दयानंद योजनेतील बनावट लाभार्थींना वसुली नोटिसा

0
110

गोवा सरकारच्या समाज कल्याण खात्याच्या दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेतील जे नकली लाभार्थी आहेत त्यांच्याकडून पैसे वसुल करण्यासाठी खात्याने त्यांना नोटीसा पाठवण्याचे काम सुरू केले आहे. खात्याने केलेल्या चौकशीत तब्बल ११ हजार लाभार्थी हे नकली असल्याचे आढळून आलेले आहे. ह्या ११ हजारांपैकी सुमारे ८ हजार लाभार्थींचा मृत्यू झालेला असून त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे कुटुंबीय त्यांच्या एटीएम कार्डचा वापर करून योजनेखाली त्यांच्या खात्यात जमा होणारे पैसे काढत असल्याचे खात्याला आढळून आलेले आहे.

अन्य ३ हजार नकली लाभार्थी हे खात्याची वेगळ्या प्रकारे फसवणूक करणारे आहेत.
या सर्व नकली लाभार्थींना आता नोटीस पाठवण्यात आलेल्या असून त्यांचे धाबे दणाणले आहे. यापैकी काही जण हे गेल्या बर्‍याच काळापासून सरकारची फसवणूक करीत आले असल्याचे आढळून आलेले आहे.
सरकारला फसवून ज्या लोकांनी ह्या योजनेचे पैसे घेऊन लंपास केले आहेत त्या सर्वांना हे सरकारी पैसे परत फेडावे लागणार असल्याचे समाज कल्याण खात्यातील सूत्रानी सांगितले.