तालुकास्तरावर समान सेवा केंद्रे

0
120

>> महसूलमंत्र्यांची माहिती, मे अखेरीस मडगावात पहिले केंद्र

राज्यातील बारा तालुक्यात जनतेच्या सोयीसाठी समान सेवा केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत. मे महिन्याच्या अखेरीस पहिले समान सेवा केंद्र मडगाव येथे सुरू केले जाणार आहे, अशी माहिती महसूलमंत्री रोहन खंवटे यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.

महसूल विभागाकडून ऑन लाइन पद्धतीने विविध प्रकारचे दाखले, एक चौदाचा उतारा घेणार्‍या नागरिकांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. तर, महसूल विभागात येऊन दाखले, एक चौदाचा उतारा घेणार्‍या नागरिकांकडून शुल्क स्वीकारले जाणार आहे. तलाठ्याच्या अनुपस्थितीतसुद्धा नागरिकांची कामे वेळेवर पूर्ण व्हावीत या उद्देशाने नागरिकांच्या स्वप्रमाणित प्रती स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असेही मंत्री खंवटे यांनी सांगितले.

तालुका पातळीवरील समान सेवा केंद्रांना सरकारची सर्व खाती जोडली जाणार आहेत. त्यामुळे एका छताखाली नागरिकांना विविध सेवा उपलब्ध होणार आहेत. गोवा इलेक्ट्रॉनिकच्या सहकार्यातून सेवा केंद्रे चालविली जाणार आहेत, असेही मंत्री खंवटे यांनी सांगितले.

महसूल खात्याच्या कारभारात सुसूत्रता आणण्यावर भर देण्यात आला आहे. महसूल विभागातील दाखले व इतर कागदपत्रे ऑन लाइन पद्धतीने उपलब्ध केली जात आहेत. म्युटेशन, पार्टीशनच्या प्रक्रियेला गती देण्यात आली आहे.
मडगाव, डिचोली, म्हापसा, तिसवाडी येथे नागरिकांशी थेट संपर्क साधून कामकाजात येणार्‍या अडचणी, तक्रारी जाणून घेण्यात आल्या आहेत, असेही मंत्री खंवटे यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी कार्यालयात येत्या १५ मेनंतर विविध कामांसाठी येणार्‍या नागरिकांच्या कामकाजाबाबतच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या जाणार आहे. यासाठी आगळा वेगळा ‘कस्टमर केअर’ उपक्रम राबविला जाणार आहे. नागरिकांच्या तक्रारीसाठी ऑन लाइन व्यवस्था उपलब्ध केली आहे. महसूल खात्याच्या नव्या पद्धतीच्या कारभाराबाबत नागरिकात जागृती करण्याची गरज आहे. असेही त्यांनी सांगितले.

तलाठी कार्यालयात सापडत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी ऐकू येतात. तलाठ्याने दाखल्यासाठी सादर केलेल्या प्रति प्रमाणित केल्यानंतर पुढील प्रक्रिया केली जाते. नागरिकांच्या स्वप्रमाणित प्रति स्वीकारून आवश्यक दाखल्यासाठी प्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असेही मंत्री खंवटे यांनी सांगितले.