ताळगावात दुकान आगीत भस्मसात ः ५० लाखांची हानी

0
155

ताळगाव येथील ट्रेड लिंक या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या दुकानाला काल दुपारी लागलेल्या आगीत दुकानातील सर्व साहित्य आगीच्या भक्षस्थानी पडले असून अंदाजे ५० ते ५५ लाखांची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

या दुकानाचे मालक साईप्रसाद नाईक दुपारी पावणे दोनच्या सुमारास दुकान बंद करून घरी जेवणासाठी गेले होते. सव्वा दोनच्या सुमारास दुकानातून धूर येत असल्याची माहिती नाईक यांना मिळाली. पणजी अग्निशामक दलाला दुपारी २.२० च्या सुमारास आगीची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्यास सुरुवात केली. आग विझविण्यासाठी तीन अग्निशामक बंबांचा वापर करण्यात आला. या दुकानाच्या जवळ असलेली दुकाने व घरे वाचविण्यात अग्निशामक दलाला यश प्राप्त झाले.

इलेक्ट्रॉनिक्स वस्तूच्या दुकानात टीव्ही, फ्रीज, एसी व इतर साहित्याचा समावेश होता. दुकानाला लागलेल्या आगीत सर्वच सामान आगीच्या भक्षस्थानी पडल्याने दुकान मालक नाईक यांना मोठा धक्का बसला आहे. दुकानमालकाला दुकानातील एकंदर साहित्य व नुकसानीची माहिती देण्याची सूचना करण्यात आली आहे, अशी माहिती अग्निशामक दलाच्या सूत्रांनी दिली.