दरोडे रोखा

0
96

सालाबादप्रमाणे यावर्षीही गोव्यामध्ये दरोडे आणि घरफोड्या यांचे सत्र सुरू झाले आहे. घरमालकाला आणि त्याच्या कुटुंबाला बांधून घालून घर लुटण्यापर्यंत या लुटारूंची मजल गेलेली आहे. त्यामुळे साहजिकच सर्वत्र भीती आणि दहशतीचे वातावरण तयार झाले आहे. दवर्लीत जो दरोडा पडला त्यातील गुन्हेगार हिंदीतून बोलत होते. त्यामुळे ते परप्रांतीय असण्याची शक्यता आहे. परप्रांतीय टोळ्यांकडून असे दरोडे आणि घरफोड्या होणे हे आता गोवा आणि गोवेकरांना नवे राहिलेले नाही. यापूर्वी अशा टोळ्या पकडल्याही गेल्या आहेत, मात्र तरीही दरवर्षीचे हे सत्र काही थांबलेले नाही. चतुर्थीच्या काळात घरे बंद असतात तेव्हा चोर्‍या – दरोडे सुरू होतात. आता गोव्यात अवघे पोलीस दल सेंट फ्रान्सिस झेवियर अवशेष दर्शनाच्या सोहळ्याच्या व्यवस्थापनात गुंतलेले असल्याने त्याचा अचूक फायदा उठवत या टोळ्या गोव्यात डेरेदाखल झालेल्या आहेत. सध्या पर्यटनाचा हंगाम असल्याने पर्यटक असल्याच्या थाटात असे गट मुक्तपणे हिंडत असतात आणि मोक्याची घरे शोधून संधी मिळाली की लुटालूट करीत असतात. गोव्यात येणे, दरोडे टाकणे आणि पळून जाणे हे सगळे फार सुलभ झालेले आहे. कोकण रेल्वे ही तर या चोरट्यांच्या टोळ्यांसाठी वरदानच ठरलेली आहे. पण अलीकडे स्वतःच्या वाहनाने येऊन लुटालूट करून जाणारे चोरही निपजले आहेत. काही वर्षांपूर्वी अशीच एक टोळी पणजीच्या पोलीस निरीक्षकांच्या सतर्कतेमुळे पकडली गेली होती. पण ही सतर्कता एरवी दिसत नाही. खरे तर गोव्याच्या सीमा अधिक सुरक्षित करणे ही काळाची गरज आहे, परंतु त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष आजवर झालेले आहे. गोव्यातून परराज्यांत जाण्याच्या वाटा इन मिन चार – पाच. तेथे अधिक सतर्कता दाखवली जाऊ लागली, कडक तपासणी होऊ लागली, तर अशा टोळ्यांचा सुगावा लागणे काही कठीण नाही, परंतु आपले तपासणी नाके म्हणजे भ्रष्टाचाराची आणि निष्क्रियतेची आगरे झालेली आहेत. त्यामध्ये सुधारणा घडविण्याचा लाख प्रयत्न झाला तरी रात्रीबेरात्री सताड उघडे असणारे हे तपासणी नाके किती अक्षम्य बेपर्वाई चालते त्याचे दर्शन घडवीत असतात. कोणीही यावे आणि गोव्यात आपला वाट्टेल तो धंदा व्यवसाय करावा असे गोव्याला आज मुंबईसारखे कॉस्मोपॉलिटन स्वरूप आलेले आहे. त्यामुळे परप्रांतीयांचे लोंढेच्या लोंढे जिवाचा गोवा करायला गोव्याकडे निघाले आहेत. त्यांना विचारणारा कोणी नाही, उलट राजकारणी त्यांना येथे बस्तान बसवून द्यायला आतुर आहेत, कारण ते एकगठ्ठा मतांची तजवीज करीत असतात. गावोगावी या परप्रांतीयांच्या स्वागतासाठी गच्चीवर, परसात, अंगणात, वाट्टेल तिथे कायदेशीर – बेकायदेशीर खोल्या बांधून त्यांची सोय लावून दिलेली असते. भाडेकरू ठेवताना त्यांची माहिती आपल्याजवळ ठेवणे, पोलिसांना कळवणे अत्यावश्यक व कायद्याने बंधनकारक असूनही आपले भांडे फुटेल यासाठी तसे केले जात नाही. त्यामुळे अवघा गोवा ही एक धर्मशाळा बनलेली आहे. पोलीस यंत्रणेचा धाक तर समाजावर अजिबात नाही. त्यामुळे गोव्यात चोरीमारी करणारी टोळी येथे काही महिन्यांपुरती स्थायिक होऊ लागली तरी आश्चर्य वाटायला नको. मग एकेकटा पसार होणे सोपे असते. पोलिसांची गुप्तहेर आणि खबर्‍यांची यंत्रणा तर गेल्या काही वर्षांत पूर्णपणे कुचकामी ठरलेली आहे. त्यामुळे नागरिकांनी राहायचे तरी कोणाच्या भरवशावर? मनोहर पर्रीकर यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात पोलीस यंत्रणेवर त्यांचा गृहमंत्री या नात्याने पूर्ण वचक असे. आता नव्या मुख्यमंत्र्यांच्या काळात प्रशासनावर असा वचकही उरलेला दिसत नाही. त्यामुळे आलेली ढिलाई, बेशिस्त आणि बेफिकिरी यातून गोव्याच्या जनतेला असुरक्षिततेच्या खाईत ढकलले गेले आहे. खरे तर गोवा एवढा छोटा आहे की त्याच्या सुरक्षेचे नियोजन करणे तुलनेने फार सोपे आहे. मोक्याच्या ठिकाणी रात्रीची नाकेबंदी, गस्त, निवासी वस्त्यांमध्ये खासगी सुरक्षा रक्षकांचे योग्य प्रशिक्षण, सीसीटीव्हीसारख्या अत्याधुनिक साधनांचा वापर, खबर्‍यांचे जाळे विणणे, नागरिकांच्या सुरक्षा समित्या नेमणे आदींद्वारे चोरा दरोडेखोरांचा बंदोबस्त करणे शक्य आहे. परंतु त्यासाठी लागणारे खंबीर नेतृत्व पोलीस दलापाशी आज दिसत नाही. या सार्‍यातून गोमंतकीयांना आज फार असुरक्षित वाटू लागले आहे. आणि ही असुरक्षितता अनाठायी नाही.