दक्षिण ध्रुव

0
253

विशेष संपादकीय

 

द्रविडी अस्मितेचे कैवारी आणि द्रमुकचे आधारस्तंभ मुथुवेल करुणानिधी यांच्या निधनाने तामीळनाडूच्या राजकारणातील एक मोठे पर्व संपले आहे. यापूर्वी जे. जयललिता यांच्या निधनाने तामीळनाडूच्या दोन ध्रुवांपैकी एक तारा निखळला होता. आता करुणानिधीही अनंताच्या यात्रेला निघून गेले आहेत. प्रदीर्घ काळ चाललेल्या आणि पराकोटीच्या तीव्र राजकीय संघर्षाची अखेर इतिश्री झाली आहे. पाच वेळा राज्याचे मुख्यमंत्री, तेरा वेळा आमदार आणि एकाही निवडणुकीत पराभव नसलेल्या अत्यंत गौरवशाली राजकीय कारकिर्दीचे धनी असलेल्या करुणानिधींना तामीळनाडूच्या व्यक्तिपूजक प्रजेने देवतुल्य गणले तर नवल नाही. जनतेच्या या प्रेमाला त्यांनीही कधी अंतर दिले नाही. द्रविडी संस्कृती आणि तामिळी अस्मितेचा सतत कणखरपणे ते पुरस्कार करीत राहिले. स्वतः एक प्रादेशिक नेता असूनही राष्ट्रीय नेतृत्वाला वेठीस धरण्याची हिंमत आणि तेवढी राजकीय ताकद असलेला हा नेता होता. भाषेचा अडसर असल्याने राष्ट्रीय स्तरावर त्यांना भले स्वतःची छाप उमटवून दाखवता आली नसेल, परंतु तरीही देशाच्या नेतृत्वाला थेट दक्षिणेत धाव घेण्याची पाळी त्यांनी अनेकदा आणली हेही विसरून चालणार नाही. दिल्लीतील राजकीय आघाड्या त्यांच्या भूमिकेचा विचार केल्याविना पार पडत नसत एवढा प्रभाव त्यांनी जरूर निर्माण केला होता. साठच्या दशकात याच करुणानिधींवर फुटिरतेचा शिक्का बसला होता. द्रविडी संस्कृतीच्या अस्तित्वावर घाला घालता जात असल्याच्या भावनेने ते तेव्हा पेटून उठले होते. त्यांची हिंदीविरोधी भूमिका, स्वतंत्र द्रवीडनाडूची मागणी यामुळे जवळजवळ राष्ट्रीय प्रवाहापासून ते दूर फेकले जाण्याची शक्यता होती, परंतु पाकिस्तानशी झालेले युद्ध, चीनचे आक्रमण या बाह्य आक्रमणांमुळे देशाच्या एकता आणि अखंडतेला निर्माण झालेल्या संकटाचा विचार करून त्यांनी ही मागणी पुढे सोडून दिली. मात्र, राष्ट्रीय राजकारणात आपल्या प्रदेशाची उपेक्षा होणार नाही याची त्यांनी सदैव काळजी मात्र नक्कीच घेतली. आघाडी – बिघाडीच्या राजकारणात ते निष्णात होते. पेरियारांचे सच्चे अनुयायी असलेल्या करुणानिधींनी द्रवीड मुन्नेत्र कळघमच्या माध्यमातून आपली पुरी राजकीय कारकीर्द घडवली. वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी दालमियांच्या सिमेंट प्रकल्पाच्या विरोधात उभ्या राहिलेल्या आंदोलनात त्यांचे नेतृत्वगुण प्रकर्षाने समोर आलेले होते. जस्टीस पार्टीच्या झेंड्याखाली ते राजकारणात आले. खरे तर त्यांचा पिंड साहित्यिकाचा. तामिळी चित्रपटविश्वामध्ये त्यांची ओळख आहे ती कथाकार, पटकथाकार म्हणून. ब्राह्मण्यवादावर टीका करणार्‍या परासक्तीसारख्या चित्रपटांतून त्यांची सामाजिक भूमिका प्रखरपणे प्रकट झाली. त्यांच्या नावावर शंभरहून अधिक पटकथा, कादंबर्‍या, कविता, गाणी, नाटके असे साहित्य आहे हे सांगून खरे वाटणार नाही. त्यांना प्रेमाने ‘कलैग्नार’ म्हटले जाते, त्याचा अर्थ हाच आहे. ते रसाळ कथाकार आहेत असाच त्याचा मथितार्थ आहे. काव्य, नाट्य, साहित्यात रमणारे करुणानिधी राजकारणी म्हणून देशाला परिचित झाले. त्यांचे आणि जयललितांचे राजकीय हाडवैर देशाने पाहिले. आता ती दोघेही राहिलेली नाहीत,़ परंतु करुणानिधींच्या अंत्यसंस्कारांच्या ठिकाणावरून चाललेले राजकारण पाहिले तर या वैराची धग अजूनही कमी झालेली नाही हे जाणवते. जयललितांच्या जाण्याने अभाअद्रमुक फुटला आणि नंतर तडजोडही झाली. करुणानिधींनी चार वर्षांपूर्वी पुत्र स्टालिनला आपला राजकीय वारसदार ठरवताना अलागिरीची हकालपट्टी केली होती. कन्या कनिमोळीनेही त्यांचा राजकीय वारसा पेलला. आता त्यांचा खरा वारसदार कोण असेल हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे, द्रविडी अस्मितेचा हा अध्वर्यू काळाच्या पडद्याआड गेला आहे. परंतु त्यांच्या सामाजिक जाणिवा, सुस्पष्ट परखड भूमिका, तीव्र राजकीय धारणा हे सगळे विसरले जाऊ शकत नाही. करुणानिधींनी मागे ठेवलेला हा खरा निधी आहे.