तेलाचे चटके

0
224

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर भडकल्याने त्याचे चटके जवळजवळ ऐंशी टक्के इंधन आयात करणार्‍या भारतासारख्या देशाला बसणे स्वाभाविक आहे. मात्र, सध्याची काही तेलउत्पादक देशांमधील परिस्थिती लक्षात घेता, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाचे दर उतरण्याची शक्यता सध्या तरी दृष्टिपथात नाही. त्यामुळे भारतीय जनतेच्या दृष्टीने अत्यावश्यक बनलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींतील या सततच्या भाववाढीपासून तिला दिलासा देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारांनी आपापले शुल्क शक्य असेल तेवढे खाली आणण्याचा विचार करणे आवश्यक आहे. तेल कंपन्या वाढता तोटा सोसायला तयार नाहीत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जेवढे दर कडाडत जातील, तेवढी दरवाढ करून आपला तोटा सरळ ग्राहकांच्या खिशातून वसूल करण्याचे पाऊल उचलत राहतील. अशावेळी ‘अच्छे दिन’ चा वायदा करीत आलेल्या केंद्र सरकारने केवळ बघ्याची भूमिका घेऊन राहणे योग्य ठरणार नाही. कर्नाटकच्या निवडणुका तोंडावर येताच तब्बल एकोणीस दिवस तेल कंपन्यांना इंधन दरवाढीपासून रोखून धरणारे केंद्रातील भाजप सरकार निवडणुका आटोपताच आणि आपला स्वार्थ साधला जाताच जनतेला वार्‍यावर सोडून देते हे योग्य नव्हे. तेलाच्या किंमतींमधील चढउतार आपण एक आयातप्रधान देश असल्याने आपल्या हाती नसते हे जरी मान्य केले, तरी जेव्हा कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्या होत्या, तेव्हा केंद्र आणि राज्य सरकारांनी त्यावरील आपले शुल्क वाढवून वाढीव महसूल प्राप्त केला होताच ना? केंद्र सरकारने वेळोवेळी पेट्रोलियम पदार्थांवरील अबकारी कर वाढवत नेला. राज्य सरकारांनी मूल्यवर्धित करांमध्ये वृद्धी केली. अगदी गोव्यानेही आपला इंधनाचे दर साठ रुपयांच्या खाली ठेवण्याचे वचन मोडत मूल्यवर्धित करात आधी केलेली कपात काही प्रमाणात मागे घेऊन ग्राहकांना चटका दिलाच आहे. आज तेलाच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दरवाढीचे ढग कायम आहेत. आपल्या भारतामध्ये जवळजवळ ऐंशी टक्के पेट्रोलियम पदार्थांची आयात होत असते. भारत हा जगातील तिसर्‍या क्रमांकाचा तेल आयातदार देश आहे. त्यातही इराक, सौदी अरेबिया आणि इराण यांच्याकडून भारत सर्वाधिक तेल आयात करीत असतो. इराणशी ओबामा सरकारने केलेला अणूकरार रद्दबातल ठरवून अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्या देशावर निर्बंध लागू करू पाहात आहेत. तसे झाल्यास इराणकडून होणार्‍या तेल पुरवठ्यावर विपरीत परिणाम होणे अटळ असेल. इराक अंतर्गत समस्यांनी ग्रस्त आहे. त्यामुळे भारताच्या ऊर्जा मंत्र्यांनी देशाचा दुसरा मोठा तेल पुरवठादार देश असलेल्या सौदी अरेबियाच्या ऊर्जामंत्र्यांशी नुकतीच चर्चा करून तेलाचे दर आटोक्यात ठेवण्याची व पुरवठ्यावर परिणाम होऊ न देण्याची विनंती केलेली आहे. त्यांनी भले तसे आश्वासन दिलेले असले तरी खरोखरच ती विनंती मान्य केली जाईल का हा प्रश्न आहे. चौदा तेल निर्यातदार देशांच्या ‘ओपेक’ संघटनेच्या सदस्य राष्ट्रांनी मध्यंतरी घसरत गेलेले तेलाचे दर पुन्हा वाढावेत यासाठी आपल्या तेल उत्पादनात घट चालवली आहे. त्यामुळे दर वाढू लागले आहेत आणि ते वाढतच जातील अशीच शक्यता तमाम बाजारपेठ निरीक्षकांनी व्यक्त केलेली आहे. त्यात ‘ओपेक’ देशांमधील ताणतणाव परिस्थितीत अधिक तेल ओतत आहेत. इराक, लिबिया, सिरिया, येमेनमधील सततचा तणाव, सौदी अरेबिया आणि इराणमधील संघर्ष या सगळ्याचा परिणाम तेल पुरवठ्यावर होत आहे. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेतील प्रमुख तेल उत्पादक देश असलेल्या व्हेनेझुएलामधील तेल उत्पादनातही मोठ्या प्रमाणात कपात झाली आहे. या सगळ्या परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाचे दर वाढत जातील अशी भाकिते मॉर्गन स्टेन्लेपासून मेरील लिंच आणि पिएरी एंडुरांडपर्यंतच्या निरीक्षकांनी वर्तवलेली आहेत. कच्चे तेल सध्या ऐंशी डॉलर प्रति बॅरल आहे. कोणी म्हणते ते शंभर डॉलरवर जाईल, कोणी म्हणते ते तीनशे डॉलरपर्यंत चढेल. जी काही दरवाढ असेल ती भारताला मोठा फटका देणारी ठरेल हे मात्र नक्की आहे. दुसरीकडे डॉलरच्या तुलनेत रुपया घसरत चालला आहे. तेलाच्या किंमती कडाडतात तेव्हा त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेच्या सर्व क्षेत्रांवर होत असतो. तेलाची आयात महागल्याने चालू खात्यातील तूट वाढेल, विविध क्षेेत्रांचा वाहतूक खर्च वाढल्याने किंमती वाढतील. जेव्हा तेलाचे दर नुसत्या दहा डॉलरने वाढतात तेव्हा राष्ट्रीय उत्पन्नात ०.२ टक्के ते ०.३ टक्के घत होत असते असे अनुमान आहे. त्याचा विचार करता देशाच्या एकूण आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने हे मारक ठरेल. या परिस्थितीत किमान सामान्य माणसाला या दरवाढीची झळ लागू नये हे पाहणे सरकारचे कर्तव्य आहे. तेलाचे दर खाली आले होते, तेव्हा केंद्र सरकारने तब्बल नऊ वेळा अबकारी कर वाढवून आपली तिजोरी भरून घेतली होती. मग आता तेलाचे दर वाढल्यावर आम जनतेच्या खिशाला थोडा दिलासा द्यायला नको का? केंद्र सरकारने इंधनावरील अबकारी करात आणि राज्य सरकारने मूल्यवर्धित करात थोडीफार सूट देऊन जनतेला दिलासा द्यावा.