‘त्या’ उमेदवारांना मुलाखतींसाठी संधी

0
194

उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाने कंत्राटी तत्त्वावरील कनिष्ठ कारकून आणि डेटा एन्ट्री ऑपरेटरच्या जागांसाठी २९ रोजी आयोजित मुलाखतीची संधी हुकलेल्या इच्छुक उमेदवारांना मुलाखतीची नोंदणी करण्यासाठी २ व ३ फेब्रुवारीपर्यत मुदत वाढविली आहे. तसेच बुधवार ३१ रोजी सकाळी डेटा एन्ट्री पदासाठी अर्ज स्वीकारून मुलाखतीसाठी टोकन दिले जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नीला मोहनन यांनी काल दिली.

उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कंत्राटी पध्दतीवरील कनिष्ठ कारकून आणि डेटा एन्ट्री ऑपरेटर मिळून एकूण ६४ पदांसाठी सोमवारी आयोजित मुलाखतीसाठी दोन हजारांवर युवक युवतीनी हजेरी लावल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयाने गोंधळात कनिष्ठ कारकून पदासाठी उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. मुलाखती केवळ २३५ जणांचे अर्ज स्वीकारले. तर हजारो उमेदवारांचे मुलाखतीसाठी अर्ज स्वीकारण्यात आले नव्हते.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भोंगळ कारभारामुळे अनेक इच्छुक मुलाखतीपासून वंचित राहीले. राज्यात नोकर भरतीच्या मुलाखतीचा विषय चर्चेचा बनला आहे. सरकारकडून बेरोजगार युवक युवतींची थट्टा केली जात आहे, असा आरोप होऊ लागला. तसेच कॉँग्रेस, शिवसेना यानी या विषयावर आवाज उठवून चौकशीची मागणी केली होती. नोकर भरतीचा विषय तापदायक बनण्याची शक्यता निर्माण झाल्याने मुलाखतीसाठी मुदत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

२९ रोजी ज्या उमेदवारांना मुलाखतीची संधी मिळालेल्या नाही. त्या उमेदवारांनी २ व ३ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ५ यावेळेत जुन्या जीएमसी कॉम्प्लेक्समधील काऊंटरवर मुलाखतीसाठी अर्ज सादर करावेत. ज्या उमेदवारांनी मुलाखतीसाठी नोंदणी केली. तसेच ज्याच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. त्यांनी पुन्हा नोंदणी करण्याची गरज नाही.