‘त्या’ प्रकरणी भारताकडून चीनकडे चिंता व्यक्त

0
86

चीनकडून पाक सैनिकांना प्रशिक्षण
भारतविरोधी कारवाया करणार्‍या पाकिस्तानी सैनिकांना शस्त्रास्त्र हाताळणीसाठी चीनी लष्कराकडून प्रशिक्षण दिले जात असल्याबाबत भारताने चीनकडे आपली चिंता व्यक्त केली आहे. तसेच पाकिस्तानच्या भारताविरोधी कारवायांना पाठिंबा न देण्याची सूचनाही भारताने चीनला अधिकृतपणे केली असल्याची माहिती काल केंद्रीय गृह खात्याचे राज्यमंत्री किरेन रिजीजू यांनी दिली.‘विदेश मंत्रालयाने याआधीच चीनकडे यासंदर्भात चिंता व्यक्त केली आहे’ असे रिजीजू म्हणाले. मात्र ब्रिस्बेन (ऑस्ट्रेलिया) येथे चालू असलेल्या जी-२० परिषदे दरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व चीनी अध्यक्ष शी जीन पिंग यांच्यातील चर्चेवेळी हा मुद्दा उपस्थित झाला नव्हता.
जम्मू-काश्मीरमधील राजौरी क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय नियंत्रणरेषेसमोरील पाकिस्तानी हद्दीत चीनी लष्कराकडून पाक सैनिकांना शस्त्र हाताळणीचे प्रशिक्षण दिले जात असल्याविषयीचा अहवाल तेथील सीमा सुरक्षा दलाच्या गुप्तचर विभागाने केंद्रीय गृह खात्याला दिला होता.
वरील नियंत्रण रेषेलगत पाकिस्तानी रेंजर्स तैनात असतात. या ठिकाणांवर चीनी लष्कराच्या सहभागाने लष्करी कवायती चालू असतात असेही या अहवालात नमूद केल्याचे सांगण्यात आले.