तेजस्विनी, अनिश, बजरंगकडून सुवर्ण

0
183

२१व्या राष्ट्रकुल स्पर्धेत काल भारतासाठी नववा दिवस यशस्वी ठरला. काल भारताने तीन सुवर्ण, ४ रौप्य आणि ४ कांस्य पदके मिळून एकूण ११ पदके प्राप्त केली. त्यामुळे भारताने आपले पदकतक्त्यातील आपले तिसरे स्थान कायम राखले आहे. नेमबाजी, मुष्टियुद्ध, टेबल टेनिस आणि कुस्तीमध्ये काल भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी बजावली. भारताच्या खात्यात एकूण १७ सुवर्ण, ११ रौप्य व १४ कांस्य पदके मिळून एकूण ४२ पदके जमा झाली असून आज दहाव्या दिवशी त्यात आणखी पदकांची भर पडणार आहे.

तेजसिवनीची सुवर्ण कामगिरी
काल भारतीयांसाठी सुवर्णमयी दिवस ठरला. कारण भारताने ३ सुवर्ण पदकांची कमाई केली. ५० मी. रायफल थ्री पोजीशन प्रकारात विक्रमी गुणांची नोंद करत तेजस्विनी सावंतने भारताला नेमबाजीत कालच्या दिवसाचे पहिले पदक प्राप्त करून दिले. तेजस्विनीने ४५७.९ गुणांची कमाई केली. आठव्या दिवशी तेजस्विनीने ५० मी. रायफल प्रोन प्रकारात रौप्य पदक मिळविले होते. ५० मी. रायफल थ्री पोजीशन प्रकारातील पहिली दोन्ही पदके भारतालाच गेली. तेजस्विनीबरोबरच अंजुम मुद्गिलने ४५५.७ गुणांसह रौप्य पदक प्राप्त केले.

रॅपिड फायरमध्ये मोडले विक्रम
१५ वर्षीय अनिशचा ‘सुवर्णलक्ष्य’
दरम्यान, १५ वर्षीय दहावीत शिकणारा शाळकरी मुलगा अनिश भानवालाने कमाल करताना नेमबाजीतील २५ मीटर रॅपिड फायरमध्ये काल अनेक विक्रम मोडित काढताना काल भारताला दुसरे सुवर्ण पदक मिळवून देत सर्वांना आश्‍चर्याचा धक्का दिला.

बेलमोंट शूटिंग रेंजवर पुरुषांच्या २५ मीटर रॅपिड फायर पिस्तॉल स्पर्धेत अनिशने त्याच्यापेक्षा वयाने आणि अनुभवाने सरस असलेल्या नेमबाजांना मागे टाकत विक्रमांसह सुवर्णवेध घेतला. तो भराताकडून सर्वांत कमी वायत सुवर्ण पदक मिळविणारा खेळाडू ठरला आहे.

अंतिम फेरीत ‘परफेक्ट १०’ने सुरुवात केलेल्या अनिशने आपली लय कायम राखत ४० पैकी ३० गुणांची कमाई करीत भराताच्या खात्यात हे १६वे सुवर्ण पदक जमा केले. त्याला स्थानिक ऑस्ट्रेलियन नेमबाज सर्जेइ इवग्लेवस्कीकडून कडवे आव्हान मिळाले होते. सुवर्ण आणि रौप्य पदकासाठी लढताना एकवेळ अनिश २५ तर सर्जेई २४ गुणांवर होते. परंतु त्याने अखेर ३०-२८ अशी बाजी मारली. अनिशने १६ वर्षीय नेमबाज मनू भाकेर हीचा विक्रमही मोडीत काढला. जीतू राय, मनू भाकेर, हिना सिद्धु, तेजस्विनी सावंत, श्रेयसी सिंहपाठोपाठ अनिश या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारा सहावा नेमबाज ठरला आहे.

बजरंगची कमाल
दरम्यान, कुस्तीत सुशिल कुमारनंतर युवा बजरंग पूनियाने दुसरे सुवर्ण पदक प्राप्त केले. भारताचे हे एकूण १७वे सुवर्ण पदक ठरले. बजरंगने पुरुषांच्या ६५ किलो वजनी गटाच्या अंतिम लढतीत ऑलिम्पिक कांस्य पदक विजेत्या वेल्सच्या केन चारिगला १०-१ असे चितपट केले. हे त्याचे राष्ट्रकुल स्पर्धेतील पहिलेच सुवर्ण पदक होय. २०१४मध्ये बजरंगने ६१ किलो वजनी गटात रौप्य पदक प्राप्त केले होते. त्याचा रंग आता त्याने गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत बदलत सुवर्ण केला. बजरंगने उपांत्य फेरीत कॅनडाच्या विंसेट डी मारिनिसला १०-० असे लोळवत अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला होता. त्यापूर्वी उपांत्यपूर्व फेरीत त्याने नायजेरियाच्या अमस डेनियलवर १०-० अशी एकतर्फी मात केली होती. तर उपउपांत्यपूर्व फेरीत न्यूझीलंडच्या ब्राह्म रिचर्ड्‌सला पराभूत केले होते.

मौसम खत्री, पूजा ढांडाला रौप्य
दरम्यान, पुरुषांच्या फ्री स्टाईल ९७ किलो वजनी गटात भारताच्या मौसम खत्रीला दक्षिण आफ्रिकेच्या मार्टिन एरसमसकडून २-१२ असा पराभव स्वीकारावा लागल्याने रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. महिला एकेरीत पूजा ढांडाला ५७ किलो वजनी गटात रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. नायजेरियाच्या ओडुनायो एडेकुओरोए हिने पूजावर ७-५ अशी मात केली. तत्पूर्वी उपांत्य फेरीत पूजाने कॅमरूनच्या जोसेफ एसोंबेला ११-५ असे चित केले होते. अन्य एक भारतीय महिला कुस्तीपटू दिव्या करणला उपांत्य फेरीत नायजेरियाच्या ओबोरुडुडू ब्लेसिंकडून ११-१ असा एक़तर्फी पराभव स्वीकारावा लागल्याने ६८ किलो वजनी गटात कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.