दक्षिण दिग्विजय

0
80

गोवा विकास पक्षाचे प्रमुख आणि नुवेचे आमदार मिकी पाशेको आणि माजी मच्छीमार मंत्री तथा नावेलीचे अपक्ष आमदार आवेर्तान फुर्तादो या दोघांना मंत्रिपदे देऊन मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी आपले १२ सदस्यीय मंत्रिमंडळ पूर्ण केले आहे. आज त्या दोघांचा शपथविधी होईल. या दोघांच्या समावेशातून अर्थातच एका दगडात दोन पक्षी मारले गेले आहेत. दोघेही ख्रिस्ती आमदार आहेत ही एक बाब आणि दोघेही दक्षिण गोव्याचे आहेत ही दुसरी बाब. यामुळे अल्पसंख्यक समुदायाला आणि दक्षिण गोव्याच्या जनतेला या सरकारप्रती आश्वस्त तर करण्यात आले आहेच, शिवाय सरकारच्या स्थैर्यालाही थोडी अधिक बळकटी याद्वारे देण्यात आली आहे. आवेर्तान फुर्तादो हे मनोहर पर्रीकर यांच्या मंत्रिमंडळात मच्छीमारी मंत्री होते. त्यामुळे त्यांचे मंत्रिपद काढून घेतले असते तर ते अकार्यक्षम आहेत असा त्यातून अर्थ निघाला असता. दुसरे म्हणजे लक्ष्मीकांत पार्सेकर मुख्यमंत्रिपदावर आरूढ होण्यापूर्वी उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी स्वतःचे घोडे पुढे रेटण्यासाठी जे अल्पसंख्यक कार्ड पुढे रेटले आणि त्याला मायकेल लोबो वगैरेंनी जी साथ दिली, त्यामुळे अल्पसंख्यकांवर भाजप अन्याय करीत असल्याच्या कांगाव्याला वाट मिळाली असती. शिवाय आवेर्तान हे तसे अजातशत्रू व सौम्य व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्याकडून सरकारला उपद्रव संभवत नाही. त्यामुळे त्यांचा समावेश मंत्रिमंडळात पुन्हा होणार हे उघड होते. मिकी पाशेको यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाचे पाऊल मात्र थोडे धाडसी म्हणावे लागेल, कारण त्यांची ‘कामगिरी’ सर्वांना ज्ञात आहे. पण गेली अडीच वर्षे ते पर्रीकर सरकारबाबत समाधानी दिसले. आपल्याला मंत्रिपद दिले गेले नाही, तरी त्यांनी आजवर संयम पाळला. आपल्याला दिलेले आश्वासन पर्रीकर पाळतील यावर त्यांनी विश्वास ठेवला. त्या प्रतीक्षेचे फळ म्हणून भाजपने आपली मंत्रिपदाची जागा त्यांना आता दिली आहे. भाजपचे काही आमदार यामुळे नाराज झालेले दिसत असले, तरी सरकारचे स्थैर्य, अल्पसंख्यकांमध्ये जाणारा संदेश, दक्षिण गोव्याच्या लोकसभा निवडणुकीत मिकींनी जी साथ दिली त्याबाबतची कृतज्ञता या सगळ्या गोष्टींसाठी पार्सेकर सरकारमध्ये मिकींचा मंत्री म्हणून समावेश करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. विद्यमान सरकारमध्ये आता एक चतुर्थांश मंत्रिपदे ख्रिस्ती आमदारांकडे आहेत. उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा, एलिना साल्ढाणा, मिकी पाशेको आणि आवेर्तान फुर्तादो हे चार अल्पसंख्यक चेहरे आता भाजपा सरकार सर्वसमावेशक आहे याचा दाखला ठरणार आहेत. दक्षिण गोव्यावर भाजपाने गेल्या काही वर्षांत गांभीर्याने लक्ष केंद्रित केले आणि त्याचे फळ गेल्या विधानसभा आणि त्यानंतरच्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला मिळाले. कॉंग्रेस आजवर दक्षिण गोव्यातील ख्रिस्तीबहुल मतदारसंघांच्या जोरावर राज्यात आपले स्थान बळकट करीत असे. ते बालेकिल्ले भाजपाने हस्ते परहस्ते गेल्या दोन निवडणुकांतून उद्ध्वस्त करून टाकले आहेत. त्याकामी मिकी पाशेकोंची साथही महत्त्वाची ठरली होती. गेल्या विधानसभा निवडणुकीत मिकींनी नुवेतून आलेक्स सिकेरांना घरी बसवले, तर त्यांच्याच पाठिंब्यावर कायतान सिल्वा यांनी बाणावलीतून चर्चिल आलेमाव यांची कन्या वालंकाची राज्याच्या राजकारणात येण्याची स्वप्ने उधळून लावली. गेल्या लोकसभा निवडणुकीतही नरेंद्र सावईकरांना सालसेत सर करणे सोपे नव्हते. परंतु मिकी आणि इतरांनी त्यांचा विजयाचा मार्ग सुकर केला. या सर्वाची कृतज्ञतापूर्वक परतफेड आता मंत्रिपदाद्वारे झालेली आहे. मनोहर पर्रीकर यांच्याकडे जेव्हा मुख्यमंत्रिपद होेते, तेव्हा त्यांचे आपल्या संपूर्ण मंत्रिमंडळावर पूर्ण नियंत्रण होते. पार्सेकर यांची ज्या परिस्थितीत त्या पदावर निवड झालेली आहे, ती पाहता त्यांना अशा प्रकारची पूर्ण पकड निर्माण करणे सोपे जाणार नाही. त्यामुळे अशा वेळी सरकारच्या स्थैर्याला अधिक बळकटी देऊन संभाव्य संकटांशी दोन हात करण्याची सज्जता पक्षाने यावेळी ठेवलेली आहे. हे सरकार अल्पसंख्यकविरोधी आहे अशी ओरड करणार्‍यांनाही दिलेले हे चोख उत्तर ठरणार आहे. पर्रीकर यांनी सर्वधर्मसमभावाची भूमिका स्पष्टपणे घेऊन भाजप अल्पसंख्यकविरोधी असल्याचे आरोप करण्याची संधी कोणाला दिली नव्हती. प्रमोद मुतालिक प्रकरणातील भूमिका असो, आर्चबिशपशी ठेवलेले सलोख्याचे संबंध असोत, त्यांनी गोव्याच्या समाजजीवनातील ख्रिस्ती समुदायाचे स्थान दुर्लक्षित केले नव्हते. आता पार्सेकर सरकारही तसे करणार नाही याची ग्वाही या मंत्रिमंडळ विस्ताराने दिली आहे.