ताळगाव ग्रामपंचायतीसाठी ७०.९० टक्के मतदान

0
104

>> २८ उमेदवारांचे भवितव्य सीलबंद, आज मतमोजणी

ताळगाव ग्रामपंचायतीच्या दहा प्रभागांसाठी काल घेण्यात आलेल्या निवडणुकीत ७०.९० टक्के मतदान झाले. मतदानाच्या काळात कुठलाही अनुचित प्रकार न घडला नाही. निवडणूक रिंगणातील २८ उमेदवारांचे भवितव्य मतपेट्यांत सीलबंद झाले आहे. मतमोजणी सोमवारी सकाळी ८ वाजता कांपाल येथील बालभवनाच्या आवारात केली जाणार आहे, अशी माहिती निवडणूक अधिकारी तथा तिसवाडीचे मामलेदार फ्रॅकलीन फेर्रांव यांनी दिली.

ताळगाव पंचायतीच्या ११ प्रभागासाठी निवडणूक जाहीर करण्यात आली होती. आमदार जेनिफर मोन्सेरात आणि माजी मंत्री मोन्सेरात यांच्या ताळगाव प्रोग्रेसिव्ह डेव्हलमेेंट फ्रंटने अकरा प्रभागात उमेदवार उभे केले. त्यातील प्रभाग ३ मधील उमेदवार आग्नलो दा कुन्हा हे बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे पंचायतीच्या १० प्रभागासाठी निवडणूक घेण्यात आली. ताळगाव पंचायत क्षेत्रात १६,२०९ मतदार असल्याने मतदानासाठी २२ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. या निवडणुकीसाठी यंत्राचा वापर करण्यात आला नाही. तर, मतपत्रिकांच्या माध्यमातून मतदान घेण्यात आले. मतदानाच्या काळात काही ठिकाणी प्रतिस्पर्धी उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांमध्ये किरकोळ कारणावरून खटके उडत होते. विविध भागात पोलीस गस्त असल्याने अनुचित प्रकार घडला नाही.

ताळगाव पंचायतीच्या प्रभाग ७ मध्ये सर्वाधिक ८३.६७ टक्के तर प्रभाग ६ मध्ये सर्वांत कमी ४५.५७ टक्के मतदानांची नोंद झाले. पंचायत निवडणुकीसाठी पहिल्या दोन तासात १५ टक्के मतदानाची नोंद झाली होती. दुपारी १२ वाजता ३४ टक्के मतदानाची नोंद झाली. दुपारी २ वाजता पन्नास टक्के मतदानाची नोंद झाली. तर, संध्याकाळी ४ वाजता ६३ टक्के मतदानाची नोंद झाली होती. पंचायत क्षेत्रातील काही उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांकडून विविध प्रकारच्या तक्रारी येत होत्या. परंतु, घटनास्थळी जाणार्‍या फिरत्या पथकांना काहीच आक्षेपार्ह आढळून येत नव्हते, अशी माहिती निवडणूक अधिकारी फेर्रांव यांनी दिली.

ताळगाव पंचायत क्षेत्रातील दारूची दुकाने बंद असली तरी, पणजी महानगरपालिकेच्या हद्दीतील दारूची दुकाने सुरू असल्याने वादावादीचे प्रकार होत होते. सरकारी अधिकार्‍यांना मतदान केंद्राच्या बाजूची काही दुकाने बंद करण्याची सूचना करावी लागली.

ताळगाव पंचायत क्षेत्रात अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कामराभाट येथे केंद्रीय राखीव दलाचे जवान तैनात करण्यात आले होते. मतदानाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही, अशी माहिती पणजीचे पोलीस निरीक्षक सुदेश नाईक यांनी दिली.