त्वचा विकार भाग – १

0
405

– डॉ. स्वाती हे. अणवेकर (म्हापसा)

त्वचा विकारांबाबत संपूर्ण माहिती जाणून घेण्याआधी आपल्याला काही मुलभूत गोष्टी त्वचेच्या बाबतीत समजून घेणे फार आवश्यक आहे. त्यात प्रथम आयुर्वेदानुसार त्वचा म्हणजे काय? ती कशी उत्पन्न होते? त्याचे कार्य व उपयोग काय? तसेच अर्वाचीन मतानुसार त्वचा म्हणजे काय?… ह्या सर्व गोष्टी आपल्याला अवगत असणे गरजेचे आहे. त्यामुळे त्वचाविकार ह्या लेखमालेची सुरुवात आपण ह्या लेखापासून करणार आहोत.

तर सर्वप्रथम आयुर्वेदानुसार त्वचा म्हणजे काय ते समजून घेऊयात. आयुर्वेद असे सांगते की जेव्हा पुरूषबीज व स्त्रीबीज एकत्र येते तेव्हा गर्भ उत्पन्न होतो आणि त्याच काळात अशा काही घडामोडी घडतात- त्यात ही दोन्ही बीजे चांगली परिपक्व होत असताना ज्याप्रमाणे दुधावर जशी साय धरते तशीच गर्भाच्या शरीरावर त्वचा उत्पन्न होऊ लागते.

आयुर्वेदाचे सुश्रुत हे ग्रंथकर्ते जे शल्यशास्त्राचे जनक देखील आहेत त्यांनी त्वचेचे ७ स्तर आहेत असे सांगितले आहे तर चरकानी त्वचेचे ६ स्तर असतात असे सांगितले आहे. तर आता आपण ह्या स्तरांची एकत्रित माहिती थोड्या विस्ताराने जाणून घेऊयात.
सुश्रुतानी अवभासिनी, लोहित, श्वेता, ताम्रा, वेदिनी, रोहिणी, मासधरा असे त्वचेचे ७ स्तर सांगितले आहेत तर चरकांनी उदकधरा, असृग्धरा, सिध्म्कीलास सम्भवाधीष्ठान, दद्रुकुष्ठ सम्भवाधीष्ठान, अलजी विद्रधी सम्भवाधीष्ठान, अरुंशि अधिष्ठान असे त्वचेचे ६ स्तर सांगितले आहेत.

१) अवभासिनी/उदकधरा –
त्वचेचा हा स्तर वर्ण दाखवितो तसेच छाया प्रकशित करतो. ह्या स्तराची जाडी ही जवाच्या १८ वा भाग इतकी असते. हिलाच उदकधरा असेदेखील म्हणतात. कारण ह्यातून खरचटल्यावर लसिका स्त्राव होतो. ह्या स्तरापासून सिध्म व पद्मकंटक हे विकार होऊ शकतात. सिध्म म्हणजे आपल्या बोली भाषेत शिबे तर पद्मकंटक हे पॅपिलोमा ऑफ स्किनशी साधर्म्य साधते.

२) लोहित/अस्रुग्धरा –
ही जवाच्या १६वा भाग इतकी जाड असते व ह्या स्तराच्या आश्रयाने न्यच्छ, तिल्कालक व व्यंग हे त्वचाविकार होऊ शकतात. ह्यातील न्यच्छ हा त्वचा विकार म्हणजे आपण जन्मखूण म्हणू शकतो, तर तिलकालक म्हणजे तीळ. ह्यालाच अर्वाचीन भाषेत नॉन एलिव्हेटेड मोल असेदेखील म्हणतात. आणि तिसरा व्याधी आहे व्यंग. ह्या प्रकारचे डाग मासिक पाळी बंद झाल्यावर बर्‍याच स्त्रियांच्या चेहर्‍यावर पाहायला मिळतात.

३) श्वेता/सिध्मकिलास सम्भवाधीष्ठान –
ही यावाच्या १२ वा भाग एवढी जाड असते व ह्या स्तरात चर्मदल, अजगल्लिका, मशक, सिध्म व किलास हे व्याधी होऊ शकतात.
चर्मदल ह्या व्याधीमध्ये हात व पायाच्या तळव्यांना खाज येते व त्यात वेदना व जळजळ होते. अजगल्लिका हा व्याधी लहान मुलांमध्ये अधिक आढळतो. ह्यात मुलांच्या अंगावर न दुखणार्‍या त्वचेच्या वर्णाच्या लहान गाठी येतात, ज्यात वेदना नसते. मशक म्हणजे शरीरावर काळ्या रंगाचे वेदनारहित मोठे वर उठलेले डाग येतात ज्यांचे साधर्म्य अर्वाचीन शास्त्रातील एलिव्हेटेड मोल ह्या त्वचाविकारशी होऊ शकते. तसेच चरकांच्या मते ह्या स्तरात सिध्म म्हणजे शिबे तसेच किलास म्हणजे कोड अथवा अर्वाचीन शास्त्रातील ल्युकोडर्मा ह्या आजाराशी ह्याचे साधर्म्य आढळते.

४) ताम्रा/ दद्रुकुष्ठ सम्भवाधीष्ठान
ही यवाच्या आठव्या भाग इतकी जाड असते व ह्या स्तराच्या आधाराने किलास व कुष्ठ हे व्याधी होतात तर चरकांच्या मते ह्यात दद्रु हा आजार होतो. ह्यातील किलास म्हणजे कोड तर कुष्ठ म्हणजे कुष्ठरोग अथवा अर्वाचीन शास्त्रात ह्याला लेप्रसी असे म्हणतात. तर दद्रु म्हणजे अर्वाचीन शास्त्रातील रींगवर्म ह्या त्वचारोगाशी बरेच साम्य साधते.

५) वेदिनी/ अलजी विद्रधी सम्भवाधीष्ठान –
हा त्वचेचा स्तर हा यवाच्या पांचव्या भागा एवढा जाड असतो व ह्यात कुष्ठ व विसर्प तसेच चरक मताने अलजी व विद्रधी हे आजार होतात. ह्यातील कुष्ठ म्हणजे कुष्ठ रोग तर विसर्प म्हणजे अंगभर पसरणारी सूज तर अलजी ह्या व्याधी मध्ये तांबूस रंगाच्या वेदना युक्त पुळ्या येतात व त्यातून सतत स्त्राव होत राहतो.

६) रोहिणी/ अरुंशि अधिष्ठान –
ह्या स्तराची जाडी ही १ यावा एवढी असते व ह्या स्तराच्या आधाराने ग्रंथी, अपची, अर्बुद, श्लीपद, गलगंड हे व्याधी होतात तर चरक मताने ह्या स्तरात अरुंशी नामक व्याधी होतो. ग्रंथी ह्या आजाराचे अर्वाचीन शास्त्रातील सिस्ट म्हणजे गाठी. ह्या व्याधीशी साधर्म्य आढळते, तर अपाची ह्या आजाराचे साधर्म्य क्रॉनिक ट्युबरक्युलस लिम्फॅडिनायटीस ह्या आजाराशी आढळते. ह्यात आवळ्याच्या बी प्रमाणे अथवा माशाच्या अंड्यांच्या गुच्छाप्रमाणे समूहाने लहान अशा त्वचा वर्णाच्या गाठी रुग्णाच्या शरीरावर येतात. तर अर्बुद म्हणजे अर्वाचीन शास्त्रातील ट्यूमर ह्या व्याधीशी साधर्म्य साधतो, तर श्लीपद हा व्याधी अर्वाचीन शास्त्रातील हत्तीरोग ज्याला फायलेरियासीस अथवा एलिफंटायटीस असे म्हणतात. त्याचाशी ह्याची तुलना होऊ शकते. तर गलगंड ह्या व्याधीची तुलना अर्वाचीन शास्त्रातील गॉइटर ह्या व्याधीशी होऊ शकते. अरुंशी म्हणजे हाडांच्या सांध्यावर काळ्या अथवा तांबड्या रंगाचे मोठे मूळ असणारे लवकर बरे न होणारे असे फोड उत्पन्न होतात.

७) मांसधरा –
ह्या सातव्या व शेवटच्या स्तराची जाडी ही २ यवन एवढी असते व ह्यात भगंदर, विद्र्‌धी व अर्श हे व्याधी होतात. ह्यातील भगंदर हा आजार अर्वाचीन शास्त्रातील फिस्तुला ह्या आजाराशी साधर्म्य साधतो, तर विद्र्‌धी म्हणजे ऍब्सेस अर्थात एखाद्या भागात हाडाच्या आश्रयाने पस उत्पन्न होणे तर अर्श म्हणजे मुळव्याध अथवा अर्वाचीन शास्त्राप्रमाणे पाईल्स असे ह्याला म्हणता येते.
(क्रमशः)