दान सत्पात्री व्हावं!

0
1205
  •  सरिता नाईक
    (फातोर्डा, मडगाव)

अशाही काही संस्था आहेत की ज्यांच्याबद्दल दाता म्हणतो, ‘या संस्थेला दान केलं ना की मी निर्धास्त असतो. त्या दिवशी मला शांत झोप लागते कारण मला खात्री आहे की माझे हे दान सत्कारणीच लागणार आहे.’ असा विश्वास हवा.

बालपणी बर्‍याच महापुरुषांच्या दानशूरपणाच्या कथा ऐकल्या होत्या- इंद्रदेवाला आपली कवचकुंडलं दान करणारा कर्ण, विश्‍वामित्रांना आपलं सगळं राज्य दान करणारा राजा हरिश्‍चंद्र, स्वतःच्या देहातील हाडांचं दान करणारा शिबिराजा, स्वतःच्या मुलाचं – चिलयाचं मांस शिजवून दान करणारा राजा श्रीयाळ, राजा हर्षवर्धन असे कितीतरी.

दान खूप प्रकारचं केलं जातं. अन्नदान, अर्थदान, विद्यादान, श्रमदान, समयदान इत्यादी. प्रत्येकजण आपआपल्या परीने यांपैकी काहीतरी दान करत असतो. पण दान हे सत्‌पात्रीच करायला हवं, ते निरपेक्ष भावनेनं करायला हवं. दान घेणार्‍याने धन्यवाद मानले पाहिजेत अशी अपेक्षासुद्धा करू नये, दान बिनबोभाट करावे. उजव्या हाताने केलेले दान डाव्या हातालासुद्धा कळु नये असे म्हणतात.
बर्‍याच वेळा ऐकू येतं, ‘बघा, मी इतकी मदत केली यांना, पण साधं ‘थँक्यू’सुद्धा म्हटलं नाही मला. किंवा इतकं सगळं केलं पण क्रेडीट भलताच घेऊन गेला वगैरे. सामान्यतः बहुतेकांचं असंच होतं आणि ज्याना असं वाटत नाही ते मात्र खरोखर महान मानले पाहिजेत.

परवा दोन व्यक्तींचा संवाद कानावर पडला. त्यापैकी एक व्यक्ती होती एका मंदिराची व्यवस्थापक आणि दुसरी व्यक्ती होती एक सधन माणूस. पहिली व्यक्ती एका मंदिरात तन, मन, धन अर्पून सेवा करते. तिच्याच पुढाकाराने त्या मंदिराची स्थापना झाली होती व तिच्या प्रयत्नाने मंदिराचा उत्कर्ष होत चालला आहे. मंदिरातील पूजा-अर्चा, भजन-पूजन, जप-जाप्य याबरोबरच इतर समाजोपयोगी कार्यही चालले आहेत. बालकांसाठी संस्कारवर्ग भरवले जातात. निरनिराळ्या सणांच्या निमित्ताने मुलांसाठी, युवक-युवतींसाठी, महिलांसाठी निरनिराळ्या स्पर्धांचे आयोजन केले जाते. निरामय आयुष्यासाठी शिबिरे भरवली जातात. आयुर्वेदिक वैद्यांना पाचारण केले जाते. योग्य दरात औषधे उपलब्ध केली जातात. मोफत तपासणी केली जाते. एकूण काय, तर चारही अंगानी समाजासाठी काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न केला जातो.
अर्थातच हे काही एका व्यक्तीकडून पार पडण्याजोगं काम नाही. त्या मंदिराच्या संपर्कात येणारा प्रत्येक भक्त आपआपल्या परीने या कार्याला हातभार लावतो. कुणी अर्थदान करतो, कुणी अन्नदान, कुणी श्रमदान तर कुणी समयदान करतो. या सर्वांना हे समाधान असणारच की आपण हे जे दान करतो ते चांगल्या कामासाठी म्हणजेच सत्पात्री करतो. आपल्या पूर्वज ऋषिमुनींनीच लिहून ठेवले आहे की फक्त दान करणं हे महत्वाचं नसतं तर ते सत्पात्री असलं पाहिजे. नपेक्षा अशा दानानं पुण्य प्राप्त होण्याऐवजी पदरी पापच जमा होईल.

हां! तर त्या दोन व्यक्तींपैकी सधन व्यक्तीला त्या मंदिरासाठी काही रक्कम दान करायची होती. ती व्यक्ती त्या मंदिराच्या व्यवस्थापकांना म्हणाली की आपल्याला मंदिरासाठी दान म्हणून काही रक्कम द्यायची आहे ती कोणाजवळ द्यायची? व्यवस्थापक म्हणाले, ‘तुम्ही मंदिरात येऊन ती रक्कम देऊन रीतसर पावती घेऊन जाऊ शकता, किंवा माझ्याजवळ दिल्यास मी तुम्हाला पावती आणून देईन.’
ती व्यक्ती म्हणाली, ‘मी देणार असलेली रक्तम चांगली मोठी (म्हणजे लाखांत) आहे. पण मला सांगा तुम्ही ही रक्कम कोणत्या कामासाठी वापरणार?’
यावर व्यवस्थापक महाशय म्हणाले, ‘हे पहा, आपण दान देताय ना? मग देण्याचं कार्य तुमचं. नंतर त्याचं काय होईल याचा विचार आपण करू नये. आपण कोणत्याही मंदिरात जातो, यथाशक्ती दानपेटीत दान टाकतो. त्यावेळी आपण हा विचार करतो का की या पैशाचं पुढं काय होईल? एवढंच आपल्याला सांगतो की आपल्या दानाचा विनियोग चांगल्या कार्यासाठीच होईल.’

आता या उत्तराने त्या व्यक्तीचं समाधान झालं की नाही, आणि त्यांनी दान केलं की नाही याबाबत मी अनभिज्ञ आहे. पण या संवादाने मला विचार करायला प्रवृत्त केलं. दोन्ही व्यक्ती आपआपल्या जागी योग्य होत्या. मंदिराचे व्यवस्थापक निःस्वार्थ बुद्धीने आपलं कार्य करत असल्यामुळे कुणाही दात्याने केलेले दान योग्य ठिकाणीच मंदिराच्या, समाजसेवेच्या कार्यासाठीच खर्च केले जाणार आहे याची त्यांना स्वतःला खात्री होती. पण दात्या व्यक्तीचं म्हणणंही चुकीचं नसावं. कारण आपण सत्‌पात्री दान करत आहोत याची त्यांनाही खात्री हवी होती ना!
सध्या बर्‍याच सार्वजनिक संस्थामधून अफरातफरीचे प्रकार ऐकू येतात. मोठ्या मोठ्या देवस्थानातून जमा झालेले पैसे कसे व कुठे खर्च होतात ते कळत नाही. बुवाबाजीचं तर पेवच फुटलं आहे. एखाद्या भोंदूबुवाला साधू समजून लोक दान करतात आणि सरतेशेवटी त्याचं खरं रुप समाजापुढं येतं. अशावेळी आपले पैसे गेले यापेक्षा आपण अपात्री दान केल्याची खंत वाटते.
समाजसेवी सार्वजनिक संस्थाना दान करतानासुद्धा त्या संस्थेचं कार्य कसं चाललंय? खरंच आपलं दान सत्कारणी लागतंय ना? याची खात्री करून घेतलीच पाहिजे. कारण हे सत्ययुग नसून कलीयुग आहे. सत्ययुगाप्रमाणे आता कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवणे योग्य नाही.

दान घेणार्‍या संस्थानी आपले सारे व्यवहार पारदर्शक ठेवले पाहिजेत. कुणालाही संशयाला जागा ठेऊ नये. आपले कार्य कसे चालते, जनतेने केलेले दान आपण कसे मार्गी लावतो.. हे जनतेपुढे ठेवले पाहिजे. भ्रष्ट व्यक्ती आपल्या संपर्कात आल्या तर त्यांना वेळीच दूर केले पाहिजे. विश्वास संपादन करणे ही खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही विश्वास प्राप्त केलात की जनता तुमच्या पाठीशी असते.
अशाही काही संस्था आहेत की ज्यांच्याबद्दल दाता म्हणतो, ‘या संस्थेला दान केलं ना की मी निर्धास्त असतो. त्या दिवशी मला शांत झोप लागते कारण मला खात्री आहे की माझे हे दान सत्कारणीच लागणार आहे.’ असा विश्वास हवा.