दहावीच्या विज्ञान प्रश्‍नपत्रिकेविषयी पालकही मंडळाला जाब विचारणार

0
71

गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या नवीन पद्धतीच्या दहावीच्या विज्ञान प्रश्‍नपत्रिकेचे गांभीर्य वाढत चालले आहे. गोवा मुख्याध्यापक संघटनेनंतर काही पालकांनी सुध्दा मंडळाला निवेदन सादर करण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. शालान्त मंडळ आपली जबाबदारी झटकू शकत नाही, अशा प्रतिक्रिया पालकांकडून व्यक्त केल्या जात आहेत.

दहावीच्या विज्ञान प्रश्‍नपत्रिकेच्या बदललेल्या स्वरूपाबाबत पालक, शिक्षण संस्था आणि शिक्षकवर्गात चिंता व्यक्त केली जात आहे. बदललेल्या प्रश्‍न पत्रिकेमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्यास कोणाला जबाबदार धरावे, असा प्रश्‍न विचारला जात आहे.

विज्ञान प्रश्‍नपत्रिका अवघड गेल्याने बरेच पालक, विद्यार्थी व शिक्षक चिंतेत पडले आहेत. तर दुसर्‍या बाजूने शालान्त मंडळ विज्ञान प्रश्‍नपत्रिकेबाबत ठाम आहे. प्रश्‍नपत्रिकेच्या नवीन स्वरूपाबाबत सप्टेंबर महिन्यात विज्ञान शिक्षकांना माहिती दिल्याचा दावा केला जात आहे. परंतु, विद्यार्थ्यांना नवीन पद्धतीच्या प्रश्‍न पत्रिकेबाबत योग्य मार्गदर्शन करण्यात न आल्याने अनेक विद्यार्थ्यांना प्रश्‍नपत्रिका सोडविताना अडचणींना तोंड द्यावे लागले आहे, अशी तक्रार आहे. नवीन पद्धतीच्या प्रश्‍नपत्रिकेबाबत मुलांना माहिती दिली की नाही? याची खातरजमा मंडळाने करून घ्यायला हवी होती, असे मत पालकांकडून व्यक्त केले जात आहे.

प्रश्‍नपत्रिका पाठ्यक्रमानुसार तयार करण्यात आली तरी प्रश्‍नपत्रिकेची रचना वेगळ्या पद्धतीने करण्यात आली होती. दहावीच्या सराव परीक्षेच्या वेळी अशा प्रकारची प्रश्‍नपत्रिका का देण्यात आली नाही? असा प्रश्‍न पालकांकडून केला जात आहे. विज्ञान प्रश्‍नपत्रिकेबाबत विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे. विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाल्यास त्याला मंडळाला जबाबदार धरण्याचा इशारा पालकांनी दिला आहे.