दाबोळीतील चार्टर विमानांचे वेळेचे बंधन नौदलातर्फे मागे

0
101

दाबोळी विमानतळावर चार्टर विमानांना नौदलाने घातलेले वेळेचे बंधन अखेर नौदलातर्फे मागे घेण्यात आले आहे. त्यामुळे चार्टर विमानांची वेळेसंदर्भातील अडचण दूर झाली आहे. राज्य सरकारला नौदलाचे मन वळवण्यात यश मिळाले आहे.

या पर्यटन हंगामात विमानतळावर उतरणार्‍या विदेशी चार्टर विमानांना उतरण्यासाठी वेळ देण्यात आला नसल्याने सदर विमान कंपन्यांना बराच त्रास सहन करावा लागणार होता. त्यामुळे यंदा चार्टर विमानांच्या संख्येत निम्मी घट होण्याचाही धोका होता. खरे तर यंदा यात २५ वाढ अपेक्षित होती. मात्र वेळेच्या समस्येमुळे उलट परिणाम होऊन त्यात घटच होण्याचा धोका होता. दरम्यान, काल राज्य सरकार आणि नौदल यांच्यात याविषयी दाबोळी विमानतळावर एका खास बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात हा गुंता सोडवण्यास सरकाला यश आले. त्यात विदेशी चार्टर विमानांना दाबोळी विमानतळावर उतरण्यासाठी देण्यात आलेल्या वेळेबाबतचे सूचनापत्र मागे घेतले. त्यामुळे या हंगामात १००० चार्टर विमाने पर्यटक घेऊन दाखल होतील असा विश्‍वास पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांनी व्यक्त केला. या बैठकीत पंचायत मंत्री मावन गुदिन्हो, नौदल ध्वजाधिकारी रिअर ऍडमिरल पुनितकुमार बहल, विमानतळ संचालक गगन मलिक, ट्रॅव्हल अँड टुरिझम असोसिएशनचे अध्यक्ष सावियो मेसाईस, आमदार नीलेश काब्राल आदी उपस्थित होते.