‘त्या’ ६४ पदांच्या भरती प्रक्रियेत भ्रष्टाचार ः कॉंग्रेस

0
93

उत्तर गोवा जिल्हाधिकार्‍यांच्या कार्यालयातील सध्याच्या कर्मचारी भरती प्रक्रियेत भ्रष्टाचार असून दक्षता खात्यातर्फे त्याची चौकशी व्हावी, अशी मागणी प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष शांताराम नाईक यांनी काल पत्रकार परिषदेत केली. एकूण ६४ पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे.

वरील पदांसाठी प्रत्येकी ४० लाख रु. उमेदवारांकडून मागितले जात असल्याचे वृत्त आहे. त्यासाठी उमेदवारांकडे बोलणी चालू असून पोलिसांनी यासंबंधी चौकशी करावी, अशी मागणीही नाईक यांनी यावेळी केली. सरकारचे हे प्रकरण चौकशीसाठी दक्षता खात्याकडे द्यायची तयारी आहे की नाही याची आपणाला कल्पना नाही. मात्र, जर मुख्यमंत्र्यांनी हे प्रकरण चौकशीसाठी पोलिसांकडे सुपूर्द केले नाही तर ही संपूर्ण भरती प्रक्रिया भ्रष्टाचाराने बरबटलेली होती हे लोकांनी जाणून घ्यावे, असे नाईक म्हणाले. २ ते १० महिन्यांसाठीच्या तात्पुरत्या स्वरुपाच्या नोकरीसाठी उमेदवारांना अशा प्रकारे मुलाखतींसाठी बोलावून त्यांना ताटकळत ठेवणे म्हणजे मानवी हक्कांचे उल्लंघन असल्याचा नाईक यांनी आरोप केला. आता तात्पुरत्या नोकरीसाठी पैसे घेतले जातील व नंतर सेवेत कायम करण्यासाठी पुन्हा पैशांची मागणी करण्यात येईल, असे नाईक म्हणाले.

ज्या माणसाचा भारतीय स्वातंत्र्य लढ्याला विरोध होता त्या उपाध्याय यांची वरील प्रकारे पूजा करणे हे योग्य आहे काय याचे उत्तर खाणमंत्री असलेल्या मनोहर पर्रीकर यांनी द्यावे, अशी मागणीही नाईक यांनी यावेळी केली.

दिनदयाळ उपाध्याय यांच्या
मोनोग्राफला हरकत
खाण खात्याच्या अर्जपत्रावर दिनदयाळ उपाध्यय यांचा मोनोग्राफ छापण्याच्या सरकारच्या कृतीवर नाईक यांनी जोरदार टीका केली. त्यासंबंधी बोलताना नाईक म्हणाले की दीनदयाळ उपाध्यय यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याला विरोध केला होता. तसेच ते लोकशाही, समाजवाद व साम्यवाद याचे कट्टर विरोधक होते. उपाध्यय हे जातीयवादी होते व ख्रिश्‍चन आणि मुस्लिमांना जर भारतात रहायचे असेल तर त्यांनी स्वतःची वेगळी ओळख विसरावी व हिंदू धर्माशी एकरूप व्हावे अन्यथा त्यांनी गुलामगिरी पत्करण्यास तयार रहावे, असे मतही उपाध्यय यांनी व्यक्त केले होते, असा दावा नाईक यांनी केला.