त्यांचा माणूस म्हणून विचार व्हावा…

0
125
  • देवेश कु. कडकडे (डिचोली)

समज – गैरसमजांची किल्मिषे दूर झाली तरच समाजाची स्वीकृती मिळते. या वेगळे जीवन जगणार्‍या समाजाने, माणसानी माणसांशी माणसांसारखे वागावे एवढी माफक अपेक्षा एका मोठ्या समाजाकडून बाळगणे गैर नाही.

सध्या भारतासह संपूर्ण जगात समलिंगी संबंधांना कायदेशीर मान्यता देण्यासंबंधी चळवळ जोर धरत आहे. याला विरोध करणारा मोठा वर्ग कडाडून टीका करीत आहे, तर समलिंगी समुदाय आपला मानवी हक्क जपण्यासाठी कायदेशीर संरक्षणाची मागणी करीत आहे. समाजात १५% माणसे ही समलिंगी आहेत, जी लैंगिक अल्पसंख्यांकात मोडतात. त्यांच्या वाट्याला शतकानुशतके आलेली असमानता, जाचक अवस्था त्यांना दुर्दैवाने स्वीकारावी लागली. या व्यक्ती सर्वसाधारण असतात, दिसतात, त्यांचे व्यवहार सर्वसाधारण व सर्वसामान्यांसारखेच असतात. त्या व्यक्तींची बौद्धिक क्षमता, जडणघडण भिन्नलिंगी व्यक्तीप्रमाणे असून ते निरोगी आयुष्य जगत असतात. ऑस्कर वाईल्ड, शतकातील सर्वश्रेष्ठ खेळाडू म्हणून गौरवलेला कार्ल लुईस, बिल जी किंग अशा अनेक प्रसिद्ध व्यक्ती समलिंगी म्हणवून घेत होत्या. त्यामुळे ही मनोविकृती नसून ते ८५% माणसांपेक्षा वेगळे आहेत आणि समाजात त्यांना मान्यता नसल्यामुळे गुंतागुंतीचे प्रश्‍न निर्माण झाले आहेत. हिंदू, मुस्लिम, ख्रिस्ती, जैन अशा बहुसंख्य धर्मांत अशा प्रकारच्या संबंधांना मान्यता नाही. अधिकतर धर्माने असले संबंध म्हणजे नैतिकतेचे अधःपतन मानले, त्यामुळे पूर्वी अशांना कठोर शिक्षा दिली जायची. अशा व्यक्तींना समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागे. प्राचीन भारतातही असे संबंध असावेत, कारण त्याबद्दल ऋषी वात्सायन आपल्या कामसूत्र या ग्रंथात या संबंधाचा तीव्र निषेध करतात आणि स्वास्थ्याच्या दृष्टीने त्यांनी असे संबंध हानीकारक मानले आहेत.

मानसशास्त्रात यावर परस्पर विरोधी मते आहेत. काहींना ही मानसिक विकृती वाटते, तर काही जण हा निष्कर्ष खोडून काढतात. समाजात अशा व्यक्तींना स्थान मिळण्यासाठी त्यांच्या समर्थकांनी बराच प्रयत्न चालवला आहे. वैज्ञानिकांच्या मते आनुवंशिक आणि गर्भात असताना होर्मोन्सची गडबड आणि वातावरणाचा प्रभाव ही कारणे मानली जातात आणि ही सामान्य प्रक्रिया असून मनुष्याबरोबर ती इतर प्राण्यांमध्येही अस्तित्वात आहे. मुले-मुले, मुली-मुली अशी घट्ट मैत्री होते. त्यात भावनिक आधार शोधण्याचा प्रयत्न होतो. लहानपणी असलेल्या लैंगिक घटनांबद्दल तीव्र मानसिक आघात, सभोवतालचे वातावरण यातून या प्रक्रियेला गती मिळते. लहान वयात समलिंगीबद्दल आकर्षण असले तरी त्यात शारीरिक सुखाचा भाग असतोच असे नाही. काही जणांची ही अवस्था जन्मभर टिकते. काही जण यातून बाहेरही पडतात, तर काही जण द्विधा परिस्थितीत अडकतात. जर यांना समजून घेतले नाही तर यातून शारीरिक, मानसिक असे अनेक दुष्परिणाम संभवतात. समाजातून मिळणारी कुत्सित, अपमानकारक वागणूक, कुटुंबाच्या दबावापुढे होणारी घुसमट यामुळे अनेक समलिंगी व्यक्तिंचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. कौटुंबिक दबावामुळे यांचे भिन्नलिंगी बरोबर केलेले विवाह टिकत नाहीत. पती-पत्नीचे घटस्फोट होतात. काही जण तणावग्रस्त स्थितीत आत्महत्येचा मार्गही स्वीकारतात, तर काही दारू, ड्रग्ज यांच्या आहारी जातात.

आपल्या देशात ३७७ कलमानुसार समलिंगी संबंध हा गुन्हा ठरवला असून त्याचा अनैसर्गिक कृत्यात समावेश केला गेला आहे, कठोर शिक्षेची तरतूदही आहे. इंग्रजांनी हा कायदा १९ व्या शतकात केला, तोच अस्तित्वात आहे. परदेशात या संबंधांना कायदेशीर मान्यता दिली आहे, तर काही देशांनी याला सक्त विरोध दर्शविला आहे. नेदरलँड हा २००१ साली याला कायदेशीर मान्यता देणारा जगातील पहिला देश आहे. आज तिकडे अनेक समलिंगी जोडप्यांचा विवाह होत आहे. १९ व्या शतकात मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून समलिंगी संबंध अनैसर्गिक मानले जायचे. ही एक विकृती आहे असे डॉक्टरांचे मत पडल्यामुळे समलिंगी व्यक्तींवर शस्त्रक्रिया, औषध, शॉक थेरपी, मोहिनी विद्या, समुपदेशनासारखे विविध उपचारांचे मार्ग अवलंबवले जायचे. डॉक्टरांचे उपाय निष्फळ ठरले. परंतु कालांतराने संशोधनाद्वारे ही व्याख्या बदलून वैज्ञानिकांनी यावर उपचार नसल्याचे मान्य केले.

१९ व्या शतकाच्या प्रारंभी स्त्रीवादी चळवळीचे वारे पाश्‍चिमात्य देशातून जोराने वाहू लागले. स्त्री-पुरुषांमधील लैंगिक नाते हे पुरूषकेंद्री – पितृप्रधान विचारसरणीचे द्योतक आहे. त्यात समन्वय नसल्यामुळे पुरूषद्वेषाची भूमिका स्वीकारत स्त्रीवादी चळवळीच्या माध्यमातून समलिंगी संबंधाचे समर्थन करणार्‍या संस्था पाश्‍चिमात्य राष्ट्रांत स्थापन झाल्या. भिन्नलिंगी लैंगिक संबंधाचे समर्थन करून समलिंगी संबंधांना विरोध करणारी व्यक्ती स्त्रीमुक्तीवादी असूच शकत नाही, असा आग्रही विचार काही स्त्रीवादी संघटनांनी मांडला. १९७० च्या सुमारास मानवी हक्काच्या दृष्टीकोनातून या संबंधाचे समर्थन करणारे लेखन प्रकाशित झाले. विदेशा व्यतिरिक्त भारतातही यावर चित्रपट निर्माण झाले. त्यात समलिंगी व्यक्तींना समाजाकडून मिळणार्‍या क्रूर वागणुकीवर प्रकाश पाडला. त्यांची होणारी घुसमट, आयुष्याची वाताहात मांडण्यात आली आहे.

ज्या समाजात लैंगिक विषयावर चोरटेपणाने बोलले जाते, अपराध मानला जातो, अशा देशात यावर उघडपणे बोलण्याचे धाडस कोणी करणार नाही. आपल्या देशातील मोठा वर्ग या संबंधाबद्दल पूर्णतः अनभिज्ञ आहे. पाश्‍चिमात्य संस्कृतीतून ज्या काही अनिष्ट प्रथा आणि विकृती भारतात आल्या, यापैकी हीही एक विकृती आहे असाच गैरसमज आहे. त्यामुळे अशा व्यक्तींबद्दल मुळातच एक प्रकारची घृणा आणि किळस निर्माण होते. हे सर्व निसर्गाच्या नियमाच्या विरुद्ध असून विवाह हा पुरुष आणि स्त्री मध्येच होत असतो. चार भिंतीच्या आड काय करणे हा आपला व्यक्तिगत मुद्दा आहे, परंतु जेव्हा अनैतिक कृती सार्वजनिकरित्या घडतात तेव्हा त्याचे समाजमनावर काय परिणाम होतील याचाही विचार झाला पाहिजे. समलिंगी विवाहांना मान्यता दिली तर निसर्गचक्र थांबू शकते, प्रजनन ही क्रियाच अशाने कुंठीत होण्याचा धोका आहे असे अनेक मतप्रवाह आपल्या समाजात आहेत.

मुळात आपण एका विशिष्ट समाजाचा त्यांच्या दृष्टीने विचारच करत नाही. माणूस अगदी सहजतेने काही माणसांना वेगळे टाकतात. हे वेगळेपण कोणीही स्वेच्छेने स्वीकारलेले नसते. अशा अनेक लैंगिक शोषणाच्या घटना लज्जेच्या नावाखाली अथवा दबावाखाली दडपल्या जातात. त्याचप्रमाणे समलिंगी व्यक्तिंना दबावाखाली दडपून ठेवले जाते. आपण शहरातील वेश्यावस्त्या बंद करू शकलो नाही. समलिंगी व्यक्तींना वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले जाते. त्यांना पापी मानले जाते. तीही आपल्यासारखीच माणसे आहेत. १५% समलिंगी व्यक्तींना उर्वरित ८५% माणसांसारखे मन आणि भावना आहेत. एक माणूस म्हणून जगण्याचा त्यांनाही पूर्ण हक्क आहे. भविष्यात त्यांना कायद्याने हक्क मिळेल अथवा नाकारण्यात येईल. जरी कायद्याने हक्क मिळाला तरीही त्याची अंमलबजावणी समाजाच्या विविध माध्यमांतून होण्याची आवश्यकता असते. समज – गैरसमजांची किल्मिषे दूर झाली तरच समाजाची स्वीकृती मिळते. या वेगळे जीवन जगणार्‍या समाजाने, माणसानी माणसांशी माणसांसारखे वागावे एवढी माफक अपेक्षा एका मोठ्या समाजाकडून बाळगणे गैर नाही.