दहशतवादाच्या गर्तेत अफगाणिस्तान

0
240

– दत्ता भि. नाईक

मिरझ्वालांग या गावावर दहशतवाद्यांनी ताबा मिळवलेला आहे. तेथील शांतता म्हणजे एकप्रकारची जीवघेणी शांतता आहे. यापूर्वी तालिबान व इस्लामिक स्टेट एकमेकांशी वर्चस्वासाठी लढत होते, आता हे दोन्ही गट एकत्र येऊन अफगाणिस्तानवर वर्चस्व गाजवण्यासाठी दहशत माजवीत आहेत.

अफगाणिस्तानमधील उत्तर सर-ए-पुल नावाचा प्रांत, त्यातील अडगळीच्या ठिकाणी वसलेला सयाद जिल्हा, त्यात निवांतपणे वसलेले मिरझ्वालांग हे शेतीप्रधान गाव. या गावात शनिवार दि. ५ ऑगस्ट रोजी तालिबान व इस्लामिक स्टेट यांच्या दहशतवाद्यांनी एकत्रितपणे हल्ला चढवून नागरिक व पोलिसांसह पन्नासहून अधिक लोकांचा खातमा केला. प्रांताच्या गव्हर्नरचा प्रवक्ता असलेले झहीउल्लाह अमानी याच्या म्हणण्याप्रमाणे, त्या ठिकाणी असलेले पोलीस व अन्य सुरक्षा यंत्रणा आणि दहशतवादी यांच्यात अड्डेचाळीस तास अक्षरशः युद्ध चालू होते. या चकमकीत चव्वेचाळीस नागरिकांचा बळी गेला असून त्यात वृद्ध स्त्री-पुरुष व मुलांचाही अंतर्भाव आहे. दहशतवाद्यांनी काहींना बंदुकीची गोळी झाडून ठार मारले, तर काहींचे गळे चिरून हत्या केली. त्या ठिकाणची सुरक्षाव्यवस्था अपुरी पडल्याची कबुलीही या प्रवक्त्याने दिली.
सर-ए-पुल प्रांताच्या प्रादेशिक मंडळाचे सदस्य असलेले नूर रहमानी म्हणाले की, मृतांचा आकडा अजूनही वाढू शकतो. चकमक थांबलेली आहे, परंतु या गावावर दहशतवाद्यांनी ताबा मिळवलेला आहे. तेथील शांतता म्हणजे एकप्रकारची जीवघेणी शांतता आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, यापूर्वी तालिबान व इस्लामिक स्टेट दोघेही एकमेकांशी वर्चस्वासाठी लढत होते, आता हे दोन्ही गट एकत्र येऊन अफगाणिस्तानवर वर्चस्व गाजवण्यासाठी दहशत माजवीत आहेत.
तालिबानचा प्रवक्ता झबीबुल्लाह मुजाहिद याने मिरझ्वालांग गाव त्यांच्या ताब्यात आल्याची घोषणा केली असून या मोहिमेसाठी त्यांनी इस्लामिक स्टेटची जरासुद्धा मदत घेतलेली नाही.
अहमदशाह दुराणी पहिला सुलतान
सतत युद्धाच्या आगीत होरपळणारा अफगाणिस्तान एकेकाळी भारताचा अविभाज्य भाग होता. द्यूत विद्येत प्रवीण असलेला शकुनीमामा गांधार म्हणजे कंदाहारचा राजा होता. कौरवांची पतिव्रता माता गांधारी या गांधारदेशाची राजकन्या होती. पहिला मोगल जेव्हा अफगाणिस्तानात आला तेव्हा त्याने ‘मी हिंदुस्तानात पोचलो’ असे म्हटल्याची नोंद आहे. सततच्या इस्लामीकरणामुळे हा प्रदेश भारतापासून वेगळा पडला तरी भारताबद्दलची या देशातील जनतेची आपुलकी कमी झालेली नाही.
सन १७४७ मध्ये अहमदशाह दुराणी याने अफगाणिस्तानला राष्ट्राचे स्वरूप दिले. तो देशाचा पहिला सुलतान. त्यानंतर या प्रदेशावर वर्चस्व स्थापन करता यावे म्हणून झारचे रशियन साम्राज्य व इंग्रज यांमध्ये युद्धे झाली. अफगाणिस्तानवर इंग्रजांचे वर्चस्व राहिले तरीही देशाचे स्वतंत्र अस्तित्व अबाधित राहिले. १९१९ मध्ये इंग्रजांचे वर्चस्व संपुष्टात येऊन देश पूर्णपणे स्वतंत्र झाला. १९७३ मध्ये राजेशाहीचा अंत होऊन मोहम्मद दाऊद खान याच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तानचे प्रजासत्ताक अस्तित्वात आले.
साम्राज्यवादी झारची अपुरी राहिलेली इच्छा पूर्ण करण्याकरिता साम्राज्यवाद विरोधाचा डंका पिटणार्‍या सोव्हिएत रशियाने १९७९ च्या डिसेंबरमध्ये अफगाणिस्तानमध्ये सेनादले पाठवली. दहा वर्षांनंतर १९८९ साली सोव्हिएत रशियाला अफगाणिस्तानच्या देशभक्तीपुढे नामोहरम होऊन माघारी जावे लागले. यानंतर ले. जनरल नजीबुल्लाह याच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आले. तालिबान ही पाकिस्तानने स्वतःचे साम्राज्य पसरवण्यासाठी स्थापन केलेली दहशतवादी संघटना. १९९६ च्या डिसेंबरमध्ये तालिबानने संपूर्ण अफगाणिस्तानवर वर्चस्व स्थापन केले. नजीबुल्लाह हा भारताशी जवळीक ठेवणारा होता म्हणून त्याला व रब्बानी यांना ठार मारून त्यांची प्रेते विजेच्या खांबावर लटकावून ठेवली होती.
वडिलांसोबत सेल्फी घेतली म्हणून…
यापूर्वी २ ऑगस्ट रोजी हेरात शहरातील शिया मुसलमानांच्या जवाड्या मशिदीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यात सदतीस जण ठार झाले. याला कारण होते जुलैच्या मध्यास चौदा वर्षीय फतेहमान कायरयान या मुलीने अमेरिकेसाठी प्रयाण करण्यापूर्वी हेरात विमानतळावर स्वतःच्या वडिलांसोबत सेल्फी घेतली. अमेरिकेमध्ये यंत्रमानवाच्या संबंधाने आयोजित स्पर्धेसाठी ती जात होती. ‘फर्स्ट ग्लोबल चॅलेंज इंटरनॅशनल रोबोटिक्स कॉम्पिटेशन’ असे या स्पर्धेचे शीर्षक होते. फतेहमान हिचे वडील मोहम्मद कादरयान यांनी त्यांच्या मुलीच्या नेतृत्वाखाली अमेरिकेला जाणार्‍या कन्यांच्या चमूला व्हिसा मिळवून देण्यासाठी सरकारदरबारी हेलपाटे घालण्यापासून ते विमानतळावर निरोप देण्यापर्यंतच्या संपूर्ण कार्यक्रमात सहभाग दिला होता. त्यानंतर यशस्वी होऊन आलेल्या ‘करेनस ऍचिव्हमेंट’चे प्रमाणपत्र घेऊन आलेल्या या कन्यकांचे स्वागत व सन्मान करण्यातही त्यांचा वाटा होता. अमेरिकेतील परीक्षकांनी फतेहमान हिचे कौतुक केल्यामुळे मोहम्मद कादरयान हर्षभरीत झाले होते. हे मोहम्मद कादरयान मशिदीत प्रार्थनेसाठी गेले असताना त्यांचा खात्मा करण्यासाठीच सुन्नी दहशतवाद्यांनी शियांच्या मशिदीत कापाकापी केली.
सर्वसाधारणपणे असा एक समज आहे की, प्रार्थना करत असताना माणूस मरण पावला वा मारला गेला की तो सरळ स्वर्गात जातो. शेक्सपिअरने ‘हॅम्लेट’मध्येही याचा उल्लेख केलेला आहे. परंतु इतरांचा देव हा देव नव्हे, इतरांचा धर्म वा पंथ हा धर्म नव्हे व इतरांची प्रार्थना ही प्रार्थनाच नव्हे असे मानणार्‍यांविषयी न बोलणेच बरे होईल.
या घटनेने देश पूर्णपणे थराथरला. अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी हे व्यक्तिशः हेरात येथे जाऊन कादरयान यांच्या कुटुंबीयांना भेटले. तालिबान व हक्कानी नेटवर्कला आश्रय देणार्‍यांचा शोध घेऊन त्यांना ठेचून काढल्याशिवाय हे प्रकार थांबणार नाहीत, असेही वक्तव्य त्यांनी केले.
फक्त भारतावर मदार
सध्या अफगाणिस्तानमधील चारशे सात जिल्ह्यांपैकी पंचाण्णव जिल्ह्यांमध्ये तालिबानची सत्ता चालते. याविरुद्ध कारवाई करण्यात अमेरिका अजूनही पाकिस्तानची मदत घेत असते. अमेरिकेच्या लक्षात पाकिस्तानची स्वार्थी वृत्ती हळूहळू येऊ लागलेली आहे असे वाटते. अमेरिकेचे सुरक्षा सल्लागार ले. जनरल एच. आर. मॅकमास्टर यांनी या घटनेवर भाष्य करताना म्हटले आहे की, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तालिबान व हक्कानी नेटवर्क यांच्या आश्रयदात्यांचा शोध घेण्याची आवश्यकता व्यक्त केलेली आहे. यापुढे स्वतः मॅकमास्टर म्हणाले की, पाकिस्तानमधून केली जाणारी कारवाई निवडक असते, त्यामुळे हवा तसा परिणाम साधता येत नाही. यामुळे अमेरिकेकडून जास्तीत जास्त मदत व शस्त्रे मिळवून त्यांचा मर्यादित वापर करण्याचा पाकिस्तानचा डाव चांगल्यापैकी साधला जातो.
संयुक्त राष्ट्राने बनवलेल्या अहवालाप्रमाणे, सन २०१५-१६ मध्ये अफगाणिस्तानमध्ये १८,४१८ माणसे मारली गेली. त्यात कमीत कमी २४ टक्के लहान मुलांचा अंतर्भाव आहे. २०१७ सालच्या पहिल्या आठ महिन्यांतच हा आकडा १७०० च्या वर पोहोचला आहे.
भारतीय वर्तमानपत्रांच्या प्रतिनिधीशी बोलताना अफगाणिस्तानमधील एक ज्येष्ठ अधिकारी म्हणाला की, आमची खरी लढाई पाकिस्तानशीच आहे. अमेरिका, युरोपीय राष्ट्रांची संघटना ‘नाटो’ किंवा इराण यांपैकी कोणीही पाकिस्तानच्या नाकात वेसण घालू शकत नाही. आमची फक्त भारतावरच मदार आहे. हनिफ आत्मर असे या अधिकार्‍याचे नाव असून भारत या क्षेत्रात युद्ध भडकावीत असल्याचे वृत्त खोडसाळ असल्याचे त्याने म्हटले आहे.
अफगाणिस्तानमधील दुरहाम विद्यापीठात संशोधन करणार्‍या श्रींजय बोस या विद्यार्थ्याचे म्हणणे आहे की, इस्लामिक स्टेट व तालिबान याना अफगाणिस्तानमध्ये मध्ययुगीन ‘खोरासान’ राज्याची स्थापना करायची आहे. तालिबानशी बोलणी केल्यास शांतता नांदू शकते असे रशियाला वाटते. परंतु तसे केल्यास आतापर्यंत दहशतवादी म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या तालिबानला मान्यता दिल्यासारखे होईल. याशिवाय रशिया व चीन यांनी या प्रश्‍नात लक्ष घातल्यास दहशतवाद्यांचा बंदोबस्त होऊ शकतो. परंतु यामुळे अफगाणिस्तानमधील सांस्कृतिक वातावरणाला धोका उत्पन्न होईल. त्यामुळे जसजशी अमेरिका मागे हटेल तसतशी भारतीय सैन्यदलांची देशातील उपस्थिती वाढवणे हाच एकमेव पर्याय सध्यातरी समोर दिसतो. दहशतवाद्यांच्या गर्तेत सापडलेल्या अफगाणिस्तानला वाचवणे ही सध्याच्या आंतरराष्ट्रीय राजकारणाची निकडीची गोष्ट बनलेली आहे.