तिसरा दिवस पाण्यात

0
112

भारत व दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसर्‍या दिवशी एकाही चेंडूचा खेळ झाला नाही. पावसामुळे क्रिकेटप्रेमींचा हिरमोड झाला असला तरी मागील काही महिन्यांपासून दुष्काळाचा सामना करत असलेल्या सामान्य नागरिकांना पावसामुळे दिलासा मिळाला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावातील २८६ धावांना उत्तर देताना भारताचा पहिला डाव दुसर्‍या दिवशी २०९ धावांत संपला होता. यानंतर यजमानांनी आपल्या दुसर्‍या डावात २ बाद ६५ धावा करत एकूण आघाडी १४२ धावांपर्यंत फुगवली होती.

उर्वरित मालिकेला मुकणार स्टेन
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमनाचा सामना खेळतानाच दक्षिण आफ्रिकेचा प्रमुख वेगवान गोलंदाज डेल स्टेन याला पुन्हा दुखापत झाली आहे. भारताच्या डावातील आपले १८वे षटक टाकताना त्याच्या डावा पायाची टाच दुखावली होती. यामुळे त्याला षटकपूर्ण करता आले नव्हते. तसेच यानंतर पुन्हा तो गोलंदाजीलादेखील उतरला नव्हता. विविध चाचण्या केल्यानंतर त्याला डॉक्टरांनी किमान सहा आठवड्यांच्या विश्रांतीचा सल्ला दिला असून गरज पडली तर शस्त्रक्रियादेखील करावी लागू शकते.