दहा भुंगे ‘कमळा’त!

0
99
  • गुरुदास सावळ

गोवा विधानसभेचे विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाच्या दोन तृतियांश सदस्यांना भाजपामध्ये विलीन करून राजकीय आघाडीवर नवा इतिहास घडविला आहे. गेल्या महिन्यात मगो पक्षाचे दोन तृतीयांश आमदार अशाच प्रकारे भाजपात विलीन झाले होते. कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाचे विलिनीकरण तिन्हीसांजेला झाले, तर मगोचे विलिनीकरण मध्यरात्रीनंतर झाले होते. आपले राजकीय नेते वेळ आली की किती सक्रिय बनतात हे या दोन घटनांवरून सिद्ध होते. हीच कार्यक्षमता आमच्या लोकप्रतिनिधींनी एरव्ही दाखविली असती तर गोव्याचा मोठ्या प्रमाणात कायापालट झाला असता.

फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी कॉंग्रेसला १७, तर भाजपाला १३ जागा दिल्या. मगो आणि गोवा फॉरवर्डला प्रत्येकी ३ तर राष्ट्रवादी कॉंग्रेसला एक जागा दिली. तीन अपक्षांनी बाजी मारली. नवा मुख्यमंत्री कोणी व्हावे यावर कॉंग्रेसचे एकमत होऊ न शकल्याने तेरा आमदार असलेल्या भाजपाने मगो, गोवा फॉरवर्ड तसेच अपक्ष आमदारांचा पाठिंबा मिळवून सत्ता काबीज केली. केंद्रात भाजपाचेच सरकार असल्याने भाजपाचे सरकार बनविणे सहज शक्य झाले. मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर आजारी पडले नसते तर अशा परिस्थितीतही भाजपा सरकारने पाच वर्षे पूर्ण केली असती. पर्रीकर यांचे आजारपण दिवसेंदिवस वाढत गेले आणि गेल्या १७ मार्चला त्यांचे निधन झाले.

पर्रीकर यांच्यानंतर डॉ. प्रमोद सावंत यांनी सरकारचे नेतृत्व करावे अशी खुद्द पर्रीकर तसेच भाजपाचीही इच्छा होती. गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई व मगोचे सुदिन ढवळीकर यांनी त्यांना विरोध केला. मात्र भाजपाचे केंद्रीय नेते डॉ. सावंत यांनाच मुख्यमंत्री करण्यावर ठाम राहिल्याने सरदेसाई किंवा ढवळीकर यांचे काही चालले नाही. डॉ. सावंत यांचे नेतृत्व त्यांना स्वीकारावेच लागले. मात्र आपल्या नावामागे उपमुख्यमंत्री हे बिरुद त्यांना मिळाले. डॉ. सावंत यांना या दोघांची दादागिरी मान्य नव्हती व संधी मिळताच त्यांनी मगो पक्षात फूट पाडून बाबू आजगावकर व दीपक प्रभू पाऊसकर यांना भाजपाच्या कळपात सामील करून घेतले आणि सुदिन ढवळीकर यांना डच्चू दिला. अर्थात शिरोडा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा अट्टाहास धरून मगोनेच ही परिस्थिती ओढवून आणली.

मगोचे सुदिन ढवळीकर यांना सरकारमधून हाकलून लावल्यावर गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई यांचे पंख कापण्याचे डावपेच भाजपाने सुरू केले. भाजपाला विविध प्रश्‍नांवर संकटात टाकणारे उपसभापती मायकल लोबो यांची ढाल पुढे करून भाजपाने गोवा फॉरवर्डमध्ये असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मंत्र्यांना अतिरिक्त खाती देताना विनोद पालयेकर यांना कोणतेच खाते दिले नाही. त्यानंतर लोबो यांची मंत्रिमंडळात वर्णी लावण्यासाठी पालयेकर यांना राजीनामा द्यायला सांगा अशी सूचना पक्षाचे नेते विजय सरदेसाई यांना केली. मायकल लोबो हे आमचे मित्र असले तरी त्यांच्यासाठी विनोद पालयेकर मंत्रिपदाचा राजीनामा देणार नाहीत ही गोष्ट विजय सरदेसाई यांनी स्पष्ट केली. यानंतर मुरगावचे आमदार मिलिंद नाईक यांनी राजीनामा द्यावा असा प्रस्ताव पुढे करण्यात आला. कॉंग्रेसचे १० मासे गळाला लागले नसते तर मिलिंद नाईक यांचा बळी देऊन मायकल लोबो यांना मंत्री केलेच असते.

१९८० पासून गोव्यात पक्षांतराची लाट सुरू झाली. कॉंग्रेस अर्सच्या निशाणीवर निवडून आलेले सर्व कॉंग्रेस आमदार एका रात्रीत कॉंग्रेस (आय) झाले आणि गोव्यात प्रतापसिंह राणे यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसचे सरकार आले. त्यापूर्वी १९६७ मध्ये गोव्यात के. बी. नाईक यांच्या नेतृत्वाखाली मगो पक्षात फूट पडली होती. त्यावेळी युगोचे पाच आमदार फोडून भाऊसाहेब बांदोडकर यांनी आपले सरकार तारले होते. त्यानंतर १९८९ मध्ये तर पक्षांतराचा कहरच झाला. सभापती डॉ. लुईस प्रोत बार्बोझा यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस आमदारांनी बंड केले. चर्चिल आलेमांव अठरा दिवसांचे मुख्यमंत्री बनले. डॉ. बार्बोझा यांच्या नेतृत्वाखाली पुलोआ सरकार आले पण ते फार काळ टिकले नाही. हे सरकार कोसळल्यानंतर रवी नाईक यांनी मगो पक्षात फूट पाडली आणि कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर ते मुख्यमंत्री बनले. कॉंग्रेसचे आमदार सुरेश परुळेकर यांनी हे पक्षांतर व सत्तांतर नाट्य घडवून आणले होते. त्यानंतर २००५ पर्यंत गोव्यात राजकीय अस्थिरता चालूच राहिली. पक्षांतरबंदी कायद्यात ज्या नानाविध दुरुस्त्या करण्यात आल्या त्या गोव्यातील घटनांमुळेच कराव्या लागल्या होत्या. त्यामुळे पक्षांतराला बर्‍याच प्रमाणात आळा बसला होता.

पक्षांतरबंदी कायदा लागू असतानाही गोव्यात आता घाऊक पक्षांतर झालेले आहे. कॉंग्रेसचे विधानसभेत १५ आमदार असल्याने दोन तृतियांशचा आकडा गाठण्यासाठी १० आमदारांची गरज होती. फ्रान्सिस सिल्वेरा, इजिदोर फर्नांडिस व क्लाफासियो डायस हे तीन आमदार फुटण्यास तयार असल्याची वदंता गेला महिनाभर पसरली होती. क्लाफासियो डायस यांनी तर आपल्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांना तशी कल्पनाही दिली होती. तीन-चार आमदार फुटले असते तर त्यांना आमदारकी गमवावी लागली असती. आमदारकीचा राजीनामा दिल्यास परत निवडून येणे किती कठीण आहे याची कल्पना शिरोडा व मांद्रे मतदारसंघांत आली होती. पणजीत तर भाजपाला स्व. मनोहर पर्रीकर यांची जागा गमवावी लागली होती. त्यामुळे आमदारकीचे राजीनामे देऊन भाजपाप्रवेश करण्यास कोणीच तयार नव्हते. त्यामुळे श्रीमती सोनिया गांधी यांना अत्यंत जवळ असलेले विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनाच