तुळशीचे महात्म्य

0
1126
  •  माधुरी रं. शे. उसगावकर
    (फोंडा)

एका विशिष्ट सुगंधाने पानोपानी भरलेले, ंंमंजिर्‍यांनी नटलेले असे हे नाजूक रोपटे पवित्र, मंगल वाटते. ‘जेथे आहे तुळशीचे पान | तेथे वसे नारायण… अशी संत बहिणाबाईने तुलसी महात्म्याची थोरवी गायिली आहे.

हिंदू पंचांगातील कार्तिक महिना म्हणजे दीपोत्सवाची उधळणच. या महिन्यात पंचदिवसीय दीपोत्सवाची दीपावली, प्रबोधिनी एकादशी, तुळशी विवाह, वैकुंठ चतुर्दशी, त्रिपुरारी पौर्णिमा अशी दिव्यांच्या झगमगाटात साजर्‍या होणार्‍या उत्सवांची मांदियाळीच. बलिप्रतिपदेने म्हणजे दिवाळीतल्या पाडव्यापासून सुरू होणार्‍या या महिन्यातील जवळजवळ प्रत्येक दिवसाला कोणते ना कोणते धार्मिक महत्त्व लाभलेले आहे. या दिवसापासून नवीन संवत्सर सुरू होते. या महिन्यातील व्रतांची फळश्रुती ही दुर्लभ असते.

कार्तिक कौतुकाच्या बहुतेक कथा श्रीविष्णू यांच्याशी जोडलेल्या आहेत. आषाढ शुद्ध एकादशीला क्षीर सागरात झोपी गेलेले श्रीविष्णु कार्तिक शुद्ध एकादशीला जागे होतात. या दिवसापासून त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत तुलसी विवाह साजरा केला जातो.
देवदिवाळी सण साजरा झाल्यानंतर लगेच पंधरा दिवसात तुळशीविवाह विधी असतात. या महिन्यातील तुळशीविवाह हा प्रमुख सण मानला जातो.

प्रबोधिनी एकादशीपासून तुळशीविवाहास प्रारंभ होतो. पौराणिक कथेत सांगितले आहे की मूर नावाचा एक अक्राळ विक्राळ असूर भगवान विष्णुवर हल्ला करण्यासाठी पुढे सरसावला त्यावेळी शस्त्रधारी स्त्रीने त्या असुराचा नाश केला. विष्णुदेव प्रसन्न होऊन तिला वर मागण्यास सांगितले असता तिने जनहितकारी वर मागितला. ‘एकादशीचा उपवास करणार्‍यावर तुझी सदैव कृपादृष्टी असो’. भगवान विष्णुंनी ‘तथास्तु’ म्हटले. अशी कथा सांगितली आहे. या दिवशी उपवास धरण्याची अशी प्रथा पडली आहे. श्री विष्णू आषाढ शुद्ध एकादशीला शयन करतात व कार्तिक शुद्ध एकादशीला जागे होतात. म्हणून या एकादशीला प्रबोधिनी एकादशी असे संबोधले जाते.
तुलसी विवाहाच्या पहिल्या दिवशी ग्रामीण भागात तुळशीवृंदावन स्वच्छ शेणाने सारवून सुशोभित करतात. शहरी भागात विविध रंगांनी रंगवून सजवतात. विवाहाच्या दिवशी तुळस एखाद्या नववधुप्रमाणे सजविली जाते. वृंदावन ऊस व झेंडूच्या फुलांच्या रोपट्यांनी सुंदर सजवितात. तुलसी वृंदावनात चिंचा, आवळे ठेवतात. या दिवशी काही ठिकाणी लग्नातील देवकार्याच्या विधीप्रमाणे तुळशीवृंदावनाची पूजा करून तेल-हळद लावली जाते. दुपारी फराळाचा नैवेद्य अर्पण केला जातो. (आजच्या यंत्रयुगीन जीवनात काही धार्मिक विधींना फाटा दिला जातो हा विषय अलाहिदा)
दुसर्‍या दिवशी म्हणजे द्वादशीला तुलसीविवाह सोहळा साजरा करतात. हा सोहळा म्हणजे जणू लग्नकार्यच. तुळशीला जरतारी सुंदर साडी नेसवली जाते. विविधरंगी फुलांनी सालंकृत केली जाते. एकादशीच्या दिवशी चढवलेली तेल-हळद द्वादशीच्या दिवशी उतरवली जाते. यथासांग तुळशीची पूजा करून दुपारी पंचपक्वांनांचा महानैवेद्य दाखविला जातो.

तद्नंतर तिन्ही सांजेच्या वेळी (मुहूर्तावर) तुळशी लग्न लावले जाते. तुळशीवृंदावनात दीपोत्सव केला जातो. तुळशीपुढे बाळकृष्णाची मूर्ती स्थापित केली जाते. पणत्यांची आरास असते. वृंदावनात तसेच घरापुढे दिव्यांच्या झगमगाटात पावन दृश्य दिसते. यावर उंच रंगीबेरंगी आकाशदिवा खुलून दिसतो. तुळशीपुढे पारंपरिक समई प्रज्वलीत केली जाते. गुळपोहे, चुरमुरे, उसांचे तुकडे, फळे, नैवेद्यासाठी ठेवली जातात. याशिवाय हल्ली काही ठिकाणी लाडू, पेढे वगैरे फराळाचा नैवेद्यही असतो.
तिन्हीसांजेच्या वेळी तुलसीविवाह आपापल्या परीने थाटामाटात साजरा केला जातो. तुळस ही वधू असते आणि बाळकृष्ण हा वर आणि ऊस हा मामा मानला जातो. तुळशी ही वृषध्वज राजाची कन्या, तिचे नाव तुलसी. भगवान विष्णूस तुळस अत्यंत प्रिय आहे म्हणून तिला हरिप्रिया म्हणतात.

तुळशीची व बाळकृष्णाची षोडषोपचार पूजा करून लग्नविधी केले जातात. मंगलाष्टके गायली जातात. अक्षता अर्पण केल्या जातात. जोडवी प्रज्वलीत करून सुवासिनी तुळशीभोवती प्रदक्षिणा काढतात. सौभाग्यासाठी मनोमन तुळशीपुढे प्रार्थना केली जाते. ‘गोविंदा, गोऽविंदा’चा जयघोष केला जातो. पूर्ण परिसर लग्नविधी पाहण्यासाठी आलेल्या माणसांनी भरून जातो. हे दृश्य मुख्यत्वे ग्रामीण भागात विलोभनीय दिसते. यानंतर तुळशीपुढील नैवेद्य सर्वांना भक्तिभावाने वाटला जातो. या तुळशीविवाह सोहळ्यानंतरच इहलोकातील मानवी लग्नाचे मुहूर्त असतात. सगळीकडे विवाहाचा माहोल सुरू होतो.

तुळस ही अत्यंत पवित्र व औषधी वनस्पती आहे. एका विशिष्ट सुगंधाने पानोपानी भरलेले, ंंमंजिर्‍यांनी नटलेले असे हे नाजूक रोपटे पवित्र, मंगल वाटते.
‘जेथे आहे तुळशीचे पान | तेथे वसे नारायण… अशी संत बहिणाबाईने तुलसी महात्म्याची थोरवी गायिली आहे.

मानवी जीवनात तुळशीचे महत्त्व आरोग्यदृष्ट्या अपार उपकारक आहे. तुळसपानाच्या सेवनाने सकारात्मक ऊर्जा प्रवाहीत होते. तुळशीचे मूळ, खोड, पाने, मंजिर्‍यांचा वेगवेगळ्या प्रकारे औषधी उपयोग केला जातो. तुळशीच्या पानांचा व मंजिर्‍यां घालून केलेला काढा सर्दी, खोकला कमी होण्यास उपयुक्त असतो. दातदुखी, कमजोर हिरड्यांसाठी तुळशीच्या पानांचा रस लाभदायी आहे. तुळशीच्या पानात जीवनसत्त्व ‘अ’ व ‘क’ मुबलक प्रमाणात असल्यामुळे त्यांच्या सेवनाने त्वचेला कांती येते. तुळसीच्या पानांचा लेप चेहर्‍यावरची त्वचा उजळण्यास उपयोगी असतो. रोज सकाळी चार ते पाच तुळशीची पाने खाल्ल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तोंडाला चव नसणे, अपचन यावरही तुळस रामबाण उपाय आहे. तुळशीची पाने, अँटीफंगला, अँटीबॅक्टेरीयन, अँटीबायोटिक तत्त्वांमुळे इन्फेक्शनपासून बचाव करतात.

तुळशीची पाने टॉक्सीन्सचे प्रमाण कमी करून रक्त शुद्ध होण्यास मदत करतात. तुलसीयुक्त चहा रक्तदाब कमी होण्यास लाभदायी आहे. मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठीही तुळस फायदेशीर आहे. या सर्व गुणधर्मांमुळे हृदयरोगाची शक्यता अत्यंत कमी होते, असे सिद्ध होत आहे. प्रत्येक घरात तुळशीच्या रोपट्यांचे रोपण व संवर्धन केले जाते. तुळशीला मानवी जीवनात धार्मिक व आरोग्यदृष्ट्या अढळ स्थान प्राप्त झाले आहे हे निश्‍चित.