‘ते’ आणि त्यांचं नशीब!

0
258

अ‍ॅड. रमाकांत खलप

आपण निदान चांगलं स्वप्न पाहूया. जग कोरोनापासून मुक्त झालंय असं ते स्वप्न असू दे. त्यासाठी सरकार कोणाचेही असो, त्यांनी फर्मावलेली शिक्षा (?) भोगूया. एखादा संशोधक कोरोनाविरोधी लस वा औषध शोधून काढतोय एवढं एक स्वप्न तरी प्रत्यक्षात उतरो यासाठी सर्वधर्मीय जगत्नियंत्यांची प्रार्थना करूया!

 

कोरोना व्हायरसमुळे जगातल्या जातीपाती, धर्म बुडालेत. ‘कोरोनाग्रस्त’ आणि ‘इतर’ अशा दोनच जाती उरल्यात. त्यातले कोरोनाग्रस्त ‘अस्पृश्य’ आहेत. त्यांना हात नाही लावायचा, त्यांच्या जवळही जायचं नाही; ते व त्यांचं नशीब! अशीच जगभर परिस्थिती आहे. जे डॉक्टर, परिचारिका त्यांच्यावर उपचार करताहेत तेही बिचारे ‘भायरे’- अस्पृश्य झालेत. त्यांच्यासाठी आम्ही टाळ्या पिटल्या. त्यांचे आभार मानल्याचे नाटक सुंदर वठवले. आता ते आणि त्यांचं नशीब. त्यांचं नशीब बलवत्तर असलं तरच ते आमच्यात परत येतील; अन्यथा… जे ‘इतर’ आहेत, म्हणजे ज्यांना कोरोनाचा संसर्ग नाही झालाय त्यांनी आपापसात निदान सहा फुटांचं अंतर ठेवायचं आहे. न जाणो कुठूनतरी कोरोनाने शिरकाव केला तर? शिवाय पुन्हा पुन्हा साबणपाण्याने हात धुवायचे, गरम पाणी पीत राहायचे, दिवसातून निदान दोन वेळा मिठाच्या पाण्याच्या गुळण्या कराव्यात, ताप असल्यास वैद्यकीय उपचारांसाठी धावायचे; आणि हे साधे नियम न पाळल्यास ‘कोरोना’ला सांगायचं ‘कहो(रो)ना तुझं आमच्यावर किती प्रेम आहे.’ मग कोरोनाच्या अमर प्रेमाला आलिंगन देण्यात तुम्ही मोकळे असाल.

असा हा कोरोना नावाचा विषाणू चीनमधून आयात झालाय की स्पेन वा इटलीने आमच्याकडे निर्यात केलाय यावर खल करण्यात अर्थ नाही. तो महाभयंकर आहे, प्रलयकारी आहे हे सगळ्यांना उमजलंय. सारं जग त्याविरुद्ध लढतंय तरीही तो फैलावतोय. याला कारण आम्हीच. त्याला आमच्या निष्काळजीपणामुळे, हडेलहप्पी वागणुकीमुळे आणि एकंदरीत आमच्या पाचविला पूजलेल्या आमच्याच घाणेरड्या सवयीमुळे आपण निमंत्रण देतोय. घसा खाकरून, नाक शिंकरून कफाची ‘कालवं’ इथं-तिथं टाकणं हा आमचा राष्ट्रधर्म आहे. शिंकणं, थुंकणं- अगदी दुसर्‍यावरसुद्धा- आमचा मानवाधिकार आहे; शिवाय आजारी माणसाची भेट घेणं, त्याच्या रोगाची पर्वा न करता त्याला खेटून बसणं, आणि असं न केल्यास आपण भ्रातृधर्मही पाळला नाही म्हणून स्वतःस दोष देणं; रोगाचा प्रादुर्भाव ज्याला झालाय त्याचं ते प्रारब्ध, मागच्या जन्मीचं पाप असा तोरा मिरवणं आमचं आध्यात्मिक कर्तव्य आहे. तेव्हा ‘कोरोनाबाळा, कहो ना प्यार हैं’ अशा भाषेत त्याला निमंत्रण देणं हाच आमचा मोक्षमार्ग, नव्हे का?

कोरोनामुळे प्राण कंठाशी आलेत याची जाणीव आम्हाला निश्चित आहे. पण सरकारचे हुकूमनामे धुडकावले नाहीत तर आमचा पुरुषार्थ कसा मिरवणार? धान्य दुकानासमोरची, मासळी बाजारातली गर्दी आमची शान आहे हे सरकारला कसं कळत नाही हा आमचा प्रश्न आहे. अर्थात धान्याचा, भाजीपाल्याचा तुटवडा झाला तर खाणार काय हा प्रश्न काही अगदीच अव्हेरण्यासारखा नाही. त्यावर उपाय आहेत. परंतु सरकारलासुद्धा वेळ हवाय. सरकारने सार्‍या यंत्रणा सुरळीत केल्यावरच हवं तर कोरोनाने यावे असा हुकूमनामा अगदी मोदी-शहानासुद्धा काढता येणार नाही. त्यासाठी स्वतःच ‘मोदी’ बनून, ‘मित्रा, घरात बसून खा, खाण्याची-प्यायची चणचण भासल्यास मदत केंद्राकडे विनवणी कर, एखादा दिवस उपवास घडल्यास ‘एकादशी’ साजरी केल्याचे भाग्य अनुभव, आणि आसपासच्या कुत्र्या-मांजरांची आणि भुकेल्यांची कदर कर तेव्हढंच पुण्य मिळेल असं स्वतःस सांगून घे.’ हाच देशभक्तीचा आणि ईश्वरभक्तीचा सोपा-सरळ मार्ग आहे. त्यावरून आपण चाललो आहोत अशा आभासी वातावरणात घरीच बसा, कुठेही जाऊ नका, इतरांत मिसळू नका. व्यायाम, प्राणायाम, चिंतन, मेडिटेशन करण्याची संधी कोरोनाने दिली आहे, ती या जन्मी पुन्हा मिळणार नाही. आयुष्यातील आजवरच्या घडामोडींचा जमाखर्च तपासण्याची ही सुवर्णसंधी आहे. गायक-वादकांना फक्त रियाजच नव्हे तर आपली स्वतंत्र ‘घराणी’ निर्माण करण्याची हीच वेळ आहे. चित्रकार, शिल्पकारांना अजरामर कलाकृती निर्माण करण्याची मोकळीक आहे आणि लेखक-कवीना तर आकाश ठेंगणं आहे. काय लिहू, काय नको असं झालं असल्यास एखादं महानाट्य, महाकाव्य वा महाकादंबरी लिहून ‘नोबेल’ पारितोषिकासाठी प्रयत्न का करू नयेत÷? असो.

स्वप्नरंजन तर सहजसाध्य आहे. आपण निदान चांगलं स्वप्न पाहूया. जग कोरोनापासून मुक्त झालंय असं ते स्वप्न असू दे. त्यासाठी सरकार कोणाचेही असो, त्यांनी फर्मावलेली शिक्षा (?) भोगूया. एखादा संशोधक कोरोनाविरोधी लस वा औषध शोधून काढतोय एवढं एक स्वप्न तरी प्रत्यक्षात उतरो यासाठी सर्वधर्मीय जगत्नियंत्यांची प्रार्थना करूया.