तारुण्यपिटिका ः तारुण्यातील नैराश्य

0
1120

– डॉ. मनाली म. पवार
गणेशपुरी-म्हापसा

तेलकट त्वचेची काळजी घेण्यासाठी चेहरा दिवसातून चार-पाच वेळा धुवावा. सर्वप्रथम अशी मुरुमं फोडू नयेत. कितीही मोह झाला तरी त्यांना हात लावू नये. कारण असे केल्यास त्यांचे डाग आयुष्यभर राहतात. साधारण तीन लीटर पाणी रोज प्यावे.


सुंदरता म्हटली की प्रथम लक्ष जाते ते चेहर्‍यावर! चेहर्‍याची त्वचा नितळ, तेजस्वी, कांतीयुक्त, डागरहित, तारुण्यपिटिकांरहित असणे म्हणजेच सुंदरता. चेहर्‍यावरची त्वचा सर्वाधिक नाजूक व अतिसंवेदनशील असते. चेहर्‍याला सर्वांत त्रासदायक म्हणजे तारुण्यपीटिका (मुरुमे) होय. ९०% किशोरवयीन मुली व मुलेदेखील तारुण्यपीटिकाने त्रस्त असतात. मग अँटी ऍक्ने सोप, अँटी ऍक्ने क्रिम, लोशन, हर्बल लेप यांचा चेहर्‍यावर मारा सुरू होतो ज्याचा शेवटपर्यंत फायदा काहीच होत नाही. चेहर्‍यावर वर-वर लेप लावणे किंवा बाह्योपचार करणे म्हणजे तारुण्यपिटिकांची चिकित्सा किंवा उपचार नव्हे. तारुण्यपिटिकांचा संबंध हार्मोन्सशी व चेहर्‍याच्या त्वचेशी असतो, त्यामुळे कारणानुरूप, दोष-दुण्यांचा विचार करूनच उपचार करावेत. चिकित्साही बाह्यतः तसेच आभ्यंतरही घ्यावी लागते. तेव्हा नुसताच लेप लावून मुरमे कमी होत नाही, डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचार घ्यावेत.

‘शाल्मलीकण्टकप्रख्याः कफमारुतरक्तजाः|
युवानपिडका यूनां विज्ञेया मुखदूषिकाः॥

तरुण वयामध्ये कफ, वात व रक्त यांच्या दुष्टिमुळे, सावरीच्या काट्याप्रमाणे दिसणारे फोड मुखभागावर येतात, यालाच युवानपिडका असे म्हणतात. तारुण्यावस्थेत उत्पन्न होणार्‍या असल्यानेच यांना युवानपिडका आणि मुखभागाची दुष्टी करणारे असल्याने मुखदूषिका असे आयुर्वेदाने म्हटले. आहे. हा विकार सामान्यतः १२ ते २५ वर्षाच्या वयोगटामध्ये अधिक प्रमाणात आढळतो. कपाळ, गाल, नाक याठिकाणीही हे विस्फोट येऊ शकतात. दाह, आरक्तवर्णता, वेदना ही लक्षणे असणार्‍या या फोडामध्ये पाकही लवकर होतो व त्यातून पूरमिश्रित असा स्राव बाहेर पडतो. पहिले फोडं बरे झाले तरी नवनवीन फोडांची सतत उत्पत्ती होतंच राहते. चिकित्सा न घेतल्यास ४-५ वर्षांपर्यंत त्यांचा त्रास सुरूच राहतो.
आजची तरुण पिढी आपल्या सौंदर्याबाबत खूपच जागरूक आहे. अगदी शाळा, कॉलेजमधील मुलांना मुरुमं, पुटकुळ्या, तेलकट त्वचा असे प्रश्‍न सतत सतावत राहतात. अर्वाचीनदृष्ट्या पौगंडावस्थेत आल्यानंतर मुलांना सर्वांत जास्त सतावणारी गोष्ट म्हणजे मुरुमं. या वयात मुला-मुलींच्या हॉंर्मोन्समध्ये बदल होत असतात आणि त्यामुळेच चेहर्‍यावरील त्वचेत त्याचे बदल दिसून येतात. हॉर्मोन्स कार्यरत झाल्याने त्वचेमधील तेलग्रंथीही कार्यरत होतात. त्यांच्या आकारात वाढ होते आणि त्या जास्तीत जास्त प्रमाणात त्वचेवर तेल सोडतात आणि तेलकट त्वचेमुळे चेहर्‍यावर मुरुमं येतात. त्याचप्रमाणे त्वचेवरील छिद्रे बंद झाल्यानेही त्वचेमधील अतिसूक्ष्म जंतू तेथेच साठून राहतात व त्यामुळे मुरुमांची जास्त वाढ होते.

तारुण्यपिटिका येण्याची व वाढण्याची कारणे ः

* आयुर्वेदाप्रमाणे तरुण वय म्हणजेच पित्ताचा काळ. या वयात पित्ताधिक्य असल्याने तळलेले, मसालेदार, चटपटीत पदार्थ, जंक फूड, फास्ट फूड, अतिप्रमाणात सेवन केल्याने पित्त दूषित होते. पित्ताबरोबर वात व रक्त हे दूषित होते व मुरुमांच्या रूपाने बाहेर पडते.
* दिवसा झोपणे व रात्री जागरण करण्यानेही पित्ताचा प्रकोप होतो व रक्तदुष्टी होऊन तारुण्यपिटिका येतात.
* त्वचा हे अतिसंवेदनशील इंद्रियं असल्याने, अनैसर्गिक, केमिकलयुक्त गोष्टींचा चेहर्‍यावर जास्त उपयोग झाल्यासही मुरुमे येतात.
* मुले-मुली सतत मानसिक तणावाखाली असल्यासही त्रास होतो.
* अग्निमांद्य म्हणजेच काहीही पचन विकृती असल्यास, खाल्लेले नीट पचन न झाल्यास. खाल्लेल्या पदार्थांचे पचन न होता पुन्हा खाल्ल्यानेही मुरुमांचा त्रास होतो.
* हॉर्मोन्सचा असमतोल असल्यास किंवा आर्तव दोष असल्यास.
* अनियमित पाळी, वजन वाढणे, अनावश्यक केसांची वाढ इत्यादी असल्यास. मुरुमं आणि पुटकुळ्यांचा संबंध हॉर्मोन्सशी आहे, असे समजावे.
* पीसीओडी (पॉलि-सिस्टीक ओव्हॅरियन डिसीज) नावाचा बिजांडकोषाचा काही दोष आहे का… तेही पहावे. कारण मुलींमध्ये तीव्र स्वरुपाची मुरुमं, पुटकुळ्या येण्यामागे हे एक कारण असते.

तारुण्यपिटिकांची लक्षणे ः

* चेहर्‍यावर, मानेवर, छातीवर किंवा पाठीवर फोड विस्फोट किंवा पुटकुळ्या येणे.
* दाह-जळजळ होणे.
* खाज येणे.
* आरक्तवर्णी किंवा पू निर्माण होणे.
* वेदना हे एक महत्त्वाचे लक्षण असते. चेहर्‍यावर हात फिरवला तरी दुखतात.
* त्याचप्रमाणे वातज पिटिका रंगाने काळ्या, स्पर्शाला काहीशा कोरड्या, खरखरीत लागतात.
* पित्तज पिटिका तांबरट, स्पर्शांस मृदु व उष्ण, पूमिश्रित व वेदनायुक्त असतात.
* कफज पिटिका पांढरट, स्पर्शास जाड, थंड, पूयुक्त, वेदनायुक्त व स्रावी असतात.

तारुण्यपिटिकांमध्ये पंचकर्माचा उपयोग ः

तारुण्यपिटिकांमध्ये शोधनोपक्रम खूप महत्त्वाचे आहेत. सार्वदेहिक शोधनोपक्रमांमध्ये विशेषतः पित्त व रक्ताची दुष्टी होत असल्याने जलौका लावून रक्तमोक्षण करण्याने खूपच फायदा होतो व त्याचबरोबर मृदुविरेचन चालू ठेवावे.

महत्त्वाची वनौषधी ः

* निम्ब – कडुनिंबाचे मूळ चंदनाप्रमाणे उगाळून रोज लेप लावल्यास एका आठवड्यात फरक जाणवतो.
निम्ब पत्र, डाळींबाची साल, लोध्र व हिरडा एकत्र दुधाबरोबर घोटून चेहर्‍याला लावावे.
* हळद – हळद ही वर्ण्य तसेच अँटीसेप्टीक आहे. त्याचप्रमाणे चेहर्‍यावरील अतिरिक्त तेल शोषून घेते.
* दारुहरिद्रा – मुरमे सुकल्यावर चेहर्‍यावर जे डाग राहतात ते दारुहरिद्राच्या लेपनाने कमी होतात.
* सारिवा – उत्तम रक्तशोधक आहे. लेपनार्थ किंवा सेवन केल्याने दाह कमी होतो व चेहरा उजळतो.
* चंदन – दाह, खाज कमी होते व उत्तम वर्ण्य आहे.
* जायफळ – उगाळून लावल्यास चेहर्‍यावरचे डाग कमी होतात.
* उशीर – दाहनाशक असून तणाव कमी होतो.
* मंजिष्ठा – रक्तशोधक असून रक्ताभिसरण सुधारते. सेवनार्थ तसेच लेपनार्थ वापर करावा.
* आवळा – नित्य सेवनाने त्वचेचे पोषण होते व रक्ताभिसरण सुरळीत होते.
* खदिर – उत्तम रक्तशोधक.
* शतावरी, अश्‍वगंधा व अशोकसारखी द्रव्ये हॉर्मोन्सचा समतोल राखायला मदत करतात.

आयुर्वेदिक औषधी योग ः

त्रिफळा गुग्गुळ; आरोग्यवर्धिनी वटी; चंद्रप्रभावटी, सूक्ष्म त्रिफळा, शंखभस्म, गंधक रसायन, महामंजिष्ठादि क्वाथ, अविपत्तीकर चूर्ण, सारिवाद्यासह, खदिरासव, उशीरासव, चंदनासव, अरविदांसव, दशांग लेप. दोषांचे आधिक्य पाहून त्याप्रमाणे औषधी योगांचा वापर करावा.
यौवनपीटिकाची सामान्य चिकित्सा करताना रक्तमोक्षण, प्रलेप व अभ्यंग करावे. रक्तशुद्धीसाठी पोटात, अनंत, मंजिष्ठा, वाळा, हळद, प्रवाळभस्म अशी औषधे योजावीत. रोजच्या रोज पोट साफ होत आहे याकडे लक्ष ठेवावे. आठवड्यातून एकदा २-३ जुलाब होऊन पोट साफ होईल, असे औषध घ्यावे.
मुलींमध्ये उपचार सुरू करण्यापूर्वी मासिक पाळीच्या तक्रारी, वजन वाढणे, अनावश्यक केसांची वाढ होणे अशा तक्रारी आहेत का ते जाणून घेणे आवश्यक आहे. तसे असल्यास हॉर्मोन्सचा असमतोल औषधांनी पूर्ववत करावा. तसेच काही मुलींमध्ये मासिक पाळीच्या आधी मुरुमं येतात आणि मासिक पाळी येऊन गेल्यावर ती कमी होतात. असे असल्यास हॉर्मोन्सवर चिकित्सा प्रथम घ्यावी.

त्वचेची आणि मुरुमांची निगा कशी राखाल?…

* त्वचा हे अतिसंवेदनशील इंद्रिय असल्याने अनैसर्गिक गोष्टींचा वापर करणे टाळावे. चेहर्‍यावर साठलेली अनावश्यक द्रव्ये मुळापासून स्वच्छ व्हावीत यासाठी चेहरा उटणे लावून धुवावा. उटणे तयार करण्यासाठी निम्ब, चंदन, मंजिष्ठा, सारिवा, ज्येष्ठमध, वचा, बेसन यांचा वापर करावा. वाताधिक्य असल्यास मिश्रण कोरफडीच्या गराबरोबर वापरावे. पित्ताधिक्य असल्यास गुलाबजलाबरोबर व कफाधिक्य असल्यास पाण्याबरोबर वापरावे.
* एकंदरित चेहर्‍याचे आरोग्य टिकून राहावे म्हणून साबणाचा अतिवापर टाळावा. शक्यतो आयुर्वेदिक उटण्याचा वापर करावा.
* आठवड्यातून एकदा पाण्यात कडूनिंबाची पाने टाकून चेहर्‍यावर वाफारा घ्यावा. याने त्वचेवरील सूक्ष्म रंध्रे विस्तारीत होऊन मलभाग पूर्णतः निघून जाण्यास मदत होते.
* तेलकट त्वचेची काळजी घेण्यासाठी चेहरा दिवसातून चार-पाच वेळा धुवावा. सर्वप्रथम अशी मुरुमं फोडू नयेत. कितीही मोह झाला तरी त्यांना हात लावू नये. कारण असे केल्यास त्यांचे डाग आयुष्यभर राहतात.
* साधारण तीन लीटर पाणी रोज प्यावे.
* आहारामध्ये पचणारे हलके जेवण घ्यावे. मोड आलेले कडधान्य. जुने तांदूळ, गहू, नाचणी, भाज्यांमध्ये पालेभाज्या, काकडी, गाजर, फळांमध्ये मोसंबी, संत्र्यासारखी फळे खावीत.
* रोज चांगली, शांत झोप घ्यावी.
* प्राणायाम केल्यानेही फायदा होतो.
* झोपताना मेकअप काढून म्हणजेच चेहरा स्वच्छ करूनच झोपावे.

काही घरगुती फेसपॅक्स ः

– तेलकट चेहर्‍यामुळे मुरमे येणार्‍यांनी पेरू, आंबा व डाळिंबाची कोवळी पाने वाटून पेस्ट करावी व मुरुमांना लावावी.
– संत्र्याची साल सुकवून, चूर्ण करावे व ताकात घालून चेहर्‍यावर लावावे.
– पूयुक्त मुरुमं असल्यास निम्बाची पाने वाटून किंवा कडुनिम्ब व हळद एकत्र करून चेहर्‍यावर लेप लावावा.
– सावरीच्या काट्याचे दुधात उगाळून तयार केलेले गंध लावावे.
डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार केल्यास तारुण्यातील ही समस्या आपण दूर ठेवू शकतो.