…तोपर्यंत केंद्रीय नेत्यांना गोवा बंदी

0
249

>> म्हादईप्रश्‍नी डिचोलीत नागेश करमली यांचा इशारा

कर्नाटकने बेकायदा धरण प्रकल्प उभारत गोव्याची जीवनदायिनी म्हादईचा गळा घोटला आहे. मात्र राजकीय स्वार्थासाठी गोवा व केंद्राने हे कारस्थान आखले असून जोपर्यंत गोव्याचे हित केंद्र सरकार जपत नाही तोपर्यंत केंद्रातील एकाही मंत्र्याला गोव्यात पाऊल टाकू दिले जाणार नाही असा इशारा ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक नागेश करमली यांनी डिचोली येथे दिला.

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत म्हादई बचावसाठी धरणे आंदोलन डिचोली आयोजित केले होते. यावेळी सुभाष वेलिंगकर, अरविंद भाटीकर, गुरुनाथ केळेकर, एलविन गोम्स, आत्माराम गावकर, प्रदीप घाडी आमोणकर, प्रदीप पाडगावकर, धीरज सावंत, भोला गाड, धीरज सावंत, रामचंद्र पळ, स्वाती केतकर, नारायण बेतकीकर, शैलेश फातर्पेकर, प्रवीण सावंत, अमृत सिंग, प्रवीण नेसवणकर व इतर विविध संस्थांचे प्रतिनिधी व नागरिक उपस्थित होते.

सुभाष वेलिंगकर यांनी, या आंदोनाचा उद्देश जागृती करणे व जर म्हादईचे पाणी वळवले गेले तर गोव्याचा आगामी ३० वर्षात वाळवंट होऊन पर्यावरण, अभयारण्य, मानवी व वन्यजीव, शेती उद्ध्वस्त होणार असून त्याबाबत सावध करणे हा असल्याचे सांगितले.

एल्विस गोम्स यांनी, राजकीय स्वार्थासाठी गोव्याची अस्मिता राज्य सरकारने विक्रीस काढल्याचा आरोप केला.
अरविंद भाटीकर यांनी, गोव्याच्या हक्काचे पाणी गोव्याला मिळायलाच हवे व त्यासाठी राज्य सरकारने खंबीर असायला हवे असे सांगितले. यावेळी इतर वक्त्यांनी गोवा सरकारच्या भूमिकेचा निषेध नोंदवला.