तिळारी घाट अपघातात पाच ठार

0
235
Exif_JPEG_420

>> कार दिडशे फूट दरीत कोसळली, मृत तरुण बेळगावचे

तिळारी रामघाट येथे कार दिडशे फूट खोल दरीत पडून झालेल्या अपघातात बेळगाव येथील पाच पर्यटकांचा मृत्यू झाला. तिलारीनगर येथील लष्कर दर्शन (पॉंईंट) स्थळावर निसरड्या वाटेने चालकाने कार नेली. त्यामुळे ब्रेक न लागता व तेथे संरक्षण कठडा नसल्यामुळे कार सरळ खाली दिडशे फूट दरीत कोसळली व हा अपघात झाला. यात कारमधील पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात काल रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास झाला. गेल्या वर्षी हेरा. ता. चंदगड येथील आरोग्य केंद्राची रूग्णवाहिका पडून चार जणांचा मृत्यू झाला होता. त्याच जागी काल हा अपघात झाला.

अपघातचे वृत्त समजतात चंदगड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अपघाताचा पंचनामा केला. मरण पावलेल्यांमध्ये मोहन लक्ष्मण रेडेकर (४०, रा. बाळेकुंद्री), किशन मुंकुद गावडे, (१९, रा. जुने बेळगाव), यल्लापा एन. पाटील (४५, रा. बोकनुर), पंकज संपद किलेकर, (३०, रा. शिवाजीनगर बेळगाव) व नागेंद्र सिद्राय बाबू गोडे (२९, रा. आष्टे बेळगाव) यांचा समावेश आहे. यात तीन विवाहित तरूण आहेत. बेळगाव येथील हे पाच जण चंदगड तालुक्यातील रामघाटात तिलारीनगर येथील लष्कर दर्शन स्थळ येथे पावसाळी सहलीचा आनंद लुटण्यासाठी आले होते. दुपारी जवळच्या हॉटेलमध्ये जेवण करून ते दर्शन स्थळ येथे व्हॅगेनर कार (केए ०४ एमबी ४६२०) घेऊन आले. लष्कर दर्शन स्थळ येथे जाण्यासाठी निसरडी पायवाट असून तेथे गाडी रस्ता नाही. मात्र या तरुणांनी त्याच निसरड्या वाटेवरून आपली कार पुढे आणली. या वाटेने जाताना कारचे ब्रेक न लागल्यामुळे कार निसरून दिडशे ङ्गूट खोल दरीत कोसळून खाली असलेल्या खडकावर उभी आपटली. त्यामुळे हे पाचही जण जागीच ठार झाले. यातील तिघेजण कारमधून बाहेर फेकले गेले तर दोघांचा कारमध्येच मृत्यू झाला.

मित्रांनी दिली माहिती
कार दरीत कोसळल्यानंतर काही मोटारसायकलवरुन आलेल्या त्यांच्या मित्रांनी कार ओळखली. त्यांनी त्वरित चंदगड पोलिसांना याची माहिती दिली. पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दरीत उतरून कोणी जिवंत आहे का याची पाहणी केली. मात्र पण कुणी वाचू शकले नाही. दरम्यान, या अपघाताचे वृत्त दोडामार्ग तालुक्यात पसरले. यावेळी दोडामार्ग तालुका मनसे प्रमुख मायकल लोबो यांनी घाटात धाव घेतली. त्यांनी पोलिसांना मदत करत दरीत खाली पडलेला एक मृतदेह दरीत उतरून दोरखंडाच्या साहाय्याने बाहेर काढला. तसेच पोलिसांच्या मदतीने पाचही मृतदेह काळोख पडण्याअगोदर वर काढण्यात आले. चंदगड पोलिसांनी पंचनामा केला.

कारमध्ये रक्ताचा सडा
अपघातात मृत्यू पावलेल्या तरुणांच्या मृतदेहांची अवस्था भयानक होती. त्यांच्या कारमध्ये रक्ताचा सडा पडला होता. मृतदेह सायंकाळी साडेसहा वाजता बाहेर काढून चंदगड ग्रामीण रूग्णालय येथे हलवण्यात आले. त्यानंतर त्यांच्या नातेवाइकांना याची खबर देण्यात आली. घटनास्थळी येताच नातेवाइकांनी एकच आक्रोश केला.

घटनास्थळी गर्दी
दरम्यान, या अपघाताचे वृत्त समजताच घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. चंदगड पोलीस घटनास्थळी जाण्यास उपस्थित लोकांना मनाई करून पुढे दरीत जात होते. तर वरून अनेक जण खाली वाकून कार तसेच सुरू असलेले मदतकार्य बघत होते. पावसाने विश्रांती घेतल्याने मृतदेह बाहेर काढणे शक्य झाले.