तृणमूल कॉंग्रेसचे खासदार सुदिप बंडोपाध्यायांना अटक

0
73

>> ममता बॅनर्जींची मोदींवर टीका

 

रोज व्हॅल चिटफंड घोटाळ्याप्रकरणी तृणमूल कॉंग्रेसचे लोकसभा खासदार सुदिप बंडोपाध्याय यांना काल सीबीआयकडून अटक झाल्यामुळे संतप्त झालेल्या तृणमूल कॉंग्रेसच्या विद्यार्थी शाखेच्या कार्यकर्त्यांनी येथील भाजपा मुख्यालयावर हल्ला केला. यावेळी उभय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये धुमश्‍चक्री उडाली. याच प्रकरणात तृणमूल कॉंग्रेसचे आणखी एक खासदार तापस पाल हे पोलीस कोठडीत आहेत.
दरम्यान, पं. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बंडोपाध्याय यांना अटक केल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टीकेचे लक्ष्य केले आहे. मोदींविरोधात आवाज उठविणार्‍यांच्या मुस्कटदाबीसाठी केंद्र सरकार सीबीआय, ईडी, आयटी यांचा गैरवापर करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. पंतप्रधान कार्यालयाच्या दबावामुळे बंडोपाध्याय यांना अटक करण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
या अटकेनंतरही आपण गप्प बसणार नाही. आजपासून या दडपशाही विरोधात आंदोलनास बसणार असल्याचे ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले. सुदिप बंडोपाध्याय यांनी आरोप फेटाळताना केंद्र सरकारने आपल्याविरुध्द व तृृणमूल कॉंग्रेस विरुध्द कारस्थान रचले असल्याचा आरोप केला आहे.