तेजपाल खटल्याची इन-कॅमेरा सुनावणी

0
185

बलात्कार प्रकरणातील आरोपी व तेहलकाचा माजी संपादक तरुण तेजपालविरुद्धच्या खटल्याची इन-कॅमेरा सुनावणी करण्यास काल म्हापसा अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाने मान्यता दिली. त्यामुळे या खटल्याची सुनावणी पूर्ण होईपर्यंत वृत्तांकन करण्यास कायद्याने बंदी असेल. या खटल्याची पुढील सुनावणी आज सकाळी १०.३० वा. पुन्हा सुरू होईल.
महिला सहकारी पत्रकारावरील बलात्काराच्या आरोपामुळे अडचणीत आलेल्या तरुण तेजपालला काल म्हापशातील न्यायालयात हजर करण्यात आले. खटल्याची सुनावणी इन-कॅमेरा करण्याची तेजपालचे वकील प्रमोदकुमार दुबे यांची मागणी न्या. विजया पळ यांनी मान्य केली. त्यामुळे भारतीय दंड संहिता कलम ३२७ (३) अंतर्गत प्रसार माध्यमांना वृत्तांकन करता आले नाही. दुपारी २.३० वाजता सुरू झालेली सुनावणी संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत चालू होती. सुनावणीनंतर बाहेर थांबलेल्या पत्रकारांना सुगावा न लागता तेजपाल दुसर्‍या दरवाजातून निघून गेले. त्यांच्या समवेत कुटुंबातील सदस्य होते.
नोव्हेंबर २०१३ मध्ये बांबोळीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आपल्या महिला सहकारी पत्रकारावर बलात्कार केल्याचा आरोप तेजपालावर आहे. पोलिसांनी त्याच्याविरोधात ६८४ पानी आरोपपत्र दाखल केले होते. बलात्कार, लैंगिक शोषण, आपल्या कनिष्ठ सहकारी महिलेचा विनयभंग असे विविध आरोप त्याच्यावर ठेवण्यात आले आहेत.