दक्षिण आफ्रिकेचे आव्हान आटोपले

0
115

>> पाकिस्तानचा ४९ धावांनी विजय

>> हारिस सोहेलने तुफानी अर्धशतक

क्रिकेट विश्‍वचषक स्पर्धेत काल रविवारी लॉर्ड्‌सच्या प्रसिद्ध मैदानावर दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान संघात सामना रंगला. पाकिस्तानने दिलेल्या ३०९ धावांच्या विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेचा संघ ९ बाद २५९ धावाच करू शकला.४९ धावांनी मिळविलेल्या या विजयासह पाकिस्तानने उपांत्य फेरीत प्रवेशाच्या आपल्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. पाकिस्तानच्या विजयात शादिब खानने ३, वहाब रियाझने ३ आणि मोहम्मद आमिरने २ बळी घेत मोठे योगदान दिले. दक्षिण आफ्रिकेकडून कर्णधार ड्युप्लेसीने एकाकी झुंज देताना अर्धशतक ठोकले. तळाला फेहलुकवायोने फटकेबाजी करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. या पराभवामुळे दक्षिण आफ्रिकेचे विश्‍वचषक स्पर्धेतील आव्हान आटोपले आहे. अफगाणिस्ताननंतर अधिकृतरित्या स्पर्धेबाहेर गेलेला द. आफ्रिका हा दुसरा संघ आहे.

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा कर्णधार सर्फराज अहमदचा निर्णय पाकिस्तानच्या फलंदाजांनी सार्थ ठरवला. फखर झमान आणि इमाम उल-हक या सलामी जोडीने पहिल्या गड्यासाठी ८१ धावा जोडत मोठ्या धावसंख्येसाठी मजबूत पाया रचला. ताहीरने या दोन्ही फलंदाजांना माघारी धाडत पाकिस्तानची जमलेली जोडी फोडली. यानंतर बाबर आझमने सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेत आपले चौदावे वनडे अर्धशतक लगावले. मोहम्मद हाफीज झटपट माघारी परतल्यानंतर त्याने हारिस सोहेलच्या साथीने ८१ धावांची भागीदारी रचत पाकच्या डावाला आकार दिला. शोएब मलिकच्या जागी संघात स्थान मिळालेल्या हारिसने संधीचा पुरेपूर लाभ उठवत केवळ ५९ चेंडूंत ८९ धावांची तुफानी खेळी केली. अखेरच्या फळीतील फलंदाजांना मोठे फटके खेळण्याची संधी आफ्रिकेच्या गोलंदाजांनी दिली नाही. आफ्रिकेकडून एन्गिडीने ३, इम्रान ताहीरने २ तर फेहलुकवायो आणि मार्करमने प्रत्येकी १ बळी घेतला.

धावफलक
पाकिस्तान ः इमाम उल हक झे. व गो. ताहीर ४४, फखर झमान झे. आमला गो. ताहीर ४४, बाबर आझम झे. एन्गिडी गो. फेहलुकवायो ६९, मोहम्मद हफीझ पायचीत गो. मार्करम २०, हारिस सोहेल झे. डी कॉक गो. एन्गिडी ८९ (५९ चेंडू, ९ चौकार, ३ षटकार), इमाद वासिम झे. ड्युमिनी गो. एन्गिडी २३, वहाब रियाझ त्रि. गो. एन्गिडी ४, सर्फराज अहमद नाबाद २, शादाब खान नाबाद १, अवांतर १२, एकूण ५० षटकांत ७ बाद ३०८
गोलंदाजी ः कगिसो रबाडा १०-०-६५-०, लुंगी एन्गिडी ९-०-६४-३, ख्रिस मॉरिस ९-०-६१-०, आंदिले फेहलुकवायो ८-०-४९-१, इम्रान ताहीर १०-०-४१-२, ऐडन मार्करम ४-०-२२-१
दक्षिण आफ्रिका ः हाशिम आमला पायचीत गो. आमिर २, क्विंटन डी कॉक झे. इमाम गो. शादाब ४७, फाफ ड्युप्लेसी झे. सर्फराज गो. आमिर ६३, ऐडन मार्करम त्रि. गो. शादाब ७, रस्सी वेंडर दुसेन झे. हफीझ गो. शादाब ३६, डेव्हिड मिलर त्रि. गो.आफ्रिदी ३१, आंदिले फेकलुकवायो नाबाद ४६, ख्रिस मॉरिस त्रि. गो. वहाब १६, कगिसो रबाडा त्रि. गो. वहाब ३, लुंगी एन्गिडी त्रि. गो. वहाब १, इम्रान ताहीर नाबाद १, अवांतर ६, एकूण ५० षटकांत ९ बाद २५९
गोलंदाजी ः मोहम्मद हफीझ २-०-११-०, मोहम्मद आमिर १०-१-४९-२, शाहिन शाह आफ्रिदी ८-०-५४-१, इमाद वासिम १०-०-४८-०, वहाब रियाझ १०-०-४६-३, शादाब खान १०-१-५०-३

विराट कोहलीला दंड
अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यादरम्यान गरजेपेक्षा जास्त अपील करत पंचांवर दबाव आणल्याप्रकरणी विराट कोहली याच्या मानधनातली २५ टक्के रक्कम कापून घेण्यात आलेली आहे. विराटच्या खात्यात एक दोषांकदेखील जमा करण्यात आला आहे. विराटला आयसीसीच्या कोड ऑफ कंडक्टच्या २.१ नियमाच्या उल्लंघनाबद्दल दोषी ठरवण्यात आले.

ताहीरने टाकले डोनाल्डला मागे
दक्षिण आफ्रिकेचा लेगस्पिनर इम्रान ताहीरने पाकिस्तानविरुद्ध सामन्यात दोन बळी घेत विश्‍वचषक स्पर्धेच्या इतिहासातील दक्षिण आफ्रिकेचा सर्वांत यशस्वी गोलंदाज होण्याचा मान मिळविला. त्याने ऍलन डोनाल्ड याच्या ३८ बळींना मागे टाकत आपली बळीसंख्या ३९ केली. वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वाधिक बळी घेणार्‍यांमध्ये तो आठव्या स्थानी आहे.

धोनी, जाधववर बरसला सचिन
अफगाणिस्तानविरद्धच्या सामन्यात महेंद्रसिंग धोनी (५२ चेंडूंत २८) व केदार जाधव (६८ चेंडूंत ५२) याच्या कुर्मगती फलंदाजीवर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने टीका केली आहे. या दोघांनी गरजेपेक्षा अधिक निर्धाव चेंडू खेळून दबाव वाढवण्याचे काम केले. या दोघांकडे सकारात्मक दृष्टिकोनाची कमतरता दिसल्याचे सचिनने म्हटले आहे. भारतीय फलंदाजांनी अफगाणी फिरकीपटूंना गरजेपेक्षा जास्त सन्मान देत त्यांच्या ३४ षटकांत केवळ ११९ धावा केल्याबद्दलही सचिनने जाहीर नाराजी व्यक्त केली.