तिहेरी तलाक विधेयक आज राज्यसभेत मांडणार

0
212

लोकसभेत अलीकडेच संमत झालेले तिहेरी तलाकला गुन्हा ठरवून पतीला तीन वर्षांच्या तुरुंगवासाची तरतुद करणारे विधेयक आज राज्यसभेत मांडले जाणार आहे.
मुस्लिम समाजात तीन वेळा तलाक शब्द उच्चारून पत्नीला घटस्फोट दिल्यास तो गुन्हा ठरवून तो गुन्हा करणार्‍या पतीला तीन वर्षे तुरुंगवास ठोठावण्याची तरतूद या विधेयकात आहे.

मुस्लिम महिला (विवाह विषयक हक्क संरक्षण) विधेयक असे या विधेयकाचे नाव असून कायदेमंत्री रवीशंकर प्रसाद हे विधेयक आज मंगळवारी राज्यसभेत मांडणार आहेत. मात्र राज्यसभेत सत्ताधार्‍यांच्या बाजूने बहुमत नसल्याने हे विधेयक या सभागृहात रोखले जाण्याची शक्यता आहे. तसे करून विधेयकाच्या फेर आढाव्यासाठी विधेयक संसदीय समितीकडे पाठविण्याची शक्यता आहे.

दरम्यान इंडियन मुस्लिम लिगने हे विधेयक राज्यसभेत संमत झाल्यास त्या विरोधात देशभरातील विविध संघटना सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे म्हटले आहे.
या विधेयकामुळे तिहेरी तलाकचा बळी ठरणार्‍या महिलेला पतीविरोधात न्याय दंडाधिकार्‍यांकडे दाद मागण्याची मुभा आहे. पतीकडून स्वत:साठी व अल्पवयीन मुलांच्या संगोपनासाठी भत्ता मागण्याचीही पत्नीला संधी मिळणार आहे. तसेच अल्पवयीन मुलांचा ताबा पत्नी मिळवू शकणार आहे.