दक्षिण आफ्रिका किंचित वरचढ

0
218

दक्षिण आफ्रिका व ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्याला कालपासून प्रारंभ झाला. यजमानांनी पहिल्या दिवसअखेर ३१३ धावा करत किंचित वर्चस्व मिळविले. पाहुण्यांनी त्यांचे ६ गडी बाद करत पहिल्याच दिवशी सामना हातातून निसटणार नाही याची दक्षता घेतली.

चेंडू छेडछाड प्रकरणानंतर कालपासून सुरू झालेल्या शेवटच्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यजमानांनी तिसर्‍या कसोटीतील संघच कायम ठेवला तर पाहुण्यांनी तब्बल चार बदल केले. यातील तीन बदल अनिवार्य होते. तर स्टार्कच्या दुखापतीमुळे ऐनवेळी चाड सेयर्सला पदार्पणाची संधी देण्यात आली.

दक्षिण आफ्रिकेकडून आत्तापर्यंत पहिल्या डावात चार अर्धशतकापेक्षा जास्त धावांच्या भागीदार्‍या झाल्या. सर्वप्रथम ऐडन मारक्रम व डीन एल्गार यांनी ५३ धावांची सलामी संघाला दिली. यानंतर आमला व मारक्रमने दुसर्‍या गड्यासाठी ८९ धावा जोडल्या. एबी डीव्हिलियर्स व मारक्रम यांनी तिसर्‍या गड्यासाठी १०५ धावांची तर एबी डीव्हिलियर्स व तेंबा बवुमा यांनी ५२ धावा जोडल्या. परंतु, पाहुण्यांना फाफ ड्युप्लेसी व कगिसो रबाडा या दोघांना भोपळाही फोडू न देता तंबूत पाठवत या भागीदार्‍यांची तीव्रता कमी केली. ऐडन मारक्रमने आपल्या कसोटी कारकिर्दीतील चौथे शतक झळकावले. डीव्हिलियर्सने आपल्या ४६व्या कसोटी अर्धशतकाची नोंद केली. आज सामन्याचा दुसरा दिवस असून डी कॉक व बवुमा यांची भागीदारी दक्षिण आफ्रिकेला मजबूत स्थितीत नेऊ शकते. अष्टपैलू फिलेंडरची फलंदाजीदेखील निर्णायक ठरू शकते.

धावफलक
दक्षिण आफ्रिका पहिला डाव ः डीन एल्गार झे.सेयर्स गो. लायन १९, ऐडन मारक्रम झे. मार्श गो. कमिन्स १५२, हाशिम आमला झे. हँड्‌सकोंब गो. कमिन्स २७, एबी डीव्हिलियर्स झे. पेन गो. सेयर्स ६९, फाफ ड्युप्लेसी पायचीत गो. कमिन्स ०, तेंबा बवुमा नाबाद २५, कगिसो रबाडा झे. रेनशॉ गो. सेयर्स ०, क्विंटन डी कॉक नाबाद ७, अवांतर १४, एकूण ८८ षटकांत ६ बाद ३१३
गोलंदाजी ः जोश हेझलवूड १८-३-६०-०, चाड सेडर्स २६-६-६४-२, पॅट कमिन्स १९-३-५३-३, नॅथन लायन २१-१-९५-१, मिचेल मार्श ३-०-२३-०, मॅट रेनशॉ १-०-४-०.

आयपीएलला मुकणार स्टार्क
ऑस्ट्रेलियाचा डावखुरा जलदगती गोलंदाज मिचेल स्टार्क आगामी इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेला मुकणार आहे. त्याच्या उजब्या पायाचे हाड फ्रॅक्चर झाले आहे. कोलकाता नाईट रायडर्सने जानेवारी महिन्यात झालेल्या लिलावामध्ये १.४७ मिलियन डॉलर्स मोजून त्याला खरेदी केले होते. स्टार्कमुळे केकेआरच्या समस्यांमध्ये भर पडली आहे. अष्टपैलू सुनील नारायण, ऑस्ट्रेलियाचा ख्रिस लिन यांच्यामुळे चिंतेत असताना केकेआरला स्टार्कच्या दुखापतीमुळे मोठा धक्का बसला आहे. स्टार्कने आयपीएलमध्ये आत्तापर्यंत २७ सामने खेळले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून खेळताना २०१५ साली त्याने वीस व २०१४ साली १४ बळी घेतले होते. मागील दोन मोसमात तो आयपीएलमध्ये खेळला नव्हता.