तेरना

0
429

– सौ. पौर्णिमा केरकर

या गावाला अशी ही अध्यात्माची, प्रगल्भ वैचारिकतेची पार्श्‍वभूमी लाभलेली असतानाही एकविसाव्या शतकात त्याची होत असलेली अक्षम्य हेळसांड हृदयाला तीव्र ओरखडे काढते. हा प्रदेशच असा प्राचीन संस्कृतीने भरलेला, इतिहासाच्या प्रगल्भ खुणा मिरविणारा. पण या श्रीमंतीची जाणीव इथल्या लोकमनाला आहे की नाही ते कळत नाही.

सगळी गावे माणसांनीच गजबजलेली असावीत हा अट्टहास कशासाठी? काही गावे अशीही असतात हजारो वर्षांच्या इतिहास-संस्कृतीला स्वतःच्या कडे-खांद्यावर, ऊरी-पोटी मिरवत, अनेक स्थित्यंतरे पचवीत, बदलांना सामोरी जात प्रवास करणारी… हा प्रवास मुळी शतकांचा, युगायुगांचा असू शकेल हे निश्‍चितपणाने सांगता येणार नाही. खूप चकचकीत, झगझगीत वस्तूंचे- वास्तूंचे आकर्षणच आपल्या दृष्टीला अधिक असते. त्याच्यात एखादं गाव धुळीनं माखलेलं, गल्लीगल्लीत साठलेली अस्वच्छता, जुनाट दगडांचे ढीगच्या ढीग जसेच्या तसे पडून राहिलेले… एखादे वेळेस धरणीकंप व्हावा आणि खूप वास्तूंची पडझड व्हावी… पडलेली ती वास्तू मग जशीच्या तशीच टाकून आपलं बस्तान दुसर्‍या ठिकाणी बसवावं. असं काहीतरी सभोवताली दिसत राहिलं की आपल्याला ते पाहावंसंच वाटत नाही. उस्मानाबाद जिल्ह्यातील ‘तेरना’ नदीच्या काठावर वसलेल्या ‘तेर’ या अशाच एका जुनाट गावात पाऊल ठेवताक्षणी माझ्याही मनात क्षणिक असेच विचार आल्याशिवाय राहिले नाहीत.

गाडी घेऊन प्रवासाला निघालो की वाटेत येणारी विविध गावे, तेथली संस्कृती, माणसांचे वेगळेपण हमखास समजून घ्यावे. कोण कोठले आपण, कधी त्या गावात परत मुद्दामहून पोहोचणार हे काही सांगता येणार नाही. अंबाजोगाईला कार्यक्रमाच्या निमित्ताने जायची संधी मिळाली होती. माझा नवरा- राजेंद्र- एवढ्या लांबच्या प्रवासात गाडी चालवणार असल्यामुळे वाटेत जेथे कोठे आम्हाला थांबावंसं वाटणार तेथे आम्ही थांबू शकत होतो. वाटेत आम्हाला ‘तेर’ गावाची पाटी दिसली. परतीच्या प्रवासात आम्ही गावाला भेट द्यायचे पक्के ठरवले. या गावाची प्राचीन संस्कृती आणि त्याला वेढून असलेल्या इतिहासाची त्याला माहिती होतीच. फक्त त्या गावात जाण्याचा योग जुळून आला नव्हता एवढेच. बाकी एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला की तिच्या मुळापर्यंत जाण्याचा त्याचा स्वभाव त्याला स्वस्थच बसू देत नाही. भलेही त्यासाठी कोणतेही अडथळे आले तरी चालतील.

परतीच्या प्रवासात परळीच्या वैजनाथाची भेट घेऊन, जोगाईची विरहव्याकुळता ऊरी घेऊनच आमची गाडी उस्मानाबादमधील ‘तेर’ गावाच्या दिशेने चालली होती. उभे-आडवे चौक, कधी नेव्हीगेशनवर सर्च मारीत तर कधी तिथल्या वाटसरूंना विचारत आम्ही एका सरळसोट रस्त्यापर्यंत पोचलो. एकाला या जागेवर पोहोचल्यानंतर विचारलं तर त्याने सांगितलं, ‘‘आता आणखी कोठेही डावं-उजवं वळायचं नाही. सरळ हा रस्ता तुम्हाला ‘तेर’ला घेऊन जाईल.’’ रस्ता तर सरळसोटच होता. जवळ जवळ अर्धा-पाऊण तास झाला तरी रस्ता वळण घेण्याचं नाव काढीत नव्हता. मनात शंका आली. आपली आणि गावाची चुकामूक तर झाली नाही ना? आणि लक्ष गेलं धरणावर. रस्त्याच्या दुतर्फा असलेले माळरान पावसाळी शेतीच्या खुणा मिरवीत होते. भर दुपारचा सूर्य अंगावर घेतच आम्ही गावात प्रवेश केला. हे आणि कसलं… गावासारखंच गाव!

आपल्याकडची गावं कशी नीटनेटकी… निसर्गसौंदर्याने विनटलेली. अजूनही मातीचे अंगण, मातीची तुळस घेऊन वावरणारी. मुबलक पाणी, शांत कुळागरं, डोंगररांगा, त्यामुळे ही गावं माणसांनी, जत्रा-उरूसांनी कायमच गजबजून गेलेली. ‘तेर’ गावात पोचल्यावर धुळीचा एक मोठा लोट वार्‍याबरोबर आमच्या नाकातोंडात शिरला. छोटी-मोठी दुकाने, मधोमध एक मोठे पेड. त्यावर मळकटलेल्या धोतर-कुर्त्यात, फेटा बांधून शांतपणे गप्पा करीत बसलेली बुजूर्गमंडळी. एस.टी.ची वाट पाहत, डोकीवरून पदर घेऊन उभ्या राहिलेल्या बायाबापड्या आमच्या वेगळ्या गाडीकडे, त्यातून उतरलेल्या माणसांकडे कुतूहलानेच पाहत होत्या. पुरातत्त्व खात्याने या गावात केलेले उत्खनन आम्हाला पाहायचे होते. त्याची चौकशी करताच त्यानी आम्हाला सरळ म्युझियमच दाखवले. ‘रामलिंगप्पा लामतुरे संग्रहालय’ या नावाने स्थापित असलेल्या या वास्तूत इतिहास-संस्कृतीचे दस्तऐवज कै. लामतुरे यांच्यामुळेच सुस्थितीत राहिल्याचे प्रथमदर्शनीच लक्षात आले. या माणसाचे कलासक्त हृदय, इतिहासाविषयी वाटणारा जिव्हाळा आणि आपल्या प्राचीन संस्कृतीविषयी, गावाबद्दल असलेले प्रेमच दिसून येते. इथे हस्तीदंती वस्तू, शंख, शाडूच्या विविध मूर्ती, स्त्री-पुरुष, जनावरे यांच्या मूर्ती, पदके, पुतळ्या, विविध अलंकार, आभूषणे, दगड-मातीचे साचे इ. इथल्या वैभवसंपन्न ऐतिहासिक, सांस्कृतिक संचिताचे वेगळेपण अधोरेखित करतात.

पुरातत्त्वीयदृष्ट्या तर ‘तेर’ हे गाव सातवाहनकालीन प्राचीन गावच मानले गेले आहे. आणि या सगळ्याच खुणा संपूर्ण गाव फिरल्यावर आपल्याला ठिकठिकाणी आढळतात. जुन्या शैलीच्या विटा आणि लाकडाचे बांधकाम असलेली शंकराची विविध मंदिरे हे या गावाचे वैशिष्ट्य म्हणता येईल. त्रिविक्रम, उत्तरेश्‍वर, नरसिंह, कालेश्‍वर, सिद्धेश्‍वर, अमरेश्‍वर मंदिरे, त्याचबरोबर जैन मंदिर ही पतितांना दिलासा देणारी. ‘लेरे’ हा गाव म्हणजे एक पुरातन ‘शिवपीठ’ असावे असेच वाटायला लावणारा. कनकेश्‍वर-कनकाई, पद्मेश्‍वर-पद्मावती, ढवळेश्‍वर, मल्लिकार्जुन, रक्तेश्‍वर, अमृतेश्‍वर अशा अनेक मंदिरांतून हा चंद्रमोळी शिव, उमापती अडलेल्या-नडलेल्यांना दिलासा देत उभा आहे.

आज या गावाची अवस्था अत्यंत दयनीय झालेली दिसते. अज्ञान, दारिद्य्र, अस्वच्छता, धूळ यांनी या गावाचा वैभवसंपन्न इतिहास, संस्कृती झाकोळली गेली आहे. संत गोरा कुंभार- सर्वसामान्यांचे गोराबा काका- याच गावातील कुंभारवाडीत जन्मलेले. त्यांची स्मृती म्हणजे या वाडीत असलेले त्यांचे घर. आज त्या घराला मात्र चकाचक केलेले दिसते. तेरना नदी या गावाची जीवनदायिनी. गावाला जगविणारी. पण आज तिचीच अवस्था अतिशय केविलवाणी झालेली दिसते. गाडी घेऊन संपूर्ण गावाला वळसा घातला. तो दिवस आठवड्याच्या बाजाराचा होता. एके ठिकाणी नदीचे सुकलेले पात्र… दुर्गंधीने भरलेले, तर दुसर्‍या बाजूला त्याच पात्रात बाजार भरलेला. धान्याच्या मोठमोठ्या राशी विक्रीसाठी. पण ही अन्नलक्ष्मी जिच्या कृपेने आपल्या दारात आली त्या नदीमातेची परिस्थितीच अगदी बिकट करून टाकलेली. गोरोबा काकांच्या घराचे मंदिर झाले, पण त्या मंदिराचे पावित्र्य मात्र राखले गेले नाही. इथे माणसे राहतात. गावची गजबज आजही जुनी वाटावी अशीच.

कुंभारवाडीतील पिंपळपेडावर दुपारच्या वेळेत इरकली साडीतील जुन्या-जाणत्या बायका डोकीवर पदर घेऊन पान-तंबाखू खात निवांत गप्पा करीत बसल्या होत्या. असं चित्र दुर्मीळच अलीकडं. पण हा सारा निवांतपणा ही ओळख गावाची निश्‍चितच नाही. तेरनेच्या काठावरील मातीच्या गोळ्यापासून गोरोबानी मडकी घडवली ती भक्ती- ज्ञानाची, प्रगल्भ चिंतनाची. माती तुडवता तुडवता प्रसंगी ऐहिकतेचाही विसर पडला. या गावाला अशी ही अध्यात्माची, प्रगल्भ वैचारिकतेची पार्श्‍वभूमी लाभलेली असतानाही एकविसाव्या शतकात त्याची होत असलेली अक्षम्य हेळसांड हृदयाला तीव्र ओरखडे काढते. तेरनेच्या काठावरच गोरोबांचे समाधीमंदिर बघितले. सोबतीला शंकराचे मंदिर. हा प्रदेशच असा प्राचीन संस्कृतीने भरलेला. इतिहासाच्या प्रगल्भ खुणा मिरविणारा. पण या श्रीमंतीची जाणीव इथल्या लोकमनाला आहे की नाही ते कळत नाही. किंबहुना ती नसावीच असा विचार पक्का होतो. इथली सारीच मंदिरे लहानशीच, पण खूप देखणी आहेत. गाभार्‍यात प्रवेश वाकूनच करावा लागतो. आत आत जावे लागते. परमेश्‍वराकडे जायचे तर लिनत्व हवेच ना, त्याशिवाय का त्याची प्राप्ती होणार?

तेरना नदीच्या काठावर गोरोबांचे समाधीमंदिर असलेल्या परिसरात बंदिस्त करून ठेवलेली पाण्यावर तरंगणारी ‘वीट’ गतकाळाची आठवण करून देते. संपूर्ण गावात फिरणे झाले. ठिकठिकाणी प्राचीन अवशेषांचा उद्ध्वस्त झालेला पसाराच जास्त दिसला. नेटकी, नितळ होती ती छोटेखानी सुबक मंदिरे. मोठा परिसर, पण उजाड झालेला. जणू काही धुळीची पुटंच या गतकालीन प्राचीन अवशेषांवर पसरली आहेत. एके काळी हा गाव खरंच हसरं, खेळकर, प्रसन्न चेहरा घेऊनच वावरत असावा याची प्रचिती जमिनीची सकसता, धनधान्याची समृद्धी पाहून येते. ज्या तेरनेच्या काठावर गोरोबांची समाधी आहे, तिथूनच नदीच्या त्या विशाल पात्राकडे मी पाहिले.

उदासवाणाच वाटला तो प्रवाह मला… तिला म्हणावंसं वाटलं, बाई गं, खूप सोसलंस तू तुझ्या मैलोन्‌मैलांच्या प्रवासात…. कित्येक शतकांची तुझी वाटचाल इतिहास-संस्कृतीच्या असंख्य वाटा-वळणांना तुझ्या पदराखाली घेत तू संयमाने प्रवाहित होत राहिलीस. तूच धनधान्याचे मळे फुलवून तृषार्तांना पाणीही दिलेस. एवढा तुझा पारदर्शी प्रवाह, पण या युगायुगांच्या प्रवासात तुझं अंतःकरण मात्र कोणीही समजून घेऊ नये? अगदी क्षणिक भौतिक सुखाच्या शोधात चाचपडत असताना आपण कोणत्या शाश्‍वत गोष्टीना नष्ट करीत आहोत याचेही भान राहिलेले नाही. मुख्य प्रवाहापासून जरा अलिप्त असलेला हा गाव शिक्षण, आरोग्याविषयीची अनास्था बाळगूनच नव्या सहस्रकाची वाटचाल करीत आहे. नदीला माता संबोधायचे, पाण्याची पूजा करायची ही आपली संस्कृती. हेच तर देवत्व. हेच देवत्व निर्मळ अंतःकरणाने सांभाळलं जावं, हीच प्रार्थना!