दहावीचा गोंधळ

0
132

गोव्याच्या नुकत्याच संपलेल्या शालांत परीक्षेच्या गणित आणि विज्ञान विषयाच्या प्रश्नपत्रिकांसंदर्भात विद्यार्थ्यांमधून आणि विशेषतः पालकांमधून तीव्र नाराजीचे सूर ऐकू येत आहेत. गणिताच्या प्रश्नपत्रिकेतील तीन प्रश्नांबाबत पालक नाराजी दर्शवीत होते, तर त्यानंतर विज्ञानाच्या प्रश्नपत्रिकेतील जवळजवळ सर्वच प्रश्न नेहमीपेक्षा वेगळ्या पठडीतले विचारले गेल्याने विद्यार्थ्यांना समजले नसल्याची तक्रार ऐकू आली. ही तक्रार एखाद्या विशिष्ट शाळेच्या विद्यार्थ्यांकडून आलेली नाही, तर ती सार्वत्रिक दिसते. म्हणजे गोव्याच्या वेगवेगळ्या भागातील विद्यार्थी व पालक यांची हीच तक्रार आहे. याचा अर्थ त्यामध्ये काही तथ्यांश असला पाहिजे. अशा प्रकारची तक्रार बारावीच्या पदार्थविज्ञानाच्या प्रश्नपत्रिकेसंदर्भातही विद्यार्थ्यांकडून आलेली होती. विद्यार्थी आणि पालकांकडून अशी काही तक्रार आली की शालांत शिक्षण मंडळाचे नवनियुक्त अध्यक्ष नेहमीच्या पठडीतले उत्तर देताना दिसतात की, ‘प्रश्न थोडे कठीण होते हे खरे, परंतु ते अभ्यासक्रमाबाहेरचे नाहीत आणि आमच्या छाननी समितीने केलेल्या छाननीत त्यात काही चुका दिसून आलेल्या नाहीत.’ वर वर पाहता त्यांची ही प्रतिक्रिया योग्य वाटते, परंतु येथे मूलभूत प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे तुम्ही भले प्रश्नपत्रिकेतील प्रश्न हव्या त्या पद्धतीने वळवून, वाकवून विचारत असता, परंतु गोव्याच्या शालेय शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या चाकोरीबाहेरील प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी तयार केलेले असते काय? जवळजवळ सर्व शाळांमध्ेय शिक्षकांचा आणि विद्यार्थ्यांचा भर हा घोकम्‌पट्टीवर असतो. त्यामुळे परीक्षेमध्ये जरा इकडचा तिकडचा प्रश्न आला की मुलांची भंबेरी उडते आणि पालकांमध्ये अस्वस्थता पसरते. दहावीच्या गणिताच्या पेपरमध्ये हेच घडले. अनेक मुलांना प्रश्नपत्रिका पाहून रडू कोसळले, काहींना तर घेरी आल्याने रुग्णवाहिका बोलवाव्या लागल्या. मुळात आपल्या दहावीच्या मुलांना जर त्यांच्या शिक्षकांनी अभ्यासक्रमातील संकल्पना नीट समजावून दिलेल्याच नसतील, तर मग अशा प्रकारचे फिरवलेले प्रश्न विचारण्याचा शालांत मंडळाला काय अधिकार? शहरी भागातील नावाजलेल्या शाळांतील मुलांनाच जिथे ही प्रश्नपत्रिका कठीण गेली, तेथे खेड्यापाड्यांतील विद्यालयांतील मुलांची काय स्थिती झाली असेल कल्पना करता येते. आठवीपर्यंत मुलांना पुढे ढकलत राहायचे आणि नववी दहावीमध्ये मुलांकडून एकदम चमत्काराची अपेक्षा करायची असे घडू शकत नाही. दहावीच्या विज्ञानाच्या प्रश्नपत्रिकेतील ‘ऍप्लिकेशन’ प्रकारच्या प्रश्नांचे प्रमाण गतवर्षीपेक्षा कितीतरी अधिक आहे. दरवर्षी अशा प्रकारच्या प्रश्नांचे प्रमाण थोडे थोडे वाढवत नेणार ही शालांत मंडळाची भूमिका जरी मान्य केली, तरीही शाळांना पाठवलेल्या नमुना प्रश्नपत्रिकेपेक्षा फार वरच्या दर्जाची प्रश्नपत्रिका सोडविण्याची अपेक्षा तुम्ही दहावीच्या सर्वसाधारण विज्ञानाच्या विद्यार्थ्यांकडून कशी काय करू शकता? त्यामुळे प्रश्नपत्रिकांतील प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरचे नव्हते असे सांगून शालांत मंडळाला आपली जबाबदारी झटकता येणार नाही. पठडीबाहेरचे प्रश्न विचारणार्‍यांनी मुळात विद्यार्थ्यांना ते प्रश्न समजतील का, आपल्या शाळांमधून मुलांना त्या दर्जाचे शिक्षण दिले गेलेले आहे का, याचा विचार करणे आवश्यक होते. ते घडलेले येथे दिसत नाही. त्यामुळे खुद्द गोवा मुख्याध्यापक संघटनेनेच या प्रश्नपत्रिकेला आक्षेप घेतलेला आहे आणि शालांत मंडळाला निवेदन दिलेले आहे. या विषयाचा पाठपुरावा ही संघटना करील अशी अपेक्षा आहे. खुद्द शिक्षकांनाच जिथे या प्रश्नपत्रिकांतील प्रश्न कठीण वाटले, तेथे विद्यार्थ्यांकडून कसली अपेक्षा करता? आडात नसेल तर पोहर्‍यात येणे कठीण असते. त्यामुळे आधी आडामध्ये पाणी खेळू द्या, नंतर ते पोहर्‍यात आणायची तजवीज करा. गेल्यावर्षी मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दहावी – बारावीच्या निकालानंतर शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. दहावी बारावीचा निकाल अपेक्षेपेक्षा गतवर्षी चांगला लागल्याने आणि पैकीच्या पैकी गुण मिळवणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या मोठी दिसल्याने मुख्यमंत्री नाराज झाले होते. त्यामुळे यंदा तसे घडू नये यासाठी शालांत मंडळाने आणि संबंधित शिक्षकांनी ही खबरदारी घेतली असावी. परंतु केवळ घोषणाबाजीतून शैक्षणिक गुणवत्ता वाढत नसते. प्रश्नपत्रिका कठीण काढली आणि त्यामुळे निकाल कमी लागला याचा अर्थ गुणवत्ता वाढली असा होत नाही. विद्यार्थ्यांना यावेळी प्रश्नपत्रिका कठीण वाटल्या याचा दोष विद्यार्थ्यांपेक्षा शिक्षकांचा अधिक आहे. त्यांनी या मुलांना त्यासाठी समर्थ बनवले नाही असाच याचा अर्थ होतो. ज्या प्रकारची प्रश्नपत्रिका काढली जाईल असे या शाळांमधील शिक्षकांना सांगण्यात आले होते, त्या प्रकारच्या प्रश्नपत्रिकेस सामोरे जाण्याची तयारी या शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून करून घेतली. मग एकाएकी वेगळ्याच प्रकारची प्रश्नपत्रिका कशी काढली जाऊ शकते? शालांत मंडळाने या विषयात आता लक्ष घातले नाही तर तो विद्यार्थ्यांवर – विशेषतः खेड्यापाड्यांतील ग्रामीण विद्यार्थ्यांवर घोर अन्यायच ठरेल.