दहावी, बारावीची परीक्षा १७ मे नंतरच

0
182

>> १० दिवस आधी तारीख जाहीर करणार, मुख्यमंत्र्यांची माहिती

लॉकडाऊनच्या काळात राज्यातील दहावी, बारावीची परीक्षा घेणे शक्य नाही. येत्या १७ मे नंतरच परीक्षेचे वेळापत्रक निश्‍चित केले जाऊ शकते. दहावी, बारावीच्या परीक्षेची तारीख १० दिवस अगोदर जाहीर केली जाणार आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहून समुपदेशन करावे, असे आवाहन माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेत काल केले.

राज्यातील खासगी डेंटल क्लिनिक सुरू करण्यास राज्य कार्यकारी समितीने मान्यता दिली आहे. डॉक्टरांनी आवश्यक दिशानिर्देशांचे पालन करून आपली डेंटल क्लिनिक सुरू करून रुग्णसेवेला सुरुवात करावी. या सेवेसाठी वेगळा अध्यादेश जारी केला जाणार नाही, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

मजुरांसाठी दोन रेल्वे
परराज्यात जाण्यासाठी इच्छुक असलेल्या मजुरांची संख्या ८० हजारांवर पोहोचली आहे. या मजुरांच्या सोयीसाठी दोन खास रेल्वे गाड्यांची व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. केंद्राकडून परवानगी मिळाल्यानंतर दोन दिवसात एक रेल्वे गाडी सोडण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

नेपाळींनाही पाठवणार
राज्यातील नेपाळी नागरिकांना परत पाठविण्याची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाणार आहे. नेपाळी नागरिकांनी नगरपालिका, ग्रामपंचायतीमध्ये नोंदणी करावी. सदर माहिती विदेश मंत्रालयाकडे सादर करून त्यांना परत पाठविण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

होम क्वारंटाईन केलेल्यांनी घराबाहेर पडू नये
होम क्वारंटाईन करण्यात आलेल्या व्यक्ती घराबाहेर फिरत असल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी, अशी व्यक्तींची पेड क्वारंटाईऩ व्यवस्थेत रवानगी केली जाणार आहे. परराज्यातून येणार्‍याची तपासणी करून त्यांना होम क्वारंटाईन केले जात आहेत. त्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले. लॉकडाऊनमुळे अनेक व्यावसायिकांना आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागले आहे. सर्व व्यावसायिकांकडून आर्थिक मदतीची मागणी केली जात आहे. राज्याकडे तेवढी निधी असायला हवा. आर्थिक पुनरुज्जीवन समिती आर्थिक सहकार्य करण्याबाबत अभ्यास करीत आहे. या समितीकडे आर्थिक मदतीसंबंधीच्या सूचना सादर केल्या जाऊ शकतात, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

घरमालक, गेस्ट हाउस, हॉटेल मालकांनी त्यांच्याकडे राहत असलेल्या विदेशी नागरिकांची माहिती स्थानिक पोलीस स्थानकानवर द्यावी. राज्यात मोठ्या प्रमाणात विदेश राहत आहेत. त्यांच्याबाबत सरकारी यंत्रणेकडे माहिती उपलब्ध असणे आवश्यक आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

केंद्रीय लोकसेवा आयोगाची
परीक्षाही लांबणीवर

केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे ३१ मे रोजी होऊ घातलेल्या परीक्षा कोरोना आपत्तीच्या पार्श्‍वभूमीवर पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आल्यामुळे व विविध निर्बंध जारी करण्यात आल्यामुळे ही परीक्षा तसेच मुलाखती घेणे शक्य होणार नसल्याचे आयोगाने म्हटले आहे. भारतीय वनसेवा परीक्षेसाठीची छाननीही या परीक्षेद्वारे होत असल्यामुळे वनसेवा परीक्षाही पुढे ढकलण्यात आली आहे असे आयोगाने म्हटले आहे.