‘त्वचा’ : आरोग्याचा आरसा

0
668

– डॉ. मनाली म. पवार, 
गणेशपुरी-म्हापसा

 

आपली कातडी किंवा त्वचा म्हणजे आपल्या आरोग्याचा आरसाच असतो. आपले आरोग्य स्वस्थ, रोगरहित असल्यास आपली त्वचा ही नितळ, कांतीयुक्त, टवटवीत असते. त्याचबरोबर चेहरा नेहमी प्रसन्न व आनंदित दिसतो. पण शरीरामध्ये कुठेही बिघाड झाल्यास, त्याचा पहिला परिणाम त्वचेवर दिसतो… अगदी मानसिक अस्वास्थ्य असो वा झोप जरी पूर्ण झालेली नसली तरी त्वचा निस्तेज दिसू लागते.
आपले सर्व शरीर व्यापून राहणारी त्वचा- हे एकमेव ज्ञानेंद्रिय आहे, ज्यामुळे आपल्याला स्पर्शाचे ज्ञान होते. सुश्रुताचार्यांच्या मते ज्याप्रमाणे दूध तापत असताना त्यावर साय येते त्याप्रमाणे पुरुषबीज व स्त्रीबीज यांचा संयोग होऊन गर्भ बनत असताना, रक्ताचे पचन होत असताना येणारी साय म्हणजे त्वचा!! त्वचा मांसधातूचा उपधातू आहे. म्हणजेच आहारापासून मांसधातू तयार होतो किंवा त्याचे पोषण होते तेव्हा त्वचेचेही पोषण होत असते. त्रिदोषांपैकी वातदोष आणि पित्तदोष दोघांचेही स्थान त्वचा हे सांगितले आहे.
चुकीच्या, अपथ्यकर आहार-विहाराने रसधातू दूषित होतो. रक्तामध्ये दूषित द्रव्ये साठू लागतात, मांसधातूवरही त्याचा परिणाम दिसतो. या सर्वांचे पडसाद हलके हलके त्वचेवर उमटायला सुरुवात होते. त्वचेच्या सौंदर्यासाठी व स्वास्थ्यासाठी मुळात रसधातू हा महत्त्वाचा घटक आहे. नितळ, नाजूक व सतेज कांतीयुक्त त्वचा म्हणजेच रसधातू उत्तम असणे. आयुर्वेदात त्वचेचे सात थर सांगितले आहेत. सर्वांत वरची- अवभासिनी त्वचा जी सर्व प्रकारचे वर्ण दशवते व पाच प्रकारची अंगकांती प्रगट करते. व्यवहारात मात्र आपल्या त्वचेचे बाह्यत्वचा (एपिडर्मिस); आंतरत्वचा (डर्मिस) व त्याखालचा भाग सबक्युटीनियस टिश्यू असे तीन भाग असतात. आंतरत्वचेमध्ये घामाच्या ग्रंथी, त्वचेला तेलकटपणा देणार्‍या स्वेदग्रंथी, केसांची मुळं, रक्तवाहिन्या व मज्जातंतू असतात. आपल्या त्वचेस रंग देणार्‍या पेशी बाह्य त्वचेच्या तळातल्या भागात विखुरलेल्या असतात, तर बाह्य त्वचेचा सर्वांत वरचा थर मृत पेशींनी बनलेला असतो. त्यामुळे त्वचेचे घातक पदार्थांपासून रक्षण होते. त्वचेच्या खाली चरबीचा भर असतो. त्यामुळे शरीराचे उष्णता व थंडीपासून रक्षण होते.

त्वचारोगाची कारणे ः

विरोधीन्यन्नपानानि द्रवस्निग्धगुरुणि च|
भजतामागतान्छर्दिवेगांश्‍चान्यान्प्रतिघ्नताम्‌॥
व्यायाममति सन्तापमति भुक्त्वो पसेविनाम्‌|
शीतोष्णलङ्‌घनाहारान् क्रमं मुक्त्वा निषेविणाम॥

– विरुद्ध अन्न उदा.- दूध व फळे, सगळ्याप्रकारचे शेक, दूध व खारट पदार्थ, मध व गरम पाणी, दूध व मासे असे एकमेकास विरोधी असणारे पदार्थ एकत्र करून खाल्ल्यास.
– तेलकट व जड असे पदार्थ अतिप्रमाणात खाल्ल्यास. उदा. वेफर्स, फास्ट फूड, जंक फूड, बेकरी प्रॉडक्ट्‌स, मैद्याचे पदार्थ, आंबवलेले पदार्थ.
– मलमूत्र विसर्जन, शिंक, उलटी यांचा वेग आला असतानाही
अडवून धरणे.
– जेवल्यानंतर अत्यधिक श्रम केल्याने.
– उन्हात अधिक काळ राहिल्यास.
– खूप गरम व लगेच अतिशय थंड अन्नपदार्थ सेवन केल्यास.
– हॉटेलमध्ये छान गरम – गरम जेवल्यानंतर लगेच थंड आईसक्रीम खाण्याने.
– पूर्ण उपवास केल्यास.
– घाम फुटला असता थंड पाणी पिल्यास.
– अपचन झाले असतानाही जेवण जेवल्यास
– शास्त्रोक्त पंचकर्म न केल्यास.
– दिवसा झोपल्यास.
– दही, मासे, मांस, आंबट, खारट पदार्थांचे अतिसेवन, उडीद, वांगी, तीळ, मीठ यांचे अतिसेवन.
तसेच पूजनीय, आदरणीय अशा व्यक्तींचा अपमान करणे व दुसर्‍यांच्या भावना दुखवण्यानेही त्वचारोग होतात, असा आयुर्वेदामध्ये उल्लेख आढळतो.

त्वचारोगांमध्ये आढळणारी महत्त्वाची लक्षणे ः

ऋतुबदलाचा थेट परिणाम आपल्या त्वचेवर होत असतो. उन्हाळ्यातील उष्णता आपल्या त्वचेतील जणू तजेलाच शोषून घेते. त्वचेतील आर्द्रता नाहीशी होऊन त्वचा आतून निर्जीव बनू लागते. बहुतेकवेळा उन्हाळ्यामध्ये घाम व जीवाणूंमुळे त्वचेवर पुरळ उठतो. घामोळ्यांचा त्रास त्वचेवर उमटू लागतो.
* घामामुळे त्वचेवरील रोमछिद्रे बंद होतात. त्यामुळे त्यातून ब्लॅक हेड्‌स, व्हाइट हेड्‌स तयार होतात व मुरुमांची समस्यादेखील वाढते.
* टॅनिंग म्हणजे त्वचा काळवंडणे- ही उन्हाळ्यातील सर्वांत मोठी समस्या आहे. सावळा व गव्हाळवर्ण असणार्‍या त्वचेच्या तुलनेत गोरा रंग असणार्‍या त्वचेवर टॅनिंग अधिक होते.
* तीव्र उन्हामुळे व एसीमुळे त्वचा कोरडी होते.
* उन्हाळ्यात घामाच्या चिकटपणामुळे संपूर्ण अंगाला खाज येते.
* चेहरा कोमेजणे, सुरकुत्या पडणे, पिग्मेंटेशन, सनबर्न, रॅशेस इत्यादी समस्या या ऋतूत आढळतात.
* हिवाळ्यात हवेत रुक्षता व गारवा अधिक असल्याने सर्वांग रुक्ष बनते. ओठ फुटणे, पायाला भेगा पडणे, चेहरा रखरखीत होणे, पित्त उठणे यांसारखा त्रास त्वचेला सहन करावा लागतो.
* पावसाळ्यातही ऋतुबदलाचा परिणाम त्वचेवर होतो. ओलाव्यामुळे पाददारी, चिखल्यासारखे व्याधी होतात. एकूणच काय तर बदलत्या ऋतूचा परिणाम सर्वप्रथम त्वचेवर होतो.
* त्वचाविकारांमध्ये खाजणे ही तक्रार अनेक रुग्णांमध्ये आढळते. खाजणे हा बहुतांश त्वचाविकारांचा एक भाग असतो. खरूज, गजकर्ण, डास चावल्याने ऍलर्जी व आत दडलेले विकार यांच्यामुळे शरीराला खाज येऊ शकते.

त्वचेची काळजी कशी घ्याल?…

औषध शरीरामध्ये प्रवेशित करण्यासाठी त्वचा हे एक महत्त्वाचे साधन आहे, असे आयुर्वेदात समजले जाते. औषधी तेलाने अभ्यंग करणे, औषधी द्रव्यांचा शरीरावर लेप करणे, औषधांबरोबर तांदूळ शिजवून त्याच्या साहाय्याने शरीरावर मालिश करणे व आतील शरीरघटकांची झीज भरून काढण्याचा प्रयत्न करणे … अशा अनेक प्रकारे त्वचेचा उपयोग आयुर्वेदाने करून घेतलेला आहे. या सर्व उपायांनी त्वचेचे पोषण तर होतेच, पण त्वचेतील वात व पित्तदोषाच्या साहाय्याने हे औषधी घटक शरीराच्या आतपर्यंत पोचवले जातात व अपेक्षित कार्यसिद्धी करू शकतात.
१) चांगल्या आयुर्वेदिक तेलाचे संपूर्ण शरीरावर केलेले अभ्यंग, खोबरेल तेलाचा अंश असलेले साबण, त्वचेला लावण्यासाठी दुधावरची साय, ताज्या कोरफडीचा गर, नारळाचे दूध, चण्याचे पीठ, उद्वर्तन चूर्ण वापरल्याने त्वचा चांगली होते.
२) पंचकर्म चिकित्सेने शरीराचा कायापालट होतो.
३) रसायन चिकित्सेने अधिककाळ तारुण्य अनुभवता येते म्हणजेच त्वचा तेजस्वी, कांतीयुक्त राहते.
४) त्वचा निरोगी व तेजस्वी असावी अशी इच्छा असणार्‍यांनी रोज दूध, लोणी, तूप, मध, केशर वगैरे त्वचापोषक व रक्तशुद्धी करणार्‍या गोष्टींचे नियमित सेवन करावे.
५) भरपूर पाणी प्यावे. आहारात फळे व पालेभाज्या जास्त प्रमाणात घ्याव्या.
६) रोज किमान दोन वेळा सौम्य साबण वापरून आंघोळ करावी.
७) त्वचा कोरडी असल्यास अंगाला रोज तीळ तेलाने मालिश करावी.
८) उन्हाळ्यात बाहेर जाताना शक्यतो मानव चेहरा झाकला दजाईल याची काळजी घ्यावी.
९) काखेत व जांघेत टाल्कम पावडरचा वापर करावा किंवा वाळा व चंदन यांचे चूर्ण घासावे.
१०) तेलकट त्वचा असल्यास चेहर्‍यावरील मुरुमे वाढण्याची शक्यता असते. चेहरा तीन-चार वेळा स्वच्छ पाण्याने धुवावा. मुरुमे फोडू नयेत.
११) दोन चमचे बेसन व पाव चमचा हळद एकत्र करून साबणाऐवजी वापरल्यास त्वचा मऊ व सतेज होते.
१२) त्वचा सतेज होण्यासाठी व सुरकुत्या न पडण्यासाठी चंदन व दालचिनी उगाळून केलेला लेप चेहर्‍यावर लावावा.
१३) शहाळ्याची मलई चेहर्‍यावर चोळून लावल्यास अकाली पडलेल्या सुरकुत्या कमी होतात.
१४) चेहर्‍यावरील मुरुम, तीळ, काळे डाग कमी होण्यासाठी हळकुंड व चंदन दुधात उगाळून लावावे.
१५) आयुर्वेदामध्ये त्वचा निरोगी राहावी म्हणून ‘वर्ण्य’ द्रव्ये सांगितली आहेत. ही द्रव्ये शरीरवर्ण उत्तम ठेवतात. ती वर्ण्य द्रव्ये चंदन, केशर, क्षीरकाकोली, श्‍वेतदूर्वा, ज्येष्ठमध, पद्मकाष्ठ, वाळा, मंजिष्ठा, अनंत ही औषध वर्ण्य होत.
संतुलित पोषक आहार, भरपूर पाणी, शांत झोप व मन आनंदी, उत्साही ठेवल्यास सगळ्या प्रकारचे त्वचाविकार दूर ठेवता येतात.