थोडी वाट पाहूया

0
281

अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूच्या कारणांबाबत नाना वार्ता आणि वदंता सतत कानी पडत आहेत. शवचिकित्सा अहवालात त्यांचा मृत्यू बाथटबमध्ये बुडाल्याने झाल्याचे कारण दर्शवण्यात आले असल्याने शंकाकुशंकांना ऊत आलेला दिसतो. दुबईमध्ये कोणाचाही इस्पितळाबाहेर मृत्यू झालेला असेल तर त्यासंबंधीची एक कायदेशीर प्रक्रिया असते. शवचिकित्सेनंतर तो अहवाल पब्लीक प्रोसिक्युटर्स ऑफिसला पाठवला जातो आणि त्यानुसार त्यासंबंधी अधिक चौकशी करायची की नाही ते हा संबंधित विभाग ठरवून त्यानुसार पुढील निर्णय घेत असतो. श्रीदेवी यांचा मृत्यू हा अपघाती झालेला असल्याने त्यासंबंधीच्या विविध शक्यता दुबईतील पोलीस प्रशासनाने पडताळून पाहणे यात गैर काही नाही. मात्र, यासंबंधी सुरू असलेल्या तपासाचे निष्कर्ष येईस्तोवर न थांबताच आपल्याकडील माध्यमांनी आणि विशेषतः सोशल मीडियाने जी आरोपांची बेछूट राळ उडवून दिलेली आहे ती प्रशंसनीय नाही. अशा प्रकारच्या उत्साहातून मृत व्यक्तीच्या कुटुंबियांच्या मनस्तापात भर घालण्याच्या या खटाटोपातून काय साध्य होते? श्रीदेवींच्या मृत्यूसंदर्भात आतापावेतो नाना तर्क कुतर्क व्यक्त करण्यात आलेले दिसतात. त्यांच्या शरीरात अल्कोहोलचे अंश सापडल्याचे शवचिकित्सा अहवालात नमूद करण्यात आले आहे हे खरे, परंतु त्याचा अर्थ त्यांनी अतिमद्यप्राशन केले होते व त्यामुळेच टबमध्ये बुडून मरण पावल्या असा निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल. फीट येणे, ह्रदयविकाराचा झटका येणे, अति थकवा येणे, कमी रक्तदाब अशा अनेक कारणांतून एखादी व्यक्ती पाण्याने भरलेल्या टबमध्ये बेशुद्ध पडू शकते आणि नाकातोंडात पाणी गेल्याने गुदमरून मृत्युमुखी पडू शकते. पाश्‍चात्त्य विश्वातील व्हायटनी ह्यूस्टनसारख्या काही सेलिब्रिटी अमली पदार्थांच्या अतिसेवनाने अशा प्रकारे हॉटेलमधील बाथटबमध्ये बुडून मृत्युमुखी पडलेल्या आहेत. त्यामुळे बाथटबमध्ये बुडून मृत्यू ही काही अगदीच अशक्यप्राय गोष्ट नाही, परंतु श्रीदेवी यांच्या बाबतीत बाथटबमध्ये बुडाल्यानेच मृत्यू ओढवला असेल तर त्यामागचे नेमके कारण कोणते हे शोधणे हे पोलिसांचे काम आहे. त्यांच्या मृृत्यूच्या वेळची परिस्थिती काहींना संशयास्पद वाटते आहे. मोहित मारवाहच्या विवाह सोहळ्यानंतर पती बोनी कपूर आणि छोटी मुलगी खुशी मुंबईत परतले होते. श्रीदेवी दुबईतच थांबल्या होत्या. आपल्या मोठ्या मुलीसाठी – जान्हवीसाठी खरेदी करण्यासाठी त्या मागे थांबल्या व त्यांना आपल्या काही पेंटिंग्सचाही लिलाव करायचा होता असे त्यामागील कारण सांगितले जात आहे. बोनी मुंबईहून अचानक दुबईत परतले व पत्नीला डीनर डेटवर नेण्याचा त्यांचा मनोदय होता असे सांगितले जाते. या एकूण घटनाक्रमामुळे दोहोंमधील संबंध बिघडले होते का, नात्यामध्ये काही तणाव होता का अशा शंकांनी डोके वर काढले आहे. यात काही तथ्य असेल तर पोलीस फोन कॉल लॉग तपासत असल्याने त्यातून सत्य समोर येईल. पोलिसांना कळवण्यात विलंब का झाला याचाही शोध सुरू आहे. श्रीदेवींनी स्वतःचे शरीरसौष्ठव आणि सौंदर्य अबाधित ठेवण्यासाठी अनेक शस्त्रक्रिया केल्या होत्या, त्यातूनच त्यांचा मृत्यू ओढवला असाही एक तर्क काहींनी पुढे केला आहे. शरीरावरील सुरकुत्या लपवण्यासाठी बोटलीनम टॉक्सीन म्हणजे ‘बोटोक्स’चा वापर काही अभिनेत्री करतात. त्यामुळे अशा एखाद्या रसायनातून काही विपरीत परिणाम त्यांच्या शरीरावर घडला असावा का यासंबंधीही शक्यता पडताळून पाहिल्या जात आहेत. हे सगळे केवळ तर्क आहेत आणि जोवर त्यासंबंधी ठोस पुरावे समोर येत नाहीत, तोवर अशा गोष्टींवर विश्वास ठेवून भ्रम निर्माण करणे चुकीचे ठरेल. दुर्दैवाने प्रसारमाध्यमांमधील अनेकांमधील शेरलॉक होम्स सध्या जागा झालेला दिसतो आहे. त्यात तस्लिमा नसरीनपासून अमरसिंगांपर्यंत अनेक मंडळींनी आगीत आपल्या काड्या सरकवल्या आहेत. हा सारा आततायीपणा शोभादायक नाही. काही प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी तर ज्या स्मशानात श्रीदेवींवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, तेथील चितेची तयारीही दाखवली. हा अतिउत्साह हास्यास्पद तर आहेच, परंतु उथळपणाचे दर्शनही घडवणारा आहे. या तुलनेत दुबईमधील वार्तांकनातील शिस्त आणि संयम उल्लेखनीय आहे. तेथे मृतदेह ठेवलेल्या डिपार्टमेंट ऑफ फॉरेन्सिक एव्हिडन्सबाहेर कोणाला थांबूही दिले गेले नाही. श्रीदेवींच्या आकस्मिक मृत्यूने हादरलेल्या आणि हेलावलेल्या त्यांच्या असंख्य चाहत्यांना त्यामागील कारण जाणून घेण्यात रस जरूर आहे, परंतु त्यासाठी तपास पूर्ण होईस्तोवर वाट पाहणेच योग्य ठरेल. अपुर्‍या माहितीवर कोणत्याही निष्कर्षाप्रत येणे बरोबर नाही. श्रीदेवी यांचा मृत्यू अनैसर्गिक स्थितीत जरी झालेला असला तरी थेट त्यांनी आत्महत्या केली अथवा त्यांचा खूनच झाला अशा निष्कर्षाप्रत आधीच येणे हा अतिरेक नाही काय?