ताळगावची उपेक्षा

0
112

ताळगावमधील रस्त्यांच्या खराब स्थितीविरुद्ध तेथील नागरिकांनी काल रास्ता रोको केले. पणजीचे उपनगर असलेल्या आणि झपाट्याने शहरीकरण होत चाललेल्या ताळगावमधील रस्त्यांची स्थिती विश्वास बसणार नाही इतकी वाईट आहे. मलनिःस्सारण प्रकल्पासाठी जोडणी टाकण्याचे निमित्त करून ताळगावातील सर्व छोटे – मोठे रस्ते उखडले गेले. वास्तविक हे काम वेगाने पूर्ण करून रस्ते पूर्ववत करणे आवश्यक होते. परंतु वाहिन्या टाकण्याचे काम पूर्ण झाले, तरी रस्ते मात्र पूर्ववत झाले नाहीत. मध्यंतरी निवडणुका येऊन गेल्या. त्यामुळे काम ठप्प पडल्याचे सांगितले गेले. त्यानंतर पावसाळा आल्याचे निमित्त झाले. पण शेवटी आजतागायत ताळगावाच्या रस्त्यांची स्थिती अतिशय वाईट आहे. मलःनिस्सारण वाहिन्या टाकण्याचे काम पूर्ण होऊनच वर्ष उलटून गेलेले आहे. पण अत्यंत खडबडीत आणि खड्डेमय रस्त्यांवरून हजारो ताळगावकर नित्य प्रवास करीत असतात. यामध्ये मोठमोठे सरकारी अधिकारी आहेत, उद्योजक आहेत, व्यावसायिक आहेत, परंतु रस्त्याची ही दुःस्थिती मुकाट सहन करण्यात आली. सर्वांत उल्लेखनीय बाब म्हणजे राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची ‘१३१३’ रोज सकाळ संध्याकाळ या खडबडीत रस्त्यांवरून धावायची. ताळगाव – मिरामार दरम्यानच्या विस्तीर्ण रस्त्यावर वाहने भरधाव येत असल्याने रस्ता ओलांडता येत नाही म्हणून दुभाजक बसवण्याची कल्पना कोण्या शहाण्याने माजी मुख्यमंत्र्यांच्या गळी उतरवली आणि तेथे फूटभर उंचीचे दुभाजक बसवले गेल्याने आता नागरिकांना तेथे रस्ता ओलांडणेच अशक्यप्राय होऊन बसले आहे. अजब तुझे सरकार म्हणतात ते यासाठी! मध्यंतरी विधानसभा अधिवेशनात ताळगावच्या या खराब रस्त्यांचा आणि दुभाजकाचा विषय उपस्थित झाला होता. कंत्राटदाराला जबाबदार धरण्यात येईल, चौकशी केली जाईल वगैरे आश्वासने तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी दिली. पण अद्याप कंत्राटदाराच्या बेफिकिरीवर काही कारवाई झाल्याचे ऐकिवात नाही. ताळगावचे रस्ते तसेच आहेत. रोज हजारो वाहने खडखडाट करीत धावत आहेत. नुकताच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा उद्घाटन सोहळा ताळगाव पठारावरील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी प्रेक्षागारात आयोजित करण्यात आला होता. इफ्फीचे प्रतिनिधी पणजीहून ताळगावमार्गे सदर उद्घाटनस्थळी जातील हे उद्घाटनाच्या आधल्या दिवशी कोण्या शहाण्याच्या लक्षात आले असावे. अत्यंत तातडीने आधल्या दिवशी सांतिनेज – ताळगाव – सां पावल रस्त्यावरील खड्डे बुजवून डांबरीकरण करण्यात आले. त्याआधी नागरिक फारच कुरकूर करू लागले की हे खड्डे फक्त माती टाकून बुजवण्याचा फार्स केला जायचा. चार – आठ दिवसांनी पुन्हा खड्डे आपले पूर्वरूप धारण करायचे. ताळगावातील इतर अनेक रस्त्यांची आजही ही स्थिती आहे. जनता हे सगळे मुकाट सहन करते म्हणून सरकारकडून अशी उपेक्षा होऊ शकते. काही काळापूर्वी दुर्गावाडी भागातील नागरिकांनी रस्त्यासंदर्भात आंदोलन केेले. हाती काही पडले नाही. शेवटी काल ताळगावला जाणारा रस्ताच नागरिकांनी रोखून धरला. आता तरी सरकारला जाग येईल अशी अपेक्षा आहे. राजधानीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ताळगावची ही उपेक्षा सार्वजनिक बांधकाम खात्याच्या निद्रिस्त कारभाराची परिणती म्हणायची की गेल्या विधानसभा निवडणुकीत ताळगाववासीयांनी भारतीय जनता पक्षाला वेशीबाहेर ठेवले त्याचा हा सूड म्हणायचा? बाबूश यांनी ताळगावचे रस्ते चकाचक केले होते. पणजीच्या तोंडात मारील असे दिमाखदार सभागृह, गुळगुळीत रस्ते, आकर्षक पदपथ यांनी बिल्डरांच्या सदनिकांचे दर गगनाला भिडवले असतील, परंतु ताळगावचे ते रूप सर्वांना स्तिमित करून गेले होते. आज विद्यमान भाजप सरकारच्या काळात ताळगावची रयाच गेली आहे. आपले सरकार सत्ताधारी आणि विरोधक असा भेदभाव करणार नाही अशी ग्वाही पर्रीकरांनी सत्तेवर आल्या आल्या दिली होती. पण ताळगावची उपेक्षा पाहिली तर नागरिकांच्या मनात वेगळे चित्र निर्माण होते. ते खोटे आहे हे निदान नव्या मुख्यमंत्र्यांनी सिद्ध केले पाहिजे. ताळगावचे रस्ते पूर्ववत झाले पाहिजेत. राजधानीपासून हाकेच्या अंतरावरील या उपनगराची ही दुःस्थिती आणि त्यासाठी भाजपच्याच कार्यकर्त्यांना रस्त्यावर यावे लागणे हे सरकारची वाईट प्रतिमा निर्माण करते आहे. याला साबांखा जबाबदार असेल, परंतु पत सरकारची जाते आहे.