दक्षिण आफ्रिकेसाठी आज विजय अत्यावश्यक

0
190

>> पाचव्या एकदिवसीय सामन्याद्वारे भारताला मालिका विजयाची संधी

भारत व दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाचवा एकदिवसीय सामना आज खेळविण्यात येणार आहे. चौथा सामना जिंकून यजमानांनी मालिकेतील आव्हान कायम राखले असले तरी आजचा सामनादेखील त्यांच्यासाठी ‘करो या मरो’च असणार आहे. चौथ्या लढतीत भारताच्या फिरकीपटूंना झोडपून काढल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा आत्मविश्‍वास उंचावला असून पाचव्या सामन्यात याची पुनरावृत्ती करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.

पावसाचा व्यत्यय व युजवेंद्र चहलच्या नो बॉलमुळे भारताला चौथ्या सामन्यात विजयापासून वंचित रहावे लागले. केवळ पाच नियमित गोलंदाजांसह उतरल्याने सहाव्या गोलंदाजाची कमतरता या सामन्यात जाणवली. कामचलाऊ गोलंदाज केदार जाधवच्या अनुपस्थितीमुळे पाच गोलंदाजांवर धावा रोखण्याचा असलेला दबाव चौथ्या सामन्यात खर्‍या अर्थाने दिसून आला. हार्दिक पंड्याला अष्टपैलूच्या रुपात खेळवत असल्याने केदार जाधवला संधी देणे संघ व्यवस्थापनाला भाग पडत आहे. पंड्या आपला निर्धारित १० षटकांचा कोटा क्वचितच पूर्ण करत असल्याने जाधवचा उपयोग करावा लागतो. पहिल्या तीन सामन्यात कुलदीप यादव व युजवेंद्र चहल या फिरकीपटूंनी भारताच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला होता. परंतु, चौथ्या लढतीत याच फिरकीपटूंना धावगतीला लगाम घालण्यात आलेले अपयश भारतासाठी चिंतेचा विषय ठरू शकते. आज होणार्‍या सामन्यातही पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून त्यामुळे संघाच्या समतोलाबद्दल विराट कोहलीला महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागणार आहे.

दुसरीकडे ‘पिंक वनडे’त धमाकेदार विजय मिळवून दक्षिण आफ्रिकेचा संघ भरात आला आहे. हेन्रिक क्लासेन, डेव्हिड मिलर व आंदिले फेलुकवायो यांच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर विजय मिळविल्याने त्यांचा आत्मविश्‍वास दुणावला आहे. पोर्ट एलिझाबेथमधील खेळपट्टी थोडीशी संथ असून या मैदानावर इम्रान ताहीर किंवा तबरेझ शम्सी या स्पेशलिस्ट फिरकीपटूला दक्षिण आफ्रिका संधी देऊ शकते. या स्थितीत लुंगी एन्गिडीला बाहेर बसावे लागू शकते. पोर्ट एलिझाबेथच्या मैदानावर ३२ सामने झाले असून यातील १७ वेळा धावांचा पाठलाग करणारा संघ विजयी ठरला आहे. त्यामुळे हा इतिहास व पावसाची शक्यता लक्षात घेऊन नाणेफेक जिंकणार्‍या कर्णधाराला निर्णय घ्यावा लागणार आहे.
भारत (संभाव्य) ः रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पंड्या, भुवनेश्‍वर कुमार, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह व युजवेंद्र चहल.
दक्षिण आफ्रिका (संभाव्य) ः ऐडन मारक्रम, हाशिम आमला, जेपी ड्युमिनी, एबी डीव्हिलियर्स, डेव्हिड मिलर, हेन्रिक क्लासेन, आंदिले फेलुकवायो, ख्रिस मॉरिस, कगिसो रबाडा, मॉर्ने मॉर्कल व इम्रान ताहीर.

रोहितचा फॉर्म ठरतोय डोकेदुखी
भारतातील सपाट खेळपट्‌ट्यांवर आपल्या बॅटचा इंगा दाखवणार्‍या रोहित शर्माची बॅट दक्षिण आफ्रिकेतील वेगवान खेळपट्‌ट्यांवर धावा जमवण्यासाठी झगडताना दिसत आहे. एकदिवसीय मालिकेतील चारपैकी तीन सामने भारताने जिंकले असले तरी या चारही सामन्यांत रोहित सपशेल अपयशी ठरला आहे. २०, १५, ०, ५ अशा धावा त्याच्या नावावर आहेत. रोहितमुळे भारताला सातत्याने चांगल्या सलामीला मुकावे लागले आहे. दक्षिण आफ्रिकेत रोहितने एकूण १२ सामने खेळले असून यातील ११ डावांत ११.४५च्या सरासरीने त्याला केवळ १२६ धावा जमवता आल्या आहेत.