तोगाडियांचे अश्रू

0
233

प्रक्षोभक आणि चिथावणीखोर भाषणांबद्दल कुख्यात असलेले विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रवीण तोगाडिया यांचे रहस्यमयरीत्या बेपत्ता होणे, काही तासांनी बेशुद्धावस्थेत सापडणे आणि नंतर आपले एन्काऊंटर केले जाण्याची शक्यता त्यांनी पत्रकार परिषदेत भिजल्या डोळ्यांनी व्यक्त करणे या नुकत्याच घडलेल्या नाट्यमय घटनाक्रमातून संघपरिवारातील दोन प्रवाहांमधील संघर्ष प्रथमच एवढ्या ढळढळीतपणे देशासमोर आला आहे. एकीकडे सत्तेमुळे हिंदुत्ववाद आता अपरिहार्यपणे बाजूला ठेवावा लागेल याचे भान असलेले सत्ताधारी आणि दुसरीकडे पूर्वीचा आगलावेपणा सुरूच ठेवणारे आणि त्याबाबत आग्रही असणारे कडवे या दोन प्रवृत्तींमध्ये गेली काही वर्षे हा संघर्ष सुरू आहे. यात पालकसंस्था असलेला रा. स्व. संघ सध्या सत्तेच्या पाठीशी उभा आहे. त्यामुळे बजरंग दल, विश्व हिंदू परिषद यासारखी आक्रमक हिंदुत्वाचा पुरस्कार करण्यासाठी उभारली गेलेली व्यासपीठे आज सत्ताकाळात भाजपा व पर्यायाने रा. स्व. संघास गैरसोयीची ठरू लागली आहेत. परिणामी प्रवीण तोगाडिया, विनय कटियार, उमा भारती, साध्वी ऋतंबरा यांच्यासारखे आक्रमक हिंदुत्ववादी नेते आपसूक पिछाडीवर गेले. काहींनी निमूट नांगी टाकली, तर काहींनी संघर्षाचा पवित्रा घेतला. ज्यांनी नांगी टाकली त्यांना केंद्रात मंत्रिपद, राज्यसभेची खासदारकी मिळाली, तर ज्यांनी संघर्ष केला त्यांना त्याची किंमत चुकवावी लागली. तोगाडियांनी तर आपले एकेकाळचे सहकारी नरेंद्र मोदी यांच्याशी जाहीर संघर्षाचा पवित्रा घेतला. गुजरातमधील गेल्या विधानसभा निवडणुकीतही तोगाडिया आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी भाजपाविरुद्ध काम केल्याची तक्रार आहे. त्यामुळे ते आज पूर्णतः एकाकी पडले आहेत आणि त्यांना विश्व हिंदू परिषदेच्या आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदावरून हटविण्याचा जोरदार प्रयत्न गेल्या महिन्याअखेरच्या विहिंपच्या भुवनेश्वरच्या बैठकीत झाला. विहिंपचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष राघव रेड्डी यांच्या जागी हिमाचल प्रदेशचे माजी राज्यपाल व्ही. कोकजे यांचे नाव तोगाडिया विरोधकांनी पुढे केल्याने ती निवडणूकच बेमुदत पुढे ढकलली गेली आहे. तोगाडिया हे विहिंपचे आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आहेत आणि कार्यकारी अध्यक्षाची निवडणूक होत नसते तर अध्यक्षांकडून नेमणूक होत असते हे लक्षात घेतले तर तोगाडियांना पदावरून दूर करण्यासाठीच कोकजेंचे नाव पुढे केले गेले हे उघड आहे. या घटनाक्रमामुळे तोगाडिया व्यथित होते. त्यातच आपल्या जुन्या चिथावणीखोर वक्तव्यांमुळे स्वतःहून ओढवून घेलेली नानाविध न्यायालयीन प्रकरणे आता शेकू लागली आहेत. न्यायालयांच्या समन्सची पर्वा न करता त्यापासून दूर दूर पळणार्‍या तोगडियांना शेवटी कायद्याच्या कचाट्यातून सुटणे सोपे नसते हे आता उमगू लागले आहे. अशाच एका खटल्यासंदर्भात न्यायालयाचे अटक वॉरंट घेऊन आलेल्या पोलिसांना चकमा देण्यासाठी त्यांनी हा सारा खटाटोप केला, परंतु प्रकृती ढासळल्याने आणि त्यांचा बनाव पोलिसांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने सारा घटनाक्रम पुराव्यानिशी समोर आणून उघडा पाडल्याने हे नाटक पूर्णपणे फसले आहे. त्यांच्यासोबतच्या सार्‍या आरोपींवर खटले उभे राहिले, ते न्यायालयांनाही सामोरे गेले, परंतु तोगाडिया आजवर थोडथोडकी नव्हे, तर दहा दहा, वीस वीस वर्षे स्वतःची अटक चुकवत राहिले होते. आताही पोलीस पकडायला आल्याचे कळताच आपण गुजरात व राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांशी, गृहमंत्र्यांशी बोलल्याचे ते स्वतःच सांगत आहेत. म्हणजे तेथेही आपल्या राजकीय सूत्रांचा वापर त्यांनी करून पाहिला. शिवाय पोलीस पकडायला येत आहेत याची माहिती त्यांना आधीच समजली होती, मग ते कोणाच्या आदेशावरून येत आहेत याची माहितीही तोगाडियांना असलीच पाहिजे. तरीही त्यांनी हा अपहरणाचा बनाव केला. अर्थात, झेड प्लस सुरक्षा असलेल्या तोगडियांना एकटे जाऊ दिले गेले ही सुरक्षा यंत्रणेची गंभीर चूक आहे. ते जेथे बेशुद्धावस्थेत सापडले त्या कोटारपूरमध्येच इशरतजहॉं एनकाऊंटर घडले होते आणि ज्या चंद्रमणी इस्पितळात त्यांना दाखल केले गेले तेथेच त्या प्रकरणातील आयपीएस अधिकारी पी. पी. पांडे दाखल झाले होते हा निव्वळ योगायोग कसा मानायचा? तोगाडियांना काय सूचित करायचे आहे ते त्यांच्या पत्रकार परिषदेतून तर पुरते स्पष्ट झाले आहे. फक्त त्यांनी नावे घेण्याचे टाळले. संघपरिवारात मतभेद असू शकतात, परंतु मनभेद नसतो असे आजवर सांगितले जायचे. परंतु स्वतः कॅन्सर सर्जन असूनही आक्रमक हिंदुत्वासाठी आयुष्य वेचलेल्या तोगाडियांची आसवे पाहता मतभेदांचे रूपांतर आता मनभेदांमध्ये झाल्याचेच स्पष्ट होते आहे. एकाकी तोगाडियांच्या समर्थनार्थ एकही जण पुढे येत नाही यातच त्यांचे भवितव्य स्पष्ट दिसते आहे.