तुल्यबळ संघांत घमासान!

0
234
France's midfielder Paul Pogba controls the ball as he takes part in a training session of France's national football team at the Saint Petersburg Stadium, in Saint Petersburg, on July 9, 2018, on the eve of their Russia 2018 World Cup semi-final football match against Belgium. / AFP PHOTO / CHRISTOPHE SIMON

>> फ्रान्स- बेल्जियम उपांत्य सामना आज

फिफा विश्‍वचषक फुटबॉल स्पर्धेचा पहिला उपांत्य सामना आज फ्रान्स व बेल्जियम यांच्यात खेळविला जाणार आहे. जागतिक क्रमवारीत बेल्जियमचा संघ तिसर्‍या तर फ्रान्सचा सातव्या स्थानी आहे.

फ्रान्स संघ दुसर्‍यांदा विश्‍वविजेता बनण्याच्या प्रयत्नात असून ‘अंतिम १६’ व उपांत्यपूर्व फेरीत त्यांनी अनुक्रमे अर्जेंटिना व उरुग्वेला नमवून आपली सिद्धता दाखवून दिली आहे. दुसरीकडे ‘रेड डेव्हिल्स’ म्हणून सुपरिचित असलेल्या बेल्जियमने आशियाई दिग्गज जपानविरुद्ध पिछाडीवरून मुसंडी मारतानाच दक्षिण अमेरिकन ‘जायंट’ ब्राझिलचा खेळ खल्लास करत आपली ताकद दाखवली आहे. आज विजय प्राप्त करणारा संघ अंतिम फेरीत प्रवेश करणार असून क्रोएशिया व इंग्लंडमधील दुसर्‍या उपांत्य सामन्यातील विजेत्यांशी त्याचा सामना होणार आहे.

फ्रान्स संघाचे प्रशिक्षक दिदिएर डेसचॅम्प्‌स यांना आजच्या सामन्यासाठी मध्यफळीत काही कठोर निर्णय घ्यावे लागणार आहे. निलंबनानंतर ब्लेस माटुईडी परतणार आहे. त्यामुळे उरुग्वेविरुद्धच्या सामन्यात खेळलेल्या कॉरेटिंन टोलिसा याच्या जागेला धोका आहे. पॉल पोग्बा व एनगोलो कांटे यांच्यासह ब्लेसला मध्यफळीची जबाबदारी स्वीकारावी लागणार आहे. दुसरीकडे बेल्जियमचे प्रशिक्षक रॉबर्ट मार्टिनेझ संघाचा समतोल साधण्याच्या प्रयत्नात आहेत. ब्राझिलवरील विजयात बेल्जियमचा संघ ४-३-३ अशा रणनीतीसह उतरला होता. हीच रणनीती अवलंबल्यास टोबी अल्डरविएरल्ड उजव्या बगलेत व थॉमस वर्मिलेन मध्य बचावपटू म्हणून खेळू शकतो. उभय संघ आत्तापर्यंत ७४ वेळा आमनेसामने आले असून बेल्जियमने ३० विजय व २४ पराभव अशी कामगिरी केली आहे. प्रमुख स्पर्धांच्या बाद फेरीत मात्र फ्रान्सने बेल्जियमविरुद्धच्या तिन्ही सामन्यात विजय मिळविलेला आहे. या दोघांमधील बाद फेरीतील शेवटचा सामना १९८६ साला झाला होता. यानंतर पुलाखालून खूप पाणी वाहून गेले आहे. अखेरच्या तीन मित्रत्वाच्या लढतीत बेल्जियमने फ्रान्सकडून पराभव स्वीकारलेला नाही. त्यामुळे आजचा सामना रंगतदार होणार आहे.