तेजपालविरोधात २८ रोजी आरोप निश्‍चित

0
215

महिला सहकार्‍याचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेले ‘तहलका’ मासिकाचे तत्कालीन संपादक तरूण तेजपाल विरोधात २८ सप्टेंबर रोजी आरोप निश्‍चित करण्याचा आदेश म्हापसा येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयाने काल दिला. म्हापसा न्यायालयात या प्रकरणी इन कॅमेरा सुनावणी सुरू असून आरोप निश्‍चित झाल्यावर तेजपालविरोधात खटला चालणार आहे.
आपणावर ठेवण्यात आलेले आरोप मागे घेण्यात यावेत अशी मागणी करणारा तेजपाल यांचा अर्ज जिल्हा आणि सत्र न्यायाधीश विजया पळ यांनी फेटाळला. तेजपाल याच्यावर आरोप निश्‍चित करण्यात यावेत असा आदेश जिल्हा व सत्र न्यायालयाने दिला आहे असे सरकारी वकील फ्रान्सिस्को नाव्होरा यांनी सांगितले. तेजपाल याच्यावरील आरोप मागे घेण्यात आलेले नाहीत असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. उलट त्याच्यावर आणखी जास्त आरोप ठेवण्यात आले असल्याचे ते म्हणाले. तेजपालविरोधात ६८४ पानी आरोपपत्र दाखल केले होते. भारतीय दंड विधान संहितेतील कलम ३५४, ३५४ अ (विनयभंग), कलम ३४१, ३४२, कलम ३७६ (बलात्कार), ३७६ (२) एफ आणि ३७६ (२) के (आपल्या पदाचा गैरवापर करीत सहकारी महिलेवर बलात्कार करणे) याखाली आरोप ठेवण्यात आले होते.
नोव्हेंबर २०१३ मध्ये बांबोळी येथे थिंक फेस्तवेळी एका पंचतारांकित हॉटेलच्या लिफ्टमध्ये महिला सहकार्‍याचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप तरुण तेजपालवर झाला होता. नंतर याप्रकरणी त्याला अटक झाली होती.