम अधिकार्‍यांना सापडले. सोने तस्करी विरोधात कस्टम विभागाने आठ महिन्यांत केलेली ही दहावी कारवाई आहे. आतापर्यंत २.७४ कोटी रुपयांचे १०.१ किलो सोने जप्त करण्यात आले आहे.

जेधाह व्हाया मस्कतहून ओमन एअरवेजमधून दाबोळी विमानतळावर उतरलेल्या हवाई प्रवाशाकडे सदर सोने सापडले. दाबोळी विमानतळावर कस्टम अधिकार्‍यांकडून प्रवाशांची तसेच त्यांच्या बॅगांची तपासणी सुरू असताना एक प्रवासी त्यांना संशयास्पद स्थितीत वावरत असताना दिसला. तो कस्टम अधिकार्‍यांना नजरेआड करून निसटण्याचा प्रयत्न करत असताना त्याला अडवून त्याची व त्याच्या सामानाची झडती घेतली असता बॅगेतील स्ट्रोलर बॅग मॅटर फ्रेममध्ये लपवून ठेवलेल्या पाच सोन्याच्या बिस्किटा सापडल्या. त्यांची किंमत ३३ लाख रुपये एवढी आहे. दाबोळी विमानतळावर या विमानाची सोन्याच्या तस्करीच्या संशयाने झडती घेण्यात आल्याने सोने सापडले.

गोवा कस्टम विभागाचे आयुक्त आर. मनोहर यांच्या मार्गदर्शनाखाली कस्टमचे सहआयुक्त जी. बी. सांतीमानो व कस्टमच्या दाबोळीतील इतर अधिकार्‍यांनी ही कारवाई केली.