‘त्या’ उमेदवारांच्या उद्यापासून मुलाखती

0
208

>> उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयातील भरती

येथील उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयातील कनिष्ठ कारकून पदासाठी ८ ते १० फेब्रुवारी दरम्यान अर्ज सादर केलेल्या उमेदवारांच्या तोंडी मुलाखती घेण्यात येणार आहेत. तर डेटा एन्ट्री ऑपरेटरपदासाठी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची तोंडी मुलाखती १२ फेब्रुवारीला उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात येणार आहेत.

उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात कंत्राटी पद्धतीवर दहा महिन्यांसाठी ४० कनिष्ठ कारकून आणि २४ डेटा एन्ट्री ऑपरेटरची नियुक्ती केली जाणार आहे. या दोन्ही पदांसाठी अर्ज सादर करण्यासाठी हजारो युवकांनी उत्तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रांग लावली होती. परंतु, उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाने केवळ मोजक्याच उमेदवारांचे नोकरीसाठीचे अर्ज स्वीकारल्याने नाराजी व्यक्त केली जात होती. उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयातील नोकर भरतीच्या विषयावर टिका होऊ लागल्याने दोन्ही पदांसाठी अर्ज सादर करण्यासाठी मुदत वाढविण्यात आली होती. कनिष्ठ कारकूनपदासाठी मुलाखतीसाठी एकूण ७९७ अर्ज ग्राह्य ठरले आहेत. नोकरीसाठी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना टोकन क्रमांक देण्यात आले आहेत. नोकरीसाठी अर्ज केलेल्या २३५ जणांची तोंडी मुलाखत घेण्यात आली आहे.

मुलाखतींचे वेळापत्रक…
८ रोजी सकाळी ९ वाजल्यापासून टोकन क्र. २३६ ते ३५०, दुपारी २ वाजल्यापासून टोकन क्र. ३५१ ते ४६० पर्यंत तोंडी मुलाखत घेतली जाणार आहे. ९ रोजी सकाळी ९ वाजल्यापासून टोकन क्र. ४६१ ते ५७०, दुपारी २ वाजल्यापासून टोकन क्र. ५७१ ते ६८०, १० रोजी सकाळी ९ वाजल्यापासून टोकन क्र. ६८१ ते ७९७ पर्यंत तोंडी मुलाखती घेतल्या जातील. १२ रोजी सकाळी ९ वाजल्यापासून डेटा एन्ट्री ऑपरेटरपदासाठी टोकन क्र. १ ते २२७ पर्यंतच्या उमेदवारांच्या मुलाखत घेतल्या जातील.