तिलारी कालव्याचे शिल्लक काम डिसेंबर २०१९ पर्यंत पूर्णत्वास : पालयेकर

0
193

राज्यातील तिलारी धरणाच्या कालव्याचे शिल्लक १२.५ किलो मीटरचे काम डिसेंबर २०१९ पर्यत पूर्ण करण्यात येणार आहे, अशी माहिती जलस्रोत मंत्री विनोद पालयेकर यांनी काल दिली.

तिलारी कालव्याचे काही भागात बांधकाम जमीन संपादन व इतर काही कारणांमुळे रखडले आहे. कालव्याचे काम रखडलेल्या भागांना भेटी देऊन अधिकार्‍यांना आवश्यक सूचना करण्यात आली आहे. तिलारी कालव्याचे पाणी शेतीसाठी उपलब्ध केले जात आहे. त्यामुळे तिलारी कालव्याच्या कामाचे पंतप्रधान कार्यालयातून मॉनिटरींग केले जाते, असेही मंत्री पालयेकर यांनी सांगितले.

कोरगाव येथे नवीन धरण बांधण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. या धरणाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. कोरगाव येथील नियोजित धरणावर अंदाजे ६ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. कोरगाव परिसरातील लोकांना पाण्याचा पुरवठा करण्यासाठी धरण उपयुक्त ठरणार आहे, असेही मंत्री पालयेकर यांनी सांगितले.

एक महिना पुरण्याएवढा पाणी साठा
राज्यातील पाच धरणांमध्ये आगामी एक – दोन महिने पुरण्याएवढा पाण्याचा साठा उपलब्ध आहे. पावसाचे वेळेवर आगमन होण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने यंदा पाण्याची समस्या निर्माण होणार नाही. पावसाचे आगमन लांबले तरी साळावली, अंजुणा या धरणामध्ये १ महिना पुरवण्याएवढा पाण्याचा साठा आहे. चापोली, आमठणे, पंचवाडी धरणामध्ये दोन महिने पुरवण्या एवढा पाण्याचा साठा आहे. तसेच ओपा पाणी प्रकल्पाला पाण्याचा पुरवठा करणार्‍या खांडेपार नदीमध्ये ४४ मीटर पाण्याचा साठा असून आगामी पंधरा दिवस पाण्याचा पुरवठा होऊ शकतो, असेही मंत्री पालयेकर यांनी सांगितले.

धरणातील गाळ उपसण्यावर निर्णय नाही
राज्यातील पाच धरणातील गाळ उपसण्यांबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. गाळ उपसण्यांची गरज भासल्यास आमठणे आणि पंचवाडी धरणातील गाळ उपसण्यांचे काम पुढील वर्षी हाती घेतले जाणार आहे, अशी माहिती मंत्री पालयेकर यांनी दिली.

विर्डी धरणाचे काम सुरू असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर जलस्रोत खात्याच्या अधिकार्‍यांना विर्डी येथे जाऊन पाहणी करण्याची सूचना केली होती. या पाहणीबाबत अहवाल प्राप्त झाल्यानंतर आवश्यक कारवाई केली जाणार आहे. विर्डी धरणाच्या बांधकामाकडे लक्ष ठेवण्याची सूचना अधिकार्‍यांना करण्यात आली आहे, असेही मंत्री पालयेकर यांनी सांगितले.