‘त्या’ काळातला पाऊस

0
232

– संदीप मणेरीकर
‘त्या काळातला पाऊसच वेगळा होता
आईसारखी माया तर करायचाच पण
कधी मधी बाबांसारखा रागवायचा देखील
पण कसाही असला तरी खूप लडिवाळा होता
त्या काळातला पाऊस खूप वेगळा होता’

आता ही कविता आजच्या मुलांनी वाचली तर तीमुलं म्हणतील, काय त्या पावसातही वेगळेपण आहे? पावसासारखा पाऊस तो, उभ्या रेषांसारखं आभाळातून धारांनी कोसळणारं पाणी म्हणजे पाऊस. तसा तो आताही कोसळतोय आणि उद्याही कोसळणार आहेच. त्यात वेगळेपण काय? पण ज्यांनी अनुभव घेतलाय त्यांना कळेल या पावसाचं वेगळेपण.
पाऊस म्हणजे केवळ आभाळातून पडणारं पाणी नव्हे. तो सृष्टीचा चमत्कार आहेच पण त्याहीपलीकडे जाऊन आपल्या सर्वांचं जीवन अवलंबून असणारा श्‍वासानंतर दुसर्‍या क्रमांकाचा तो त्राता आहे. आमची शाळा साधारण जून महिन्याच्या १३-१४ ला सुरू व्हायची. हे दिवस म्हणजे संततधार पावसाचे दिवस. आमच्या आवाठातल्या शाळेत असो वा पाचवीनंतर घोटगेवाडी येथील शाळा असो, कुठल्याही शाळेत गेलो तरी चालतच जावं लागायचं. घोटगेवाडीची शाळा साधारण अडीच किमी अंतरावर आहे. शाळा तसंच हायस्कूलदेखील त्याच अंतरावर आहे. या शाळेत जाताना पायी जाणं हे आज जरी कंटाळवाणं वाटत असलं तरी त्यावेळी अत्यंत आनंदानं आणि न कंटाळता आम्ही चालत जात असू. पावसाळ्याच्या दिवसांत तर खूपच आनंद वाटत असे. महाविद्यालयीन जीवनातही अशा या पावसाचा आनंद मी शालेय जीवनासारखाच लुटलेला आहे. सावंतवाडीच्या पंचम खेमराज महाविद्यालयात मी बारावीला प्रवेश घेतला होता आणि रहायला कोलगाव येथे सावंतवाडी-कुडाळ रस्त्याला असलेल्या गावात आतेकडे होतो. कॉलेजमध्ये जाताना सकाळी आकाशाकडे पहायचं. जरा कुठं निळसर रंगाचं आभाळ दिसलं की, आज काही पाऊस नाही असा वेधशाळेसारखा अंदाज करायचा आणि केवळ पुस्तक (वह्या) घेऊन छत्री न घेता जायचं. पाठीमागून आते ओरडायची. पण तिच्या ओरडण्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करून न ऐकल्यासारखं करत निघून जायचं आणि कॉलेज सुटल्यानंतर त्यावेळी हमखास धो धो पाऊस कोसळायचा. बरं कॉलेज आणि बसस्थानक यांच्यात दीडएक किमी अंतर. बसनं यायचं झालं तरी स्टँडपर्यंत तरी कोणाच्या तरी छत्रीच्या आधारे यायचं. आणि मग कोलगाव बसस्टॉपवर उतरून तिथून पाच एक मिनिटांच्या अंतरावर असलेल्या घरी पावसात भिजून धावत धावत जात चिंब चिंब होत घरात घुसायचं. (अर्थात त्यानंतर आतेची बोलणी खावी लागे हे ओघानं आलंच.)
अकरावीला असताना आमचं गाव ते भेडशी येथील उच्च माध्यमिक विद्यालयात जातानाही असाच पावसाचा अनुभव घेतला. त्यावेळी तर आमच्या घरातून चालत जायचं. घोटगेवाडी, तिथून आडवळणाच्या वाटेने, शेतातून चिखल तुडवीत, होडीने वायंगणतड हा बसस्टॉप गाठायचा आणि त्यानंतर तिथून सकाळची ७.३० ची बस पकडायची. ती बहुधा मला चुकतच असे. त्यामुळे त्यानंतर एक तासाने बस. वायंगणतड येथून भेडशी तीन किमी अंतरावर. त्यामुळे मी अर्ध्या तासात भेडशीला पोहोचणार असा विचार करून तिथून पुन्हा चालत जात असे. बर्‍याच वेळा हा अनुभव आलेला आहे. हे अंतर ९ किमी व्हायचं. मी त्यावेळी बर्‍याच वेळा हे अंतर पायी चालून कापलेलं आहे. मी वर्गात पोहोचेपर्यंत पहिला पिरियड जवळजवळ संपायला आलेला असायचा. आणि मी वर्गात भिजून चिंब होऊन चिखल घेऊन प्रवेश करायचो. या पावसाचा मला त्यावेळी बहुधा राग यायचा. कारण मी कॉलेजला वेळेवर कधी पोहोचलोच नाही केवळ या पावसामुळे!
पहिली ते चौथीपर्यंतच्या वर्गात मोर्लेबाग येथीलच शाळा होती. त्या शाळेत जाताना एक व्हाळी मिळायची. त्या व्हाळीला जरी पाणी खूप मोठं नसलं तरी त्यावेळी आम्हांला ते खूप वाटायचं. लाल भडक पाणी वाहत येत होतं. आणि ते पाहून उरात धडकी भरायची. पण त्या पाण्यातून जाण्याची हौस होती. मध्येच खड्डा असायचा, त्यात पाय पडायचा, आणि पाणी ढोपरापर्यंत यायचं. मग भीतीने गाळण उडायची. मध्येच वाट निसरडी असायची, तिथे पाय घसरून पडणं हे तर नित्याचंच व्हायचं. पण ढोपर कधी फोडून घेतलं नाही. पाटीवरचा अभ्यास पुसून जायचाच पण तिसरी चौथीत वहीवरचा शाईच्या पेनाने लिहिलेला अभ्यासही वाहून जायचा. त्यामुळे बर्‍याच वेळा अभ्यास केलेला असूनही गुरुजींचा मार खायची वेळ आलेली होती. पण तरीही या पावसाचा राग कधी आला नाही. अजूनही कधी येत नाही. धो धो पाऊस पडत असताना आजीच्या कुशीत दरवाजाकडे गोधडी घेऊन बसण्यात एक वेगळीच ऊब आणि मजा होती. दारात पागोळ्यातून पडणार्‍या पावसाच्या धारा पाहताना स्वतः कधी पाऊस होऊन जात होतो ते कळतच नव्हतं. त्यावेळी कोणीतरी बातमी घेऊन यायचे की आज होडी बंद आहे, पुलावरून पाणी जातेय. होडी बंद असणं हे महापुराचं लक्षण होतं. कारण घोटगेवाडीहून वायंगणतडला जाण्यासाठी असलेली होडीची वाहतूक प्रचंड मोठ्या पाण्यात घालणं हे जिकिरीचं काम असायचं. त्यामुळे ज्यावेळी मोठं पाणी असेल त्यावेळी होडी बंद असायची. त्यावेळी कळायचं की आज मोठ्ठा पाऊस पडत आहे.
मग आम्ही, भाई, मी, संध्या, दादा असे खाली बागेत जायचो. खाली एक ओहोळ आहे, त्याला किती पाणी आलंय ते पहायचं असतं. त्यावेळी संपूर्ण माड-पोफळीतून पाणी वाहत असतानाचं दृश्य दिसत होतं. याला मालवणी भाषेत ‘और’ म्हणतात. ‘और इलां’ हा शब्दप्रयोग बहुतेक वेळा होत असे.
घोटगेवाडीला आमच्याकडून जाताना वाटेत असाच एक ओहोळ लागतो. त्याला ‘ताकाचा व्हाळ’ असं म्हणतात. त्या ओहोळावर (व्हाळावर) पूल बांधलेला आहे. पण त्या पुलावरही अशावेळी पाणी असायचं. त्यामुळे आमच्या गावचा जवळ जवळ जगाशी संपर्कच तुटायचा. पाचवीच्या नंतर घोटगेवाडीच्या शाळेत जाताना कित्येकवेळा या पुलावरून पाणी जात असताना मुद्दाम त्या पाण्यातून पलीकडे जायचं आणि परत मागे येऊन घरी परतून घरी मात्र पुलावर पाणी असल्यामुळ्े आम्ही परतून आलो असं सांगायचं. असं कित्येकवेळा केलेलं आहे. आज त्या गोष्टीचं हसू येतं. पण त्यावेळी एक मजा अनुभवलेली आहे. केवळ पावसाच्या पाण्यात भिजण्यासाठी आमचा खटाटोप असायचा. कित्येकवेळा आमच्याकडे असलेल्या छत्रीचा उपयोग आम्ही छत्री उघडून ती उलटी करायची आणि त्यात पाणी साठवण्यासाठीच करायचो. हे सारं होईपर्यंत आमच्या डोक्यावर पावसाने संततधार धरलेली असायची. आम्ही भिजून चिंब व्हायचो. पावसात छत्री गरागरा फिरवत इतरांवर पाणी फेकण्यासाठी आम्ही या छत्रीचा वापर करायचो. छत्रीच्या तीरांतून हे पाणी इतरांवर उडायचं आणि मग त्याच्या बदल्यात असंच पाणी आमच्यावर ते उडवत असत. अशावेळी ते पाणी आमच्यावर उडू नये म्हणून पाण्याच्या दिशेने छत्रीच आडवी धरायची. ते चार-पाच थेंब पाणी अंगावर उडू नये म्हणून पावसाच्या अखंड धारा अंगावर झेलत असू.
आज ते रम्य दिवस गेले. खरं तर पाऊसच तसा पडत नाही असं वाटू लागलंय. आम्ही मे महिन्याच्या सुट्टीत मामाच्या घरी गोव्यात बोरीला येत असू. त्यावेळी साधारण मे महिन्याच्या वीस तारखेनंतर पावसाळी वातावरण सुरू होई आणि एक दोन दिवसांत संध्याकाळच्या वेळी मस्तपैकी पाऊस सुरू होई. साधारण आठ दिवस अशा संध्याकाळच्याच वेळी हा पाऊस पडत असे. आणि मग आमच्या मनात नसतानादेखील घरी यावं लागे. त्यानंतर मग हळू हळू इकडे देखील असाच पाऊस सुरू व्हायचा आणि साधारण जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात खर्‍या अर्थाने पावसाळा सुरू व्हायचा. चतुर्थी झाली की पावसाचं प्रमाण कमी व्हायचं आणि ऑक्टोबर महिन्यात पाऊस पूर्ण थांबायचा. जवळ जवळ पाच महिने हा पाऊस असा पडत असे. दिवाळीच्या दिवसांत अगदी कडक थंडी पडत असे आणि फेब्रुवारी महिन्यापासून उन्हाळा सुरू व्हायचा.
आज काळ बदललेला आहे. त्याप्रमाणे निसर्गही बदललेला आहे. पंचांगाप्रमाणेच वेधशाळेचाही अंदाज पाऊस चुकवत पडतो वा गायब होत राहतो. आज जुलै महिन्यांत पाऊस कोसळेल याचा नेम नसतो. कडक उन्हाळा या महिन्यात अनुभवता येतो आणि नोव्हेंबर महिन्यात धुवाधार पावसाची शक्यता नाकारता येत नाही. आज पूल झाल्यामुळे ती होडीही बंद झालेली आहे. त्यामुळे पाण्याचा नेमका अंदाजही येत नाही. छत्रीची जागा रेनकोटने घेतल्यामुळे छत्रीतून पावसाचं दिसणारं आगळं वेगळं रूप बंद झालेलं आहे. आजी नाही, तिची गोधडीही नाही, त्यामुळे ती ऊबही नाहीशी झालेली आहे. निसर्गालाही काळानं बदलायला लावलेलं आहे, हा काळाचा महिमा आहे.