तेषां अहं समुद्धर्ता

0
222

– प्रा. रमेश सप्रे
संदर्भ (कॉंटेक्स्ट) अन् संहिता (टेक्स्ट) असे दोन शब्द अभ्यासाच्या दृष्टीनं महत्त्वाचे असतात. आपण सर्वजण कोणत्याही अभ्यासासाठी पाठ्यपुस्तक, संहिता (टेक्स्ट) वाचतोच. पण केवळ पुस्तकाचं शब्दकोशाच्या साह्यानं वाचन हे बर्‍याच वेळा प्रत्यक्ष जीवनापेक्षा निराळं असतं. आचार्य विनोबांचं एक मार्मिक वाक्य आहे. ‘गो म्हणजे गाय’ नि ‘अश्‍व म्हणजे घोडा’ हे झाले पुस्तकातले शब्दार्थ. पण जीवनाच्या संदर्भात ‘गो’चा अर्थ गोशाळेत (गोठ्यात) किंवा ‘अश्‍व’चा अर्थ अश्‍वशाळेत (तबेल्यात) बांधलेला असतो. पाठ्यपुस्तकातील कवितांचा संदर्भ धड्यात (लेसन्स) असतो. पण प्रत्यक्षात तो जीवनात असतो. उदा. ‘अजुनि रुसूनि आहे| खुलता कळी खुलेना|’ या ओळीचा संदर्भ ‘कवितेच्या आरंभी आलेली ओळ’ असा देऊनही पुरतो पण प्रत्यक्षात आपल्या पत्नीच्या मृत्यूप्रसंगी उत्स्फूर्तपणे हे शब्द (उद्गार) कवीच्या मुखातून निघालेले असतात. हा जीवनातला संदर्भ अधिक महत्त्वाचा असतो. गीतेतील भगवंताच्या उपदेशाला (ऍडव्हाइस) गीतेतील अध्यात्म-पंक्ती यांचा संदर्भ आहे. पण गीतेतील समुपदेशनाला जीवनप्रसंगांचा व अनुभवांचा संदर्भ आहे. उदाहरणार्थ – गीतेतील विश्‍वरूपदर्शन. याचा एक उद्देश अर्जुनाला आपणच (भगवान श्रीकृष्ण) सर्वशक्तिमान व सर्वव्यापी असून कुरुक्षेत्रावर असलेल्या अनेक अतिरथी-महारथींचा संहार आपणच कसे करणार आहोत हे अर्जुनाला दाखवून त्याला युद्धप्रवृत्त करणं आणि दुसरा उद्देश ‘निमित्तमात्रं भव सव्यसाचिन्’ हे त्याच्या मनावर बिंबवणं. अर्जुनानं अधिक चिंता वा विचार न करता भगवंताच्या सांगण्यानुसार युद्ध करावं हे पटवून देताना भगवंत स्पष्टच सांगतात-
‘मत्कर्मकृत् मत्परमो मद्भक्तः संगवर्जितः |
निर्वैरः सर्वभूतेषु यः स मामेति पांडव॥
अर्थ स्पष्ट आहे. हे अर्जुना, जो केवळ माझ्यासाठी सर्व कर्मं करतो (मत् कर्मकृत्), जो मला (अनन्यभावानं) शरण (मत्परमो) येतो, जो सदैव मला जोडलेला (मद्भक्तः) असतो; जो संसारातील कशातही गुंतून रहात नाही (संगवर्जितः) आणि सर्व प्राणिमात्रांविषयी मैत्रीचा भाव ठेवणारा असतो (निर्वैरः सर्वभूतेषु) असा असतो तो मलाच येऊन मिळतो म्हणजे मुक्त होतो.
यावर अर्जुनाचा प्रश्‍न महत्त्वाचा आहे. जे भक्त सतत तुझ्या सगुण रूपाची सदा सर्वत्र सर्व प्रकारे तुझी पूजा करतात आणि जे अक्षर, अव्यक्त (निर्गुण निराकाराची) अशा परमेश्‍वराची पूजा करतात अशा दोन्ही प्रकारच्या भक्तांमध्ये तुझ्यामते अधिक श्रेष्ठ कोण? असा प्रश्‍न यापूर्वीही अर्जुनानं विचारलाय. तसा हा प्रश्‍न आध्यात्मिक उपासनेच्या संदर्भातच आहे. पण भगवंतानं दिलेल्या सविस्तर उत्तरात जीवनाविषयीचं महत्त्वाचं समुपदेशन दडलंय.
‘जे सतत माझ्याशी जोडलेले (नित्ययुक्त) असतात आणि अतिश्रेष्ठ श्रद्धेनं युक्त होऊन (परया श्रद्धया उपेताः) मला सगुणरूपात भजतात ते माझ्या मते सर्वश्रेष्ठ भक्त (किंवा योगी) आहेत.’ असं भगवंत प्रथम सांगतात. नंतर अशा भक्तांची लक्षणं सांगतात ती आपल्या सर्वांना मार्गदर्शक ठरू शकतात.
१. सततयुक्ता – हा भगवंताचा आवडता शब्द आहे. आपण जीवनात ज्या गोष्टीचा ध्यास घेऊ तिच्या प्राप्तीसाठी अखंड अभ्यास केला पाहिजे. जीवनाच्या सर्व क्षेत्रात अलौकिक कार्य करणार्‍या व्यक्तींच्या बाबतीत हे स्पष्ट दिसून येतं. तेलाची धार जशी पाण्याच्या किंवा दुधाच्या धारेपेक्षा अखंड पडते. नंदादीप जसा निरंतर तेवत राहतो, तशी ही महान कार्य करणारी मंडळी आपल्या ध्येयाशी सतत जोडलेली, अनुसंधान साधणारी असतात. आपण सर्वांनी यापासून प्रेरणा घेतली पाहिजे.
२. भक्ताः त्वाम् – ‘भक्त म्हणिजे विभक्त नव्हे| विभक्त म्हणिजे भक्त नव्हे॥ या समर्थ रामदासांच्या वचनाला वरवर अर्थहीन म्हणता येईल. पण गंमत अशी की विभक्त म्हणजे काय याची सर्वांना कल्पना असते. विभक्त पतीपत्नी, विभक्त परिवार या शब्दप्रयोगात विभक्त म्हणजे एकमेकापासून तुटलेले, दुरावलेले असा अर्थ सहज समजतो. याच्या बरोबर उलटा अर्थ ‘भक्त’ शब्दाचा आहे. भक्त म्हणजे जोडलेला, अगदी निकट असलेला. एका अर्थी भक्त हा शब्द देव व भक्ती करणार्‍या व्यक्तीचे (भक्ताचे) अद्वैत सुचवतो. भक्तिभाव हा भक्त-भगवंत यांना जोडणारा सेतू असतो. ईश्‍वराला अखंड जोडलेलं राहणं यातच भक्तीचं रहस्य आहे. भगवंताला अखंड चिकटलेला असतो तोच खरा भक्त.
आपल्या कामाला जरी आपण चिकटून राहिलो, प्रामाणिक राहिलो तरी ‘स्वकर्मकुसुमांची पूजा’ केल्याचा आनंद आपल्याला मिळणार आहे. कर्मयोगी बनण्याचं तत्त्व यातच सामावलेलं आहे.
‘स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धिं लभते नरः|’ हा गीतेतला विश्‍वसिद्धांत आहे. कोणत्याही कार्यात सिद्धी म्हणजे यश व कल्याण साधायचं असेल तर आपल्या कामातून परमेश्‍वराची पूजा बांधणं, भक्ती करणं हेच भगवंतांनी सांगितलेलं सूत्र आहे.
३. मयि आवेश्य मनः – सतत मन भगवंताच्यात ठेवायचं. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण सर्वकाळी, सर्वस्थळी, सर्व वस्तू-व्यक्ती-प्राणी इ. यांच्यात, सर्व कृतीत नि सर्व घटना प्रसंगात भगवंताचं स्मरण ठेव. यासाठी त्याचं स्मरण सतत ठेवण्यासाठी आवश्यक ती दृष्टी हवी, कृती हवी नि वृत्तीही हवी. सर्वांबद्दल कृतज्ञतेची वृत्ती (ऍटिट्यूड ऑफ फॉर ऑल) आपल्यात विकसित व्हायला हवी. अतिशय नम्रतेनं, सहकार्यानं व सेवाभावी वृत्तीनं वागता आलं पाहिजे. यामुळे आपलं प्रापंचिक जीवन नि संपूर्ण समाज-जीवन किती समाधानी, आनंदी होईल! यालाच रामराज्य म्हणता येईल. यासाठी आध्यात्मिक मार्ग आहे अखंड नामस्मरण तर आपल्या दैनंदिन जीवनासाठी भगवंताचं समुपदेशन आहे. सदैव कृतज्ञ स्मरण. संपर्कात येणार्‍या सर्व व्यक्तींच्या आपल्या जीवनातील योगदानाबद्दल ईश्‍वरभावनेनं समर्पण हाही मार्ग चांगला आहे. हवा मला जीवन देते तर हवेला शुद्ध ठेवणं, प्रदूषित न करणं हे त्या हवेतल्या परमेश्‍वरात राहण्यासारखं आहे. पाणी, जमीन, आकाश सार्‍यांबद्दल हाच विचार व आचार हवा. मग सदैव परमेश्‍वरात वास केल्याचं समाधान मिळेल.
४. श्रद्धया उपेताः नित्ययुक्ता उपासते – श्रद्धेवर आपल्या संस्कृतीचा, म्हणूनच गीतेचा फार भर आहे. श्रद्धा आतून आलेला विश्‍वास आहे. त्यात भक्तीचा अंशही असतो. फक्त ही श्रद्धा आंधळी, विचार न करता व्यक्त होणारी नसावी. श्रद्धावान व्यक्ती पूजाअर्चा यांच्यातच मग्न होणारी नसावी तर समाजऋण फेडण्याचा प्रयत्न करत राहणारी असावी. आपली कर्तव्य प्रेमानं पार पाडणारी असावी. यातूनच ‘नित्ययुक्ता उपासते’ ही परिस्थिती साकारणार आहे. जो नित्य परमेश्‍वर आहे, जो सर्वांच्या तना-मना-जीवनात ओतप्रोत भरून राहिलेला आहे त्याची सेवा हीच खरी भक्ती. गीता गिरिकंदरात म्हणजे पर्वतात, गुहेत, नदीकाठी जाऊन एकांतसेवन करत ध्यानधारणा करण्याला फार महत्त्व देत नाही. म्हणूनच तो कृतार्थ जीवनाचा मंत्र देणारा ग्रंथ आहे. परमेश्‍वराच्या जवळ राहणं म्हणजे जर खरी उपासना असेल तर मानवतेची सेवा करणारी, आपल्या कार्यक्षेत्रात प्रामाणिक प्रयत्न करणारी मंडळीच खरी ‘उपासक’ आहेत. कारण मानवजातीच्या अंतःकरणात परमेश्‍वराचा निवास असतो. गोरगरीबांची, रंजल्यागांजलेल्यांची, दीनदलितांची जो निरपेक्ष भावानं सेवा करतो त्यालाच परमेश्‍वराचा सच्चा भक्त म्हणवून घेण्याचा अधिकार आहे.
५. इंद्रियग्रामं संनियम्य – ग्राम म्हणजे समुदाय (लोकांचा समूह म्हणजे गाव). कोणत्याही गोष्टींच्या, वस्तूंच्या मुदायाला ग्राम म्हटलं जातं. इंद्रियांच्या समूहावर म्हणजेच सर्वेंद्रियांवर नियंत्रण करणं हे आतल्या तृप्तीसाठी, शांतीसाठी आवश्यक असते. गीतेत याबद्दलचं मार्गदर्शन वारंवार येतं इतका भगवंताला हा विषय महत्त्वाचा वाटतो. खरं तर आजच्या काळात सर्वांत अवघड गोष्ट जर कोणती असेल तर ती म्हणजे इंद्रियांना आवरणं, नियंत्रणात राखणं. चंगळवाद, भोगवाद, इहवाद (जे काही भोगायचं-उपभोगायचं ते इथंच) उपयुक्ततावाद म्हणजे उपयोग असेल तोपर्यंतच ती वस्तू वा व्यक्ती सांभाळायची. नंतर फेकून द्यायची. महिलाश्रम, अर्भकालय, अनाथाश्रम, वृद्धाश्रम हे काही आपल्या जीवनाच्या आश्रम पद्धतीचे (ब्रह्मचर्याश्रम-गृहस्थाश्रम-वानप्रस्थाश्रम-सन्यासाश्रम) भाग नाहीत. उलट निरोगी समाजपद्धतीचा अभाव हे या उपभोगवाद व उपयुक्ततावादाचा प्रभाव असलेल्या जीवनप्रणालीचं लक्षण आहे. द्या फेकून (थ्रो अवे) संस्कृतीचा परिणाम आहे हा. ‘वापरा व फेका’ (यूज अँड थ्रो) या वृत्तीचं प्रतीक आहे अशी जीवनपद्धती..
* डोळे, कान यावर जाणीवपूर्वक संयम हवा. हे ध्यानातून, नामस्मरणातून साधते.
* जिभेवर नियंत्रण तर सर्वांत महत्त्वाचं. बोलणं व खाणं या दुहेरी कार्यामुळे जीभ हे महत्त्वाचं इंद्रिय बनलंय. उपवास, पोषणमूल्यानुसार आहार, अतिमसालेदार, तळलेले, तिखट पदार्थ टाळणे यामुळे जिभेच्या ‘रसना’ या पैलूवर नियंत्रण शक्य. पण बोलणं कमी होण्यासाठी मौन हाच प्रभावी उपाय जोडीला एकांतसेवन. तोंडातून आपण कमावलेली शक्ती वाया जाते. म्हणून तोंडाचं विवर(छिद्र) बुजवलं तर रात्रीही अभ्यास करण्याइतपत ताजंतवानं राहता येतं.
तसेच इतर इंद्रियांच्या बाबतीतही चित्रपट – नाटकं पाहणं हे उच्च अभिरुचीला धरून असावं. उगीच अनावश्यक हालचालींवर (हातापायांच्या) नियंत्रण हवेच. नाहीतर जीवनाचा रथ वाहणारे घोडे उधळतील, नि चांगल्या मार्गावरून भ्रष्ट होतील. सर्व इंद्रियांवर नियंत्रण हा महत्त्वाचा मुद्दा आहे.
६. सर्वभूतहितेरताः – हे तर भगवंताचं प्राणप्रिय सत्य आहे. नव्हे ते त्याच्या संपूर्ण जीवनाचं सूत्र आहे. गाईवासरांना चारणं, मोराचं पीस डोक्यावर मुकुटासारखं घालणं, साध्या वेळूची वेणू (बासरी) बनवणं, साधं दूध – दुधाचे पदार्थ – पोहे असा आहार दिव्य बनवून सर्वांबरोबर करणं हे करण्यात कृष्ण सर्वभूतमात्रांचं कल्याण पाहत होता. इतकंच नव्हे तर जास्तीत जास्त हित पाहिलं जातं तेच सत्य असतं – असा ठाम सिद्धांत त्यानं मांडला. आजच्या ‘पर्यावरण रक्षणाच्या’ जमान्यात व निसर्गस्नेही जीवनशैलीच्या काळात सर्व भूतांचं (म्हणजे निर्माण झालेल्या अणुरेणुेपासून ते महाविष्णूपर्यंत,- सर्वत्र व्यापून राहिलेल्या ईश्‍वरी तत्त्वापर्यंत) सर्वांचं रक्षण करणं हे मानवजातीचं कर्तव्य आहे. हा विचार कृष्णानं दिलाय व एका शब्दात त्याचा उल्लेख करायचा असेल तर ‘सर्वभूतहितेरताः’ हा अप्रतिम शब्दप्रयोग गीतेत केलाय. सर्व भूतांचं कल्याण साधणारं ते सत्य अशीही गीतेची विचारसरणी आहे. यात कर्तव्यभावना, कर्तव्यपालन, कर्मयोग या सार्‍यांचा समावेश होतो.
७. सर्वाणि कर्माणि मयि संन्यस्य – सर्व कर्मे भगवंताला अर्पण करूनच आपल्याला सदैव भगवंताचं होऊन राहता येणार आहे. यात एका बाजूनं कर्मयोग आहे तर दुसर्‍या बाजूनं भक्तियोग असे दोन्हीही येऊन जातात. भगवंताला सारी कर्मे अर्पण करायची. मुख्यतः कर्माची फळं अर्पण करायची. आपली नैवेद्य भावना हेच सांगते. अन् हे करताना ‘त्वदीय वस्तू गोविंदम्’ या भावनेनं त्याला समर्पण करायची असते. कोणत्याही कर्माचा अपवाद नाही. सारं करताना आपण कोणावर उपकार करत आहोत ही भावना नसावीच तर ‘श्रीकृष्णार्पणमस्तु’ हा भाव असावा. सारं काही त्याचंच आहे ते त्याला देण्यात मोठेपणा नाही. पण हे सार्‍या इंद्रियांना शांत केल्याशिवाय शक्य नाही. म्हणून भगवंताला सारं अर्पण करायला शिकू या.
अन् हे सारं करतो त्यांचा उद्धार भगवंत स्वतः करतात व त्यांना त्यांच्या इच्छित स्थळी म्हणजेच मुक्तिधामी घेऊन जातो. सहाव्या अध्यायात भगवंत सांगतात ज्याचा त्याचा उद्धार ज्याचा त्यानंच करायचा (उद्धरेत् आत्मन् आत्मानम्‌|). कारण तेथे अष्टांगयोग म्हणजे ध्यानयोगाचा विषय होता. यम-नियम-आसन इथपासून ते धारणा ध्यान समाधीपर्यंत सर्वांना आपलं आपणच साधायचं असतं. पण भक्तीची गोष्टच वेगळी असते. अत्यंत लाडका भक्त हा भगवंताचा जीव की प्राण असतो. पण वरील सर्व गोष्टी जो करतो तोच खरा भक्त असतो. अशी भक्तांची मांदियाळी हेच खरं परमेश्‍वराचं वैभव (ऐश्‍वर्य) आहे.
भगवंत स्पष्ट सांगताहेत की – तेषाम् (अशा भक्तांना) अहं समुद्धर्ता- मी स्वतः उद्धरून नेतो.
गीताप्रेसच्या मुखपृष्ठावर नावेतून आलेला भगवंत नि गटांगळ्या खात बुडणारे भक्त असं चित्र असतं. जे सोनंनाणं, शारीरिक प्रेम, कोणत्याही गोष्टीला आधार मानणारे लोक असतात त्यांना भगवंत नावेत घेत नाही. पण सारं सोडून फक्त भगवंतच आधार, असं जे मानतात त्यांना (तेषां) भगवंत नावेत घेऊन पैलतीरावर पोचवल्याशिवाय राहात नाही. आपण भगवंताच्या नावेत बसून स्वतःचा उद्धार करून घेऊ या. जिवंतपणीच मुक्त होऊ या.