तुलना नकोच

0
246

पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांना थेट ‘आज के शिवाजी’ ठरवणार्‍या पुस्तकावरून सध्या मोठा वाद उफाळला आहे. हे पुस्तक जेव्हा प्रकाशित झाले तेव्हाच असे घडणार याची अटकळ होती आणि तसेच झाले. विरोधी पक्षांना मोदींना आणि भाजपला झोडपण्यास एक आयते हत्यार मिळाले. छत्रपती शिवाजी महाराज हे सतराव्या शतकातील एक महान व्यक्तिमत्त्व. नरेंद्र मोदी यांची एक नेता म्हणून आज थोरवी कितीही असली तरी त्यांना थेट आजच्या काळातले शिवाजी महाराज ठरवणे योग्य नाही. जयभगवान गोयल नावाच्या सध्या भाजपमध्ये असलेल्या एका नेत्याने हा प्रताप केला आणि दिल्लीचे भाजप प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी, राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू आणि माजी खासदार महेश गिरी यांनी दिल्लीतील भाजप कार्यालयात या पुस्तकाचे प्रकाशन करून त्याला जणू अधिकृतता मिळवून दिली. या पुस्तकामध्ये आपल्या मोदीनिष्ठेचे प्रदर्शन घडवत या गोयल महाशयांनी शिवाजी महाराज आणि मोदींच्या शरीरयष्टीच्या तुलनेपासून आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत. त्यामुळे शिवाजी महाराजांना देवतुल्य मानणारा मराठी माणूस हे सहन करणार नाही हे तर स्पष्टच होते. तशा प्रतिक्रिया लगोलग उमटल्या. खुद्द छत्रपती शिवरायांचे तेरावे वंशज असलेल्या कोल्हापूरच्या संभाजीराजेंनी स्वतः भाजपमध्ये असूनही सिंदखेडराजाच्या जिजाऊ पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमात तडफदारपणे या पुस्तकावर झोड उठवली आणि शिवरायांचा बाणेदार वारसा दाखवून दिला. त्यानंतर हा विषय तापत गेला आणि महाराष्ट्रातील शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या तिन्ही पक्षांनी यावर आंदोलने करून मोदी आणि भाजपवर निशाणा साधला. या पुस्तकाचे लेखक जे गोयल आहेत, ते कोणी लेखक, विचारवंत वगैरे नव्हेत. जयभगवान गोयल हे मूळचे पंजाबच्या लुधियानाचे महाशय पूर्वी बाळासाहेब ठाकर्‍यांमुळे प्रभावित होऊन शिवसेनेत दाखल झाले होते. पुढे सेनेने उत्तर भारतीयांना झोडपायला सुरूवात करताच सेनेतून बाहेर पडून त्यांनी स्वतःची राष्ट्रवादी शिवसेना स्थापन केली आणि सरतेशेवटी भाजपच्या गोटात डेरेदाखल झाले. उत्तर भारतीयांच्या वतीने दिल्लीतील महाराष्ट्र सदनामध्ये तोडफोड करणारे हेच होते. या पुस्तकाशी आमच्या पक्षाचा काही संबंध नाही असे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले, परंतु जावडेकर काही म्हणोत, ज्या अर्थी ते पुस्तक पक्षाच्या दिल्लीतील कार्यालयात प्रकाशित झाले, त्या अर्थी त्यातील मजकुराशी पक्ष सहमत आहे असा अर्थ निघणे स्वाभाविक आहे. हे पुस्तक भाजप कार्यालयात प्रकाशित करू देण्यापूर्वी त्यामध्ये काय आहे व त्या मजकुराचे महाराष्ट्रात काय पडसाद उमटू शकतात याचा विचार संबंधित नेत्यांनी करायला हवा होता. मोदीमय झालेल्या मंडळींना ते भान राहिले नसावे. त्यामुळे गोयल यांचे पुस्तक पक्ष कार्यालयात प्रकाशित केले गेले. वादाचे वादळ उठताच, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जावडेकरांनी ‘लेखकाने माफी मागितली आहे व पुस्तक मागे घेतलेले आहे, त्यामुळे आता हा विषय येथे संपला’ असे काल जाहीर केले, परंतु गोयल महाशय अजूनही पडलो तरी नाक वर म्हणतात तसे आपल्याच म्हणण्यावर ठाम दिसत आहेत. पक्षाकडून आदेश आले तरच पुस्तक मागे घेण्याचा विचार करू वगैरे म्हणत आहेत. वास्तविक स्वतःला प्रधान सेवक म्हणवणार्‍या मोदींनाही स्वतःची शिवाजी महाराजांशी झालेली तुलना रुचणारी नसेल. त्यांनी स्वतःहून तसे सांगितले असते तर ते शोभून दिसले असते. ते कोणाचा अवतार आहेत की काय हे काळाला ठरवू द्यात. गोयल यांनी हा विषय भाजपसाठी राजकीयदृष्ट्या अडचणीचा ठरत आहे हे दिसल्यावर तरी त्यासंदर्भात नरमाईची भूमिका घ्यायला हवी होती, परंतु अजूनही ती जर ते घेणार नसतील, तर पक्षाने अशा उपद्रवी व्यक्तीपासून दूर राहणेच श्रेयस्कर ठरेल. पुस्तकातील तुलनेशी पक्षाची असहमती दर्शवण्याऐवजी सुधीर मुनगंटीवारांसारखे पक्षनेते ‘जाणता राजा’, ‘चाणक्य’ वगैरे उपमांचे दाखले देत झाल्या प्रकाराचे समर्थन करताना दिसले. तसे करणे म्हणजे गोयल यांनी चालवलेल्या अतिरेकी व्यक्तिस्तोमाचे समर्थन करण्यासारखे ठरते. विरोधी पक्षांनी हा विषय घेण्यामागे राजकारण आहे हे जरी खरे असले तरी सामान्य माणसाला देखील ही तुलना मुळीच रुचलेली नाही. छत्रपती शिवरायांनी आपल्या अवघ्या पन्नास वर्षांच्या आयुष्यामध्ये जे कर्तृत्व दाखवले त्यावर कुठलाही कलंक नाही हे त्या व्यक्तिमत्त्वाचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य आहे हे विसरले जाऊ नये. त्यांच्या गुणांपासून एखाद्याने प्रेरणा घेतली आहे किंवा एखाद्याच्या राज्यकारभारावर त्यांचा प्रभाव दिसतो, येथपर्यंत ठीक, परंतु एखाद्याला त्यांच्याच उंचीवर नेऊन बसवण्याचा आणि प्रतिशिवाजी बनवण्याचा अट्टहास धरणे हा अतिरेक आहे आणि गोयल किंवा भाजपने तो करू नये. हा विषय संपवायचा असेल तर एक तर लेखकाने माघार घ्यावी वा पक्षाने त्याच्याशी असहमती दर्शवावी. उगाच या पुस्तकाचे लंगडे समर्थन केल्याने हसे होईल. शेवटी कोणताही महापुरूष हा स्वतःच्या कर्तृत्वाने तेथवर पोहोचलेला असतो, खुशामतखोरांनी माजवलेल्या व्यक्तिस्तोमातून नव्हे!