… त्यागात् शान्तिः अनंतरम्!

0
1814

– प्रा. रमेश सप्रे
‘शांती’ हा शब्द जरी उच्चारला तर डोळ्यासमोर गौतम बुद्ध, भगवान महावीर, सारे संत यांच्या शांतप्रसन्न मुद्रा उभ्या राहतात. पण यापूर्वीही उपनिषदांचे निर्माते ऋषीही आपल्या ज्ञानगर्भ विचारांचा शेवट ‘ॐ शांतिः शांतिः शांतिः’ अशा त्रिवार शांतिमंत्रानं करत असत. अत्यंत भीषण युद्ध सुरू होण्याच्या प्रारंभी भगवान् श्रीकृष्ण दिशाहीन झालेल्या अर्जुनाला दिग्दर्शन करताना ‘शांति’ हेच सर्वोच्च मूल्य आहे हे समजावून सांगतात.
एकापेक्षा एक श्रेष्ठ अशा मानवी मूल्यांचा उच्चार करत शेवटी कळस म्हणून शांती-गौरव करतात. युद्धाच्या पार्श्‍वभूमीवर केलेल्या या शांतीच्या उद्घोषाचं महत्त्व काळ्या ढगांच्या पार्श्‍वभूमीवर अधिकच तेजानं लखलखणार्‍या विजेसारखं आहे. भगवंताची वाणी हे सांगताना अधिकच गंभीर बनलीय-श्रेयो हि ज्ञानम् अभ्यासात् ज्ञानात् ध्यानं विशिष्यते|
ध्यानात् कर्मफलत्यागं त्यागात् शांतिरनंतरम्‌॥
(गीता – १२.१२)
– म्हणजे (मर्म न समजता केलेल्या) अभ्यासाहून (परमेश्‍वराच्या स्वरूपाचे अनुमान तर्कावर आधारलेलं) परोक्ष (इनडायरेक्ट) ज्ञान श्रेष्ठ आहे आणि अशा अप्रत्यक्ष ज्ञानापेक्षा परमेश्‍वराच्या स्वरूपाचं ध्यान श्रेष्ठ आहे. अशा ध्यानाहून सर्व कर्माच्या फलांचा माझ्यासाठी त्याग करणे (कर्मफलत्यागः) श्रेष्ठ आहे. कारण अशा त्यागामुळेच तत्काळ (अनंतरम्) परमशांती लाभते.
भगवंताच्या या सांगण्यातील क्रम महत्त्वाचा आहे. कोणत्याही गोष्टीचा अर्थ न समजता केलेल्या अभ्यास किंवा सरावापेक्षा ज्ञान श्रेष्ठ असतं. पण असं ज्ञानही अप्रत्यक्ष असू शकतं. म्हणून त्याच्यापेक्षा परमेश्‍वराचं ध्यान श्रेयस्कर असतं. यापुढे भगवंत अशा ध्यानापेक्षाही सर्व कर्माच्या फळाची वासना त्याग करण्याला महत्त्व देतात. कारण त्यागातून लाभणारी शांती हे मानवी जीवनाचं सर्वोच्च ध्येय आहे.
युद्धाच्या पार्श्‍वभूमीवर शांतीचं महत्त्व हा भगवान श्रीकृष्णाच्या उपदेशाचा विशेष आहे. पण जे त्रिकालाबाधित म्हणजे भूतकाळ-वर्तमानकाळ-भविष्यकाळ अशा तिन्ही काळात योग्य आहे ते सांगणे हाही गीतेचा महत्त्वाचा उद्देश आहे. केवळ निराश हताश अर्जुनाला युद्धासाठी उभा करून ते धर्मयुद्ध जिंकणं एवढाच उद्देश भगवंताचा निश्‍चितच नाही.
महाभारताच्या शेवटी युद्धात जसा कौरवांचा नाश होतो तसाच विनाश कृष्णाचेच वंशज यादव आपापसात लढवून घडवतात. श्रीकृष्ण आपल्या तटस्थ साक्षीभावानं हा सारा विनाश पाहतो. एवढंच नव्हे तर जिवंत राहिलेल्या उन्मत्त यादववीरांचा स्वतः नाश करतो. असं केवळ भगवान् कृष्णच करू जाणे! युगांत जवळ आला होता. द्वापरयुग संपून नव्या कलियुगाचा प्रारंभ होणार होता. याची पूर्ण जाणीव भगवंताला होती. अधर्माचा विनाश नि धर्माचं उत्थान (जागरण) हे त्याचं जीवनकार्य होतं. येणारं कलियुग अधिक हिंसक, पापी व भयंकर असणार याची त्याला पूर्ण जाणीव होती. जगाला अत्यावश्यक असा शांतीचा, अहिंसेचा, करुणेचा संदेश देणारा ‘बुद्ध’ अवतार घ्यावा लागणार हेही तो जाणून होता. एवढंच नव्हे तर कलियुगातील सतत वाढणार्‍या हिंसेची, भ्रष्टाचाराची, अन्यायाचीही त्याला कल्पना होती. अन् म्हणूनच शांती हे सर्वोच्च मूल्य असल्याची घोषणा त्याला करायची होती ती त्यानं अशा पद्धतीनं केली…
केवळ तात्त्विक अभ्यास व ज्ञानापेक्षा त्याचा प्रत्यक्ष व्यवहार महत्त्वाचा आहे. ध्यानधारणा करून केवळ कर्माची फळं भोगण्यापेक्षा त्यांना निरपेक्षपणे भगवंताला अर्पण करणं महत्त्वाचं आहे. स्वार्थी उपभोगापेक्षा निःस्वार्थी त्याग अधिक महत्त्वाचा आहे. कारण अशा त्यागातच परमशांतीचं मूळ असतं. शांती हे मानवी जीवनाचं सर्वोच्च मूल्य आहे.
आज एकविसाव्या शतकात भगवंताचे हे शब्द म्हणजे अमृतवाणीसारखे परमसत्य सांगणारे आहेत. सर्व आघाड्यांवर युद्धासारखी परिस्थिती असलेल्या आजच्या काळात तर भगवंताची ही वाणी अत्यंत आवश्यक व प्रभावी आहे.
भगवंताच्या उपदेशाचं वैशिष्ट्य हे की केवळ सिद्धांत सांगून ते थांबत नाहीत तर त्या सिद्धांतांचा – तत्त्वांचा – जीवनात व्यवहार, उपयोग करण्यासाठी प्रत्यक्ष मार्गदर्शनही ते करतात. अत्यंत प्रभावी उपाय सध्याच्या (कलियुगातील) स्फोटक परिस्थितीला तोंड देण्यासाठी ते सुचवतात –
१. मयि एव मन आधत्स्व – माझ्याठायी मन लाव. अखंड माझाच विचार कर. माझं चिंतन कर म्हणजे योग्य निर्णय घेण्यासाठी तुझं मन तयार होईल.
२. मयि बुद्धिं निवेशय – बुद्धीही माझ्यात गुंतवून ठेव. तिची इकडेतिकडे सुरू असलेली धाव थांबव. माझ्या स्वरूपाच्या चिंतनात तिला स्थिर कर.
३. मयि एव निवसिष्यसि – यामुळे तू सदैव माझ्यातच राहशील. म्हणजे इकडची तिकडची आकर्षणं, प्रलोभनं तुला माझ्यापासून विचलीत करणार नाहीत.
४. मयि चित्तं समाधातुं न शक्नोषि – भगवंत ही माऊलीसारखी दयाळू कृपाळू शक्ती आहे. अर्जुनाला (म्हणजेच आपल्याला) परमेश्‍वरात स्थिर होण्यासाठी अनेक उपाय किंवा पर्याय भगवंत सुचवताहेत. हे एका प्रिय शिष्यावरचं गुरूचं प्रेमच नाही का आपल्याला भगवंताच्या स्वरूपात (कार्यात) जर सदैव चित्त स्थिर करणं जमत नसेल तर भगवंत एकामागून एक असे अनेक पर्याय देताहेत. ‘जशी माऊली ग्रास देते मुलाला’ म्हणजे आई जशी काऊचिऊच्या गोष्टी सांगत मुलाला घास भरवत राहते तसे भगवंत आपल्याला हे नाही तर ते खा किंवा हे जमलं नाही तर ते करून पहा- असे अनेकानेक पर्याय सुचवताहेत.
५. अभ्यासयोगेन माम् आप्तुं इच्छ – म्हणजे अभ्यासयोगानं मला प्राप्त करण्याची इच्छा कर. पुन्हा पुन्हा प्रयत्न कर. नवे नवे प्रयोग कर. अशा अभ्यास योगानं माझी प्राप्ती कर म्हणजेच अखंड आनंदात रहा. तसं पाहिलं तर भगवंत आपल्या हृदयातच असतात. आपण त्यांना जागं करून जीवनात उतरवणं महत्त्वाचं असतं.
६. अभ्यासेऽपि असमर्थः असि – भगवंत सांगताहेत अभ्यास योगानं – पुन्हा पुन्हा नवे नवे प्रयोग करून मलाच येऊन मिळण्याला जरी असमर्थ असशील तरी चिंता करू नकोस. याच्यापेक्षाही सोपा उपाय भगवंत सुचवताहेत.
७. मत्कर्म परमो भव – सारी कर्म माझ्यासाठी, मला अर्पण करण्याच्या भावनेनं कर. नैवेद्य भावनेनं सारी जीवनातली कामं कर. अर्थात आत्ता युद्ध कर. युद्धाचा परिणाम काय होईल याची चिंता आपल्यावर सोपवायला भगवंत अर्जुनाला सुचवताहेत. युद्ध हे माझंच – मी सांगितलेलं – कर्म आहे असं म्हणून कर्म करायला सिद्ध व्हायला अर्जुनाला सांगताहेत.
८. मदर्थं कर्माणि कुर्वन् – एवढंच नव्हे तर युद्धातली सारी कर्मं (पराक्रम) माझ्यासाठीच म्हणजे भगवंतासाठीच आहे असं समजून मनापासून युद्ध करण्याची प्रेरणा भगवंत अर्जुनाला देताहेत.
९. अथ एतत् अपि कर्तुम अशक्तः असि – भगवंत इथं सद्गुरुमाऊलीची भूमिका घेताहेत. जर मी सांगितलेलं कर्म म्हणून युद्ध करणार नसशील तर माझ्यासाठी (मदर्थम्) युद्ध कर. पण हेही जरी तुला अवघड, अशक्य वाटत असेल तर निदान हे तरी कर.
१०. सर्वकर्मफलत्यागम् – युद्धात आवश्यक त्या सर्व कर्मांचा नव्हे तर कर्माच्या फलासक्तीचा त्याग कर (अन् मला शरण ये.) म्हणजे युद्धकर्म तुला करावंच लागेल पण त्यातून निर्माण होणारी फलं (परिणाम) तू मला अर्पण कर. यश-अपयश, हिंसा-अहिंसा, आप्तजनांचं कल्याण-अकल्याण या गोष्टींचा विचार करू नकोस. माझ्यासाठी सर्व कर्मांच्या फलाचा (परिणामाचा) त्याग कर. एका अर्थानं कर्मफलाचा मला नैवेद्य दाखव. सारं मला अर्पण कर. पण युद्ध हे तुला करावंच लागेल.
भगवंताच्या या सांगण्याला अनेक पैलू आहेत. अन् ते सारे आपल्या दैनंदिन जीवनासाठी मार्गदर्शक आहेत..
* कर्म केलं की त्याचं फळ हे असतंच. किंबहुना फळ मिळावं म्हणूनच तर बहुतांश कर्मं केली जातात. अशा परिस्थितीत कर्माच्या फळांचा त्याग ही व्यवहारात पटणारी गोष्ट नाही. फळाचा त्याग करायचा तर मग कर्म तरी कशाला करायचं? अशी कर्मच न करण्याची प्रेरणा मिळू शकते, पण भगवंत असं चुकीचं सांगतीलच कसं? त्यांना सुचवायचंय ते हे की कर्माचा वा कर्माच्या फळाचा त्याग नाही करायचा. किंबहुना तो करताही येणार नाही. असा त्याग करता आला असता तर नरकात कोणीच गेलं नसतं किंवा कर्म न करण्याचीच बुद्धी सर्वांना झाली असती. पण भगवंताना कर्मफल त्याग कर म्हणताना कर्मफलाच्या आसक्तीचा त्याग अपेक्षित आहे. नाही तर फळ टाकायचं तर कर्म करायचं कशाला अशी अकर्मावस्था निर्माण होईल. भगवंताना सुचवायचंय की कर्माचा वा कर्माच्या फळाचा त्याग करायचा नाही तर कर्मफळाच्या आसक्तीचा त्याग करायचा. फळाची अपेक्षा न ठेवता निरपेक्ष भावनेनं कर्म करत राहणं हा आदर्श कर्मयोग आहे. हा गीतेचा एक महत्त्वाचा संदेश आहे.
* भगवंतांनी अर्जुनाला कळत न कळत कर्मविषयक तीन गोष्टी सांगितल्याहेत. मत्कर्म, मदर्थकर्म आणि मदर्पण कर्म!
जे जे काही करायचं ते भगवंताचं कर्म म्हणून करायचं हे मत्कर्म म्हणजे भगवत्कर्म.
दुसरं म्हणजे जे जे काही करायचं ते भगवंतासाठी म्हणजेच भगवदर्थ म्हणजे मदर्थ कर्म करायचं. ‘कोणासाठी हे अन्न मी सेवणार?’ – हा विचार प्रत्येकानं ‘वदनी कवळ (घास) घेताना’ केला पाहिजे. मी जेवून आलेल्या – मिळालेल्या – शक्तीनं इतरांना अन्न भरवणार आहे. इतरांच्यात परमेश्‍वराला पाहून ‘जनसेवा हीच ईशसेवा’ या भावनेनं सेवा करणार आहे.
तिसरं म्हणजे ‘भगवदर्पण’ कर्म म्हणजे भगवंताला अर्पण केलेलं कर्म म्हणजेच नैवेद्य भावानं, त्याग भावनेनं केलेलं प्रत्येक कर्म.
सर्वांत मुख्य म्हणजे व्यवहाराच्या, प्रपंचाच्या दृष्टीनं जरी मी कर्ता असलो वा दिसलो तरी प्रत्यक्षात कर्मकर्ता हा परमेश्‍वरच आहे. कर्ता-धर्ता-करविता-सवरता सारा परमेश्‍वर या भावनेनं काम करताना कधी थकल्यासारखं वाटत नाही उलट…
‘तया सर्वात्मका ईश्‍वरा| स्वकर्म कुसुमांची वीरा |
पूजा केली होय अपारा| तोषालागी ॥
या ज्ञानोबा माऊलीच्या उद्गारांनुसार सारी कर्मं ही देवपूजाच बनतात.
जशी- सावत्याचं मळा शिंपणं व फुलवणं; गोर्‍याचं चिखल तुडवणं व मडकी बनवणं; चोख्याचं मेलेली गुरं ओढणं व गावकुसाबाहेर नेऊन पुरणं; जसं जनाबाईचं दळण कांडण करणं व शेण्या थापणं; कबिराचं शेले विणणं किंवा मीरेचं ‘पद घुँगरू’ बांधून कृष्ण भजनात तल्लीन होणं… सारा कर्मातून भक्तीकडे व भक्तीतून परमेश्‍वराकडे नेणारा योग आहे. यात चिरकाल टिकणारी शांती-मनःशांती-आहे.
याचा आरंभ मात्र मधाचा थेंब आवडल्यावर सार्‍या मडक्यातला मध पिण्यासाठी प्रयत्न करणार्‍या जावईबापूंप्रमाणे फजिती करणारा नसला पाहिजे तर… भगवद्भक्तीसाठी चोवीस तास नाही तर चौवीस मिनिटं नव्हे चोवीस सेकंद… इतकंही जमलं नाही तरी एक चोविसांश तरी वेळ द्यायला आरंभ करावा. ‘मोटके निमिषभरी देतुजाय|’ या ज्ञानोबामाऊलींच्या उपदेशानुसार .. अशा निमिषभर (क्षणभर) नामानं अख्खं जीवन व्यापून राहिल्याशिवाय राहणार नाही कारण संतवाणीच नाही का? .. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा…॥
अन् मनःशांती हेच मानवासाठी अमृत नाही का? ॐ शांतिः शांतिः शांतिः॥