तिसर्‍या मांडवी पुलाचा अखेरचा पर्वरीत ‘डेक स्लॅब’ बसवला

0
107

पर्वरी (न. प्र.)
मांडवी नदीवरील तिसर्‍या पुलाचा पर्वरीच्या बाजूचा शेवटचा ‘डेक स्लॅब’ बसविण्यात आला. काल बुधवारी गोवा राज्य पायाभूत विकास महामंडळाचे अध्यक्ष दीपक पाऊसकर, उपाध्यक्ष सिद्धार्थ कुंकळकर यांच्या हस्ते हा स्लॅब बसविण्यात आला. त्यामुळे आता खर्‍या अर्थाने पर्वरी आणि पणजी ही दोन शहरे आता जोडली गेली आहेत. या पुलाचे जवळजवळ ९० टक्के काम पूर्ण झाले असून जानेवारी २०१९ च्या दुसर्‍या आठवड्यात हा पूल जनतेसाठी खुला केला जाणार असल्याचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कुंकळकर यांनी सांगितले.
गोवा राज्य पायाभूत विकास महामंडळ तसेच एलएनटीचे सर्व कर्मचारी रात्रंदिवस मेहनत करून या पुलाचे काम पूर्ण करत आहेत. या पुलाची लांबी ५१३६ मीटर इतकी असून अंदाजे ४८२ कोटी रुपये इतका खर्च येणार आहे. या पुलाच्या दोन्ही बाजूला चार पदरी रस्ता केला आहे. गोवा भाजप सरकारचा हा एक स्वप्नपूर्ती करणारा महत्वपूर्ण प्रकल्प आहे. याचे सर्व श्रेय मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना द्यावे लागेल. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सहकार्यामुळे या पुलाचे काम लवकर पूर्ण होत आहे. केंद्र सरकारमुळे गोव्यात वेगवेगळ्या ठिकाणी रस्ते, लहान पूल बांधण्याचे काम जोरदारपणे सुरू आहे. असे कुंकळकर यांनी सांगितले.