‘त्या’ युवतीच्या जन्म दाखल्यासाठी बाबूश मोन्सेरात यांचा अर्ज

0
127

पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी कथित बलात्कार प्रकरणातील पिडीत युवतीचा जन्म दाखला मिळविण्यासाठी येथील जिल्हा न्यायालयात अर्ज काल सादर केला. न्यायालयाने सरकार पक्षाला या प्रकरणी बाजू मांडण्याची सूचना केली आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी १९ सप्टेंबर २०१९ रोजी ठेवण्यात आली आहे.

आमदार मोन्सेरात यांच्याविरोधात युवतीवरील कथित बलात्कार प्रकरणी येथील जिल्हा न्यायालयात खटला सुरू आहे. या बलात्कार प्रकरणातील युवतीच्या वयाबाबत आम्ही अंधारात आहोत. तपास अधिकार्‍याने युवतीच्या वयाबाबत आरोपपत्रात माहिती दिलेली नाही. सदर युवतीच्या आईने अपना घर प्रशासनाला तिचा जन्म दाखला सादर केल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे जन्म दाखला मिळविण्यासाठी अर्ज सादर केला आहे. न्यायालय याप्रकरणी योग्य निर्णय घेईल. सदर युवतीच्या वैद्यकीय चाचणीच्या वेळी तिचे वय १७-१८ वर्षे एवढे असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. पिडीत युवतीचे नेमके वय जन्म दाखल्यावरून स्पष्ट होऊ शकते, असे आमदार मोन्सेरात यांचे वकील अनुप कुडतरकर यांनी सांगितले.